Raju Shetty Explains Why He is in UPA | Sarkarnama

विश्‍वासघाताचा बदला घेण्यासाठीच "यूपीए'त : राजू शेट्टी

निखिल पंडितराव
शनिवार, 20 एप्रिल 2019

शेतकऱ्यांच्या हिताचे राजकारण मी आत्तापर्यंत केले आहे. आमच्या पक्षाची पाळेमुळेच शेतकऱ्यांच्या विकासात रुजलीत. भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) शेतकऱ्यांना मातीत घालण्याचे काम केले. त्यामुळेच 'एनडीए'ला धडा शिकवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यातून बाहेर पडली - राजू शेट्टी

शेतकऱ्यांच्या हिताचे राजकारण मी आत्तापर्यंत केले आहे. आमच्या पक्षाची पाळेमुळेच शेतकऱ्यांच्या विकासात रुजलीत. भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) शेतकऱ्यांना मातीत घालण्याचे काम केले. त्यामुळेच 'एनडीए'ला धडा शिकवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यातून बाहेर पडली. एकट्याची ताकद लढण्यासाठी अपुरी पडेल, म्हणून बदला घेण्यासाठी 'यूपीए'बरोबर आम्ही जातोय, अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख खासदार राजू शेट्टी यांनी 'सकाळ'चे प्रतिनिधी निखिल पंडितराव यांच्याशी बोलताना पक्षाची भूमिका मांडली. त्याचा गोषवारा -

प्रश्‍न : 'एनडीए'मधून तुम्ही बाहेर का पडलात?
शेट्टी :
2014 मधील लोकसभा निवडणुकीआधी आपण नरेंद्र मोदींना गुजरातमध्ये भेटलो. निवडणूक विकास की हिंदुत्त्व या मुद्द्यावर लढवणार, असे स्पष्ट त्यांना विचारले. त्यांनी भ्रष्टाचार, विकास आणि बेरोजगारी असे मुद्दे सांगितल्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाबाबत तुम्ही आमचे तीन मुद्दे विचारात घेत असाल तर मी तुमच्यासोबत येईन, हे स्पष्ट केले. स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी, राष्ट्रीय दुष्काळ निवारण, कर्जमुक्ती आयोग आणि शेतकऱ्यांना हमीभाव हे प्रश्‍न सोडविण्याची ग्वाही त्यांनी दिली. शेतकरीहितासाठी आम्ही त्यांच्याबरोबर गेलो. शेतकऱ्यांमुळेच महाराष्ट्रात 48 पैकी 42 जागांवर त्यांना विजय मिळाला;प्पिण सत्ता स्थापनेनंतर मोदी सरकारने उद्योजकांसाठी पायघड्या घालत शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या घशात घालण्याचे काम केले. भूमिअधिग्रहण कायद्याला नख लावले. स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी अशक्‍य असल्याचे प्रतिज्ञापत्र कोर्टात दिले. त्यांनी विश्‍वासघात केल्याचे स्पष्ट झाल्यावर आमचा पक्ष "एनडीए'तून बाहेर पडला.

प्रश्‍न : शेतकऱ्यांचे प्रमुख प्रश्‍न कोणते?
शेट्टी :
शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुपटीने वाढल्यात. नोटाबंदी शेतकऱ्यांच्या जिवावर उठली. शेतकऱ्यांना हमीभाव मिळेना. जमिनीचे दर खाली आले. शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही एकटे लढण्यापेक्षा "यूपीए'सोबत लढलो तर निश्‍चितच "एनडीए'ला धडा शिकवून शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील. शिवारातील कमळाचे तण उपटण्याचे काम शेतकरी या वेळी नक्की करतील.

प्रश्‍न : तुमच्या पक्षावर जातीयवादाचा आरोप होतोय?
शेट्टी :
"स्वाभिमानी'वर करण्यात येत असलेला जातीयवादाचा आरोप चुकीचा आहे. केवळ दीड तालुक्‍यापुरता तो चर्चेचा विषय आहे. जातीयवाद असता तर माझ्या पक्षातील प्रमुख पदांवर अन्य जातींचे कार्यकर्ते आलेच नसते. अनेकांना पक्षाने मग पदेच दिली नसती. शेतकरी हित आमची जात. ते समोर ठेवून वाटचाल सुरू आहे. शेतकऱ्यांना चांगला हमीभाव मिळावा, संपूर्ण कर्जमुक्तीसाठी मुद्दे घेऊन शेतकऱ्यांपर्यंत जात आहोत. तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी नवीन दोन विधेयके आणण्याचा विचार आहे. त्यासाठी "यूपीए'तील 21 पक्षांनी आत्ताच पाठिंबा दिलाय. खासदारांचा दबाब गट तयार करून ही विधेयके नक्कीच मंजूर करून आणू.

राजकीय घडामोडींच्या बित्तंबातमीसाठी - www.sarkarnama.in
सरकारनामा ट्वीटर - https://twitter.com/MySarkarnama
सरकारनामा फेसबूक - https://www.facebook.com/MySarkarnama/

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख