...ही तर प्रधानमंत्री कॉर्पोरेट कल्याण योजना- राजू शेट्टीची पीक विमा योजनेवर टिका

...ही तर प्रधानमंत्री कॉर्पोरेट कल्याण योजना- राजू शेट्टीची पीक विमा योजनेवर टिका

औरंगाबाद : सरकारने दुष्काळ जाहीर करूनही शेतकऱ्यांना पीक विम्याचा परतावा मिळत नाही. खरतंर दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे एवढे प्रचंड नुकसान झाले आहे की, भरपाई देता देता पीक विमा कंपन्या कंगाल व्हायला पाहिजे होत्या, पण त्या कोट्यावधींचा नफा कमावत आहेत. ही प्रधानमंत्री फसल योजना नाही, तर प्रधानमंत्री कॉर्पोरेट कल्याण योजना असल्याचा घणाघात स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. 

तीन दिवस मराठवाडा व विदर्भातील शेतकरी, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन संवाद आणि दुष्काळी भागाची पाहणी केल्यानंतर बुधवारी (ता.12) औरंगाबादेत पत्रकारांशी बोलतांना राजू शेट्टी यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेचे वाभाडे काढले. या शिवाय लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव, सदाभाऊ खोत या सर्वच विषयाला शेट्टी यांनी हात घातला. शेतकऱ्यांसाठी आरपारची लढाई करण्याची घोषणा करतांनाच राजू शेट्टी म्हणाले, २०१६-१७ मध्ये पीक विम्यापोटी शेतकऱ्यांनी १७ हजार ९८२ कोटी कंपन्यांना दिले. त्या बदल्यात परतावा म्हणून या कंपन्यांनी शेतकऱ्यांना केवळ ४२०९ कोटींचे वाटप केले. पुढील वर्षात २० हजार ७६० कोटी शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी भरले. तर कंपन्यांनी केवळ ४२९१ कोटीचा परतवा देत शेतकऱ्यांचा तोंडाला पाने पुसली. 

दोन वर्षात शेतकरी नैसर्गीक आपत्तीना तोंड देतोय, संकटांचा सामना करताये तर दुसरीकडे विमा कंपन्यांचा नफा मात्र साडे एकोणीस हजार कोटीवर पोहचला. सरकारच्या तिजोरीवर दरोडा टाकण्याचाच हा प्रकार आहे. सरकारमध्ये बसलेले लोक यात सहभागी असल्याशिवाय हे शक्‍य नाही. पिक विमा कंपन्यांनी बदमाशी तर केलीच, पण त्याला कृषी आणि महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांचीही साथ मिळाल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला. 

एकीकडे दुष्काळ जाहीर केला, तर दुसरीकडे उंबरठा उत्पन्न जास्त दाखवून विमा परताव्यापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवले. यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातच १२ कोटींपेक्षा अधिक विमा परतावा जाईल असं वाटत नाही. दुष्काळ जाहीर करून साडेसात उलटून गेले, पण दुष्काळ सुसह्य होण्यासाठी करावयाच्या उपाययोजना करण्यात सरकार कमी पडले. 

शेतकरी तिहेरी संकटात
३४ हजार कोटीपर्यंत जाहीर झालेल्या शेतकरी सन्मान योजनेचा लाभ १६ -१७ हजार कोटीवर येवून थांबला. त्यातही रक्‍कमेच्या व्याजाचा प्रश्‍न निर्माण झाला. कर्जमाफी नाही, नवे कर्ज मिळत नाही, दुष्काळामुळे जवळ पैसा नाही अशा तिहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. चारा छावण्या सुरू केल्या त्याला लावलेल्या किचकट निकषामुळे हळूहळू चारा छावण्या बंद पडत चालल्या आहेत. अशा संकटावेळी शेतकऱ्यांच्या हक्‍कासाठी पुन्हा एकदा आरपारची लढाई करण्याचा निर्णय स्वाभीमानी शेतकरी संघटनेने घेतला आहे. दुष्काळामुळे फळबाग उत्पादकांचे झालेले मोठे नुकसान पाहता बागा संपलेल्यांना एकरी एक लाख, ज्यांचे अर्धे नुकसान झालेल त्यांना एकरी ५० हजारांची मदत द्यावी अशी देखील आपली मागणी असल्याचे राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितले. 

फळबागांच्या नुकसानीच्या पंचनाम्याचा निर्णय आठवडाभरात घ्यावा, अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या घरावर फळबाग उत्पादकांचा मोर्चा काढू असा इशाराही त्यांनी दिला. महिनाभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विम्याचा परतावा व नियमानुसार अल्प व दीर्घ मुदतीचे कर्जवाटप न झाल्यास विभागीय आयुक्‍तालयाला बेमुदत घेराव घालू असा गर्भित इशारा देखील राजू शेट्‌टी यांनी दिला. कांदा निर्यात प्रोत्साहनपर अनुदान बंद केल्यामुळे हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचे सिध्द होते अशी टिकाही शेट्टी यांनी केली.

राजू शेट्टी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com