राज्यात फक्त आठ हजार कोटींचीच कर्जमाफी होणार : राजू शेट्टी

राज्यात फक्त आठ हजार कोटींचीच कर्जमाफी होणार : राजू शेट्टी

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. यातून 31 हजार कोटींचे कर्ज माफ होणार असल्याचा दावा सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात फक्त सात ते आठ हजार कोटींचीच माफी शेतकऱ्यांना मिळणार असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केला. या वेळी त्यांनी सिंचन गैरव्यवहाराची चौकशीसुद्धा करण्याची मागणी केली. 

स्वाभिमानीचा पक्ष विस्तार व संघटन बांधणीसाठी शेट्टी नागपूरला आले होते. पत्रकार परिषदेतच त्यांनी जिल्ह्यातील नवीन कार्यकारिणी त्यांनी जाहीर केली. ते म्हणाले, परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पैसाच येणार नसल्याने कर्ज फेडण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कर्जमाफी आवश्‍यक होती. सरकारने जे निकष निश्‍चित केले आहेत, त्यानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काहीच फायदा नाही. त्यामुळे 30 सप्टेंबरपर्यंत कर्जाची उचल करणाऱ्यांना माफी दिली पाहिजे. 25 हजार रुपये मदतीची घोषणाही पूर्ण केली पाहिजे. सरकारने 2 लाखांपर्यंतच्या कर्जदार शेतकऱ्यांनाच माफी देण्याचे ठरविले आहे. ही योजना फसवी आहे. यामुळे 31 हजार कोटींचे नाही, तर फक्त 7 ते 8 हजार कोटींचे कर्ज माफ होणार असल्याचे ते म्हणाले. नोव्हेंबर महिन्यात राज्यात 300 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. सिंचनाचा अभाव हेही या आत्महत्येसाठी एक कारण आहे. त्यामुळे सिंचन गैरव्यवहाराची चौकशी झाली पाहिजे, असेही ते म्हणाले. 
भाजपच्या काळात सर्वाधिक भ्रष्टाचार 
भाजपने सत्तेत येण्यापूर्वी भ्रष्टाचारमुक्त आणि शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण राबविण्याचे सांगितले होते. मात्र त्यांनी उलट काम केले. फडणवीस सरकारच्या काळात सर्वाधिक भ्रष्टाचार झाला. हळूहळू तो बाहेर येईल. काही प्रकरणे आपल्याकडे असून लवकरच ती उघड करू, असेही ते म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com