`सातबारा कोरा केला नाही तर पवारांची अवलाद नाही, असे सांगणाऱ्या अजितदादांनी शब्द पाळावा`

....
raju shetty
raju shetty

सोमेश्वरनगर ः कर्जमाफी तकलादू असतानाही होर्डींग लावून 'आम्ही करून दाखवलं...' अशी फसवणूक केली जात आहे. 'सातबारा कोरा केला नाही तर पवारांची अवलाद सांगणार नाही' असं अजितदादा बोलले होते. तेच वित्तमंत्री झालेत. त्यांनी शब्द पाळावा. जयंत पाटलांनी कर्जमाफीसाठी एकतीस हजार कोटींची तरतूद केल्याचे सांगितले होते. परंतु सध्याच्या निकषांनी ते पैसे शेतकऱ्यांना द्यायचे नाहीत हे सिद्ध होते. तुमचा हेतू स्वच्छ नाही, असा घरचा आहेर माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

निंबुत (ता. बारामती) येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शेट्टी यांनी कर्जमाफीविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. नाशिकला 61 कोटी, कोल्हापूरला 225 कोटी, सांगलीला 300 कोटी येतात. मोठ्या बँकांना एवढेच पैसे येणार असतील तर राज्यात आठ हजार कोटींपेक्षा जास्त मिळणार नाहीत. एकतीस हजार कोटींचा आकडा खोटा किंवा तुमचे निकष तरी खोटे. आम्हाला विचारा आम्ही एकतीस हजार कोटीत शेतकऱ्यांना समाधानी कसे करता येईल ते मी सांगतो. 'सातबारा कोरा' यावर स्वाभीमानी ठाम आहे. राज्यावर कर्ज असल्याने सध्या पीककर्ज संपवा आणि चार वर्षात मध्यममुदत संपवा. पण फसवणूक करू नका, अशी टीका शेट्टी यांनी केली.

कारखान्यांनी एफआरपी अधिक दोनशे रूपये द्यावेत या मागणीशी ठाम आहोत. परंतु सद्यस्थितीत पैशाची उपलब्धता नसल्याने एकरकमी एफआरपी आणि कारखाने बंद होताना दोनशे अशी सवलत दिली आहे. मात्र जे एकरकमी एफआऱपी देणार नाहीत त्यांच्यावर फौजदारी करण्यासाठी साखरआयुक्तांवर दबाव आणू, असा इशाराही त्यांनी दिला.

मागील सरकारच्या गोवंशहत्याबंदी कायद्यामुळे भाकड गाई, बैल सांभाळावे लागतात. माणसाला खायला नाही जनावरं किती दिवस सांभाळायची? खरेदी-विक्रीदार, चामडे व्यवसायाचा रोजगार संपला आहे. दुसरीकडे भारतच सर्वाधिक मांस निर्यात करतो हा विरोधाभास आहे. यात बदल करण्याचे सूतोवाच शेट्टी यांनी केले तसेच 'जेएनयू'वर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला.

सत्तेच्या वाट्याची अपेक्षा नव्हतीच
भाजपच्या साम्राज्यवादी व जातीत तेढ निर्माण करण्याच्या प्रवृत्तीला कंटाळून महाविकासआघाडीला पाठींबा दिला होता. प्रमुख तीन पक्षांची बेरीज 154 होत असल्याने आम्हाला वाट्याची अपेक्षा नव्हतीच. मी वा कुणीही तशी मागणी केली नसताना माध्यमातून चर्चा का घडविली? घटकपक्षाच्या कुठल्याही नेत्याला मंत्रीमंडळ विस्ताराचं निमंत्रणही दिलं नाही याबाबत आक्षेप आहेत. महाविकास आघाडीच्या बैठकीत पूर्ण ताकदीने ते मांडू, असे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com