Raju Shetty Kept Away From Cabinet Intentionally | Sarkarnama

'स्वाभिमानी' दुबळी करण्यासाठी शेट्टींचा मंत्रीमंडळातून पत्ता कट?

गणेश शिंदे
बुधवार, 1 जानेवारी 2020

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचे बळ काहीसे हिरावले आहे. मात्र, मंत्रीपदाच्या माध्यमातून पुन्हा संघटनेला बळ मिळेल असे कार्यकर्त्यांना वाटत होते. यासाठी कार्यकर्त्यांनी काही दिवस मुंबईत तळ ठोकला होता. शेट्टी यांना मंत्रीपदी संधी मिळावी यासाठी त्यांनी जिवाचे रान केले. मात्र, पदरी निराशा घेऊनच कार्यकर्ते माघारी फिरले.

जयसिंगपूर : एकही आमदार नसताना मंत्रीपद देऊन भाजपने घटकपक्ष असणाऱ्या स्वाभिमानी पक्षाचा सन्मान केला होता. मात्र, महाविकास आघाडीने स्वाभिमानीला सत्तेतून बेदखल केले. माजी खासदार राजू शेट्टी मंत्रीपदाच्या चर्चेत राहिले मात्र यादीतून गायब झाले. नव्या सरकारमधील जवळपास निम्मे मंत्रीमंडळ शुगर लॉबीशी संबंधित असल्याने भविष्यात स्वाभिमानीचा साखर कारखानदारांना उपद्रव होऊ शकतो हे ओळखूनच श्री शेट्टी यांना मंत्रीमंडळातून डावलण्यात आल्याची चर्चा राजकीय रंगली आहे.

राज्यातील जवळपास 30 ते 35 विधानसभा मतदार संघात स्वाभिमानीचा प्रभाव आहे. महाविकास आघाडीत स्वाभिमानीला स्थान देऊन आघाडीच्या उमेदवारांनी बेरजेचे गणित केले. देवेंद्र भुयार यांच्या रुपाने एक आमदारही निवडून आला. मात्र, मंत्रीमंडळाच्या विस्तारात स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची होती. स्वत: शेट्टी यांनी मंत्रीपदाची मागणी केली नव्हती. मात्र, सन्मानाने दिले तर स्विकारण्याचीही तयारी होती.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचे बळ काहीसे हिरावले आहे. मात्र, मंत्रीपदाच्या माध्यमातून पुन्हा संघटनेला बळ मिळेल असे कार्यकर्त्यांना वाटत होते. यासाठी कार्यकर्त्यांनी काही दिवस मुंबईत तळ ठोकला होता. शेट्टी यांना मंत्रीपदी संधी मिळावी यासाठी त्यांनी जिवाचे रान केले. मात्र, पदरी निराशा घेऊनच कार्यकर्ते माघारी फिरले. लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील पराभव आणि खचलेला कार्यकर्ता अशा स्थितीत शेतकऱ्यांना न्याय देण्याचे आव्हान स्वाभिमानीच्या नेत्यांपुढे आहे.

शेट्टी यांचा मंत्रीमंडळात समावेश म्हणजे स्वाभिमानीला बळ देणे अशीच आजची स्थिती आहे. निवडणूकीत विविध मतदार संघातील स्वाभिमानी कार्यकर्ता महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचार यंत्रणा हाताळला असतानाही मंत्री मंडळात मात्र नेत्याला मात्र संधी मिळाली नसल्याचे शल्य कार्यकर्त्यांना आहे. शेट्टींचा मंत्रीमंडळात समावेश म्हणजे स्वाभिमानीला बळ देण्याचा प्रकार गृहीत धरुन भविष्यात शुगर लॉबीचा उपद्रव टाळण्यासाठी शेट्टींचा मंत्रीमंडळातील पत्ता गुल झाल्याची चर्चा शिरोळ तालुक्‍यात जोर धरु लागली आहे.

शेट्टींच्या प्रभावावर यड्रावकरांचा उतारा

शिरोळ तालुक्‍यात स्वाभिमानीचा मोठा प्रभाव आहे. याच तालुक्‍यातून स्वाभिमानीच्या चळवळीला प्रारंभ झाला. शेट्टींचा उपद्रव रोखण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते राहिलेले, अपक्ष म्हणून निवडून आलेले आणि शिवसेनेच्या कोट्यातून राज्यमंत्री झालेले राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना सत्तेच्या सावलीत बसविण्यात आले असून शेट्टींचे खच्चीकरण करण्यासाठी करण्यासाठीच त्यांच्यात तालुक्‍यात नवख्या आमदाराला पहिल्याच दणक्‍यात मंत्रीपद देण्यात आल्याची ठळक चर्चा आहे.

चळवळीच्या विचारधारेशी चिटकून रहाणे हाच पर्याय

सत्तेच्या सारीपाटात स्वाभिमानीचे गेल्या आठ-दहा वर्षात मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटत नसल्याने आक्रमकतेमुळे स्वाभिमानीची सत्ताधाऱ्यांना 'अॅलर्जी' राहिली आहे. त्यामुळे सत्तेच्या पाठशिवणीचा खेळ बंद करुन स्वाभिमानीने नव्या जोमाने शेतकरी प्रश्‍नावर चळवळीच्या विचारधारेशी एकरुप होणे हेच संघटनेच्या हिताचे ठरणार आहे. सत्तेशिवायही संघटनेने सरकारला गुडघे टेकायला लावले आहेत, हे लक्षात घेऊन यापुढची दिशा ठरविण्याची गरज आहे.

राजू शेट्टी

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख