Raju Shetty made to sit in police station for five hours | Sarkarnama

खासदार राजू शेट्टींना पोलिस ठाण्यात पाच तास रखडवले सरकार विरोधी आंदोलनाचा फटका

गोविंद तुपे:सकाळ इन्व्हेस्टीगेशन टीम
बुधवार, 8 मार्च 2017

आमदार विनायक मेटे - अध्यक्ष शिवसंग्राम 
लोकशाहीमध्ये कोणत्याही पक्षाला आंदोलन करण्याचा अधिकार असून, आंदोलकांना अटक करणे ही कायदेशीर बाब आहे. मात्र अटक करताना एखाद्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षाला अटक करण्याचे काही संकेत असतात. ते पोलिसांनी राजू शेट्टी यांच्या बाबतीत पाळलेले दिसत नाहीत. पोलिसांनी शेट्टी यांच्याशी केलेली वागणूक ही निंदनीयच आहे.
 

मुंबई: साहेब जरा बिझी आहेत, तुमचेच काम सुरू आहे. आमच्या हातात काय जादुची छडी नाही, असा पोलिस ठाण्यातील सर्वसामान्यांचा अनुभव खासदार राजू शेट्टींनाही मंगळवारी आला.

 शेतमालाला योग्य हमी भाव द्या यामागणीसाठी त्यांनी विधान भवानासमोरच तूर आणि कांद्याची विक्री सुरू केली होती. या प्रतिकात्मक आंदोलना वेळी ताब्यात घेतलेल्या शेट्टींना जवळपास पाच तास पोलिस ठाण्यात रखडवून ठेवले होते. जमावबंदीसारख्या शुल्लक गुन्ह्यात शेट्टींना अशा स्वरूपाची वागणूक देण्यासाठी पोलिसांवर कोणाचा दबाव होता याची चर्चा स्वाभिमानी कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. 

शेतमालाला भाव मिळण्यासाठी आम्हीच पुढाकार घेवून विधान भवन परिसरात आठवडी बाजाराची सुरूवात केली आहे. मात्र तूर आणि कांदा यासारख्या अनेक पिकांना योग्य भाव न मिळाल्याने ते कवडीमोल दराने विकले जात आहेत. हा माल सडून जाण्याऐवजी लोकांच्या मुखात जावा म्हणून आम्ही त्याचे सनदशीर मार्गाने वाटप करीत होतो. दरम्यान कुठल्याही कायदासुव्यवस्थेला बाधा न आणता सुरू असलेले हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकारने केला. यावेळी आम्हाला माध्यमांच्या प्रतिनिधींशीही बोलण्याची संधीही पोलिसांनी दिली नाही. त्याच बरोबर पोलिस ठाण्यात घेऊन जाण्याची पध्दतही चूकीची असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी सकाळशी बोलताना सांगितले. 

एवढेच नाही तर पोलिस ठाण्यात घेवून गेल्यानंतर आर्ध्या तासाच्या जामिन प्रक्रियेला पोलिसांनी तब्बल पाच तास लावले. विशेष म्हणजे आम्ही सर्व आंदोलक आणि आमचे नेते राजू शेट्टी पोलिस स्टेशनला असताना दबाव टाकणारे काही मंत्र्याचे फोन पोलिसांना आले असल्याचा आमचा संशय आहे. कारण पोलिस अधिकारी वारंवार फोनवरून यासर्व गोष्टींचा अढावा वरिष्ठांना देत होते असेही स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख