शिवारात पिकलेच नाही तर शिवभोजन थाळीत अन्न येईल कुठून : राजू शेट्टींचा सवाल

कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी यावर्षीच्या गाळप केलेल्या ऊसाला एकरकमी एफआरपी देण्याचे जाहिर केले आहे. मग साताऱ्यातील कारखान्यांना मस्ती आली आहे का? असा प्रश्न राजू शेट्टी यांनी येथे उपस्थित केला
Raju Shetty Criticism on Shivsena Over Farmers Policies
Raju Shetty Criticism on Shivsena Over Farmers Policies

सातारा : कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी यावर्षीच्या गाळप केलेल्या ऊसाला एकरकमी एफआरपी देण्याचे जाहिर केले आहे. मग साताऱ्यातील कारखान्यांना मस्ती आली आहे का? असा प्रश्‍न करून एकरकमी एफआरपी जाहिर का, अन्यथा कोल्हापूर, सांगली व पुण्यातील स्वाभिमानीचे कार्यकर्ते साताऱ्यात घुसवून तुमची मस्ती उतरवली जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज दिला. शिवसेनेच्या शेतकरी धोरणांवरही त्यांनी टिका केली. 

दरम्यान, केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध आणि सरसकट संपूर्ण कर्जमाफीसाठी येत्या आठ जानेवारीला होणारा देशव्यापी बंद यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. साताऱ्यातील हॉटेल कल्याणमध्ये आयोजित स्वाभिमानी संघटना कर्जमुक्ती पदाधिकारी मेळाव्यात श्री. शेट्टी बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष राजू शेळके, अर्जुन साळुंखे, भुजबळ मामा, अनिल पवार, धनंजय महामुलकर, अमरसिंह कदम, शरद कदम,तानाजीराव देशमुख, संदीप मांडवे, सूर्यभान जाधव (गोपूज), संभाजी घोरपडे, मनसेचे एसटी कामगार जिल्हाध्यक्ष राजू केंजळे, श्रमिक दलाचे जिल्हा प्रमुख डॉ. प्रशांत पन्हाळकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शेट्टी म्हणाले, ''देशातील 265 शेतकरी संघटना एकत्र येऊन दिल्लीत कार्यकारी समितीची बैठक झाली. यामध्ये केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करून सरसकट सातबारा कोरा करावा या मागणीसाठी आठ जानेवारीला देशव्यापी बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. हे आंदोलन केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांविषयी नाराजी व्यक्त करण्यासाठी आहे. राज्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्षांतील नेत्यांनी निवडणुकीत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्याऐवजी नागपूर अधिवेशनात गडबडीत कर्जमाफी जाहीर केली. पण, त्याचा कोणाला लाभ झाला. शेतीवर अवलंबून असणारा शेतकरी अपवादानेच यामध्ये पात्र ठरला आहे.''

ते पुढे म्हणाले, ''छोटा शेतकरी थकबाकीदार झाल्यास त्याची बाजारातील पत जाते. त्यामुळे तो कर्जाची वेळेत परतफेड करतो. असे पीककर्ज दोन लाख आहे. त्यातही हे कर्ज शून्य टक्‍क्‍याने मिळते. त्याला पंजाबराव देशमुख व्याज सवलत व केंद्राची व्याज सवलत मिळते. पण ज्यावेळी शेतकरी थकबाकीत जातो, त्यावेळी त्याला सवलत मिळत नाही. सध्या नैसर्गिक आपत्तीचे हे वर्ष असून दुष्काळ, महापूर, अवकाळी अशा संकटांना सामोरे जावे लागले आहे. यातून खरिप पिक वाया गेले आहे. मुळात खरिपाची मुदत जून 2020 ला संपणार आहे. त्यामुळे शेतकरी कर्ज भरणार कसे. कर्जमुक्तीची घोषणा गेल्यावर्षीच्या थकित कर्जाला लागू आहे. त्यामुळे शासनाने थकीत शब्द वगळून सरसकट 30 सप्टेंबरपर्यंतच्या पिक कर्जाला माफी द्यावी.'' या वेळी राजू शेळके, संदीप मांडवे, तानाजीराव देशमुख, सूर्यभान जाधव, संभाजी घोरपडे यांची भाषणे झाली.

''शिवसेनेचे पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहा रूपयांत शिवभोजन थाळी देणार असल्याचे जाहीर केले आहे. पण त्यांनी लक्षात घ्यावे, शेतकऱ्यांच्या शिवारात पिकलेच नाही तर शिवभोजन थाळीतील पदार्थ आणणार कोठून. त्यांच्यापुढे थाळीतील पदार्थ परदेशातून आयात करण्याचाच पर्याय उरेल, त्यांनी खुशाल दहा रूपयात शिवभोजन द्यावे, पण शेतकऱ्यांचे प्रश्‍न मार्गी लावावेत,'' असेही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com