प्रधानमंत्री विमा योजना नव्हे, कॉर्पोरेट कल्याण योजना ! - राजू शेट्टी

 प्रधानमंत्री विमा योजना नव्हे, कॉर्पोरेट कल्याण योजना ! - राजू शेट्टी

औरंगाबाद : पोटाला चिमटा घेऊन शेतकऱ्यांनी पीकविम्याचे हप्ते भरले; पण सरकारच्या गलथानपणामुळे विमा कंपन्याच मालामाल झाल्या. त्यामुळे ही प्रधानमंत्री विमा योजना नाही तर कॉर्पोरेट कल्याण योजना आहे, असा थेट आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. येत्या महिन्याच्या आत शेतकऱ्यांना पीकविमा रक्कम जमा झाली नाही, तसेच कर्जवाटप झाले नाही तर विभागीय आयुक्‍त कार्यालयाला बेमुदत घेराव आंदोलन करणार असल्याचे राजू शेट्टी यांनी 
सांगितले. 

शेतकऱ्यांना पेरणीसाठी कर्ज उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी असते, चारा छावण्याचालकही सरकारच्या जाचक अटीमुळे छावण्या बंद करत आहेत. सरकारच्या उदासीन धोरणांचा रोज एक शेतकरी बळी ठरतो आहे, त्यामुळे आता मात्र बळीराजाच्या प्रश्‍नांसाठी लढण्याचा निर्धार केला असल्याचेही श्री. शेट्टी म्हणाले. एकीकडे कांदा उत्पादक शेतकरी कोलमडून पडला असताना, दुसरीकडे कांदा निर्यात प्रोत्साहन साह्य बंद करणे हे म्हणजे शेतकऱ्याच्या जिवावर उठणारे धोरण असल्याचेही श्री. शेट्टी म्हणाले. 

विद्यापीठे नावालाच का ? 
आपण तीन दिवसांपासून मराठवाडा-विदर्भातील शेतकऱ्यांना कार्यकर्त्यांसह प्रत्यक्ष भेटून दुष्काळी परिस्थिती जाणून घेत आहोत; पण कृषी विद्यापीठांचे संशोधन कुठेच दिसले नाही. या संस्था केवळ नावालाच आहेत, असे आरोपही त्यांनी केले. वर्ष 2017-18 मध्ये 20 हजार 760 कोटी शेतकऱ्यांनी विमा रक्कम भरली; मात्र विमा कंपन्यांनी चार हजार 291 कोटी रुपयांचा विमा रकमेवर शेतकऱ्यांची बोळवण केली. दुष्काळ असतानाही कंपन्यांचा नफा 19 हजार 454 कोटींवर जातोच कसा? असा सवालही त्यांनी केला. 
...तर मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा नेऊ 
फळबागा जळून गेल्या आहेत. अशा शेतकऱ्यांना एकरी एक लाख, तर कमी नुकसान झालेल्यांना 50 हजार प्रती एकर मदत म्हणून सरकारने द्यावेत, अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या घरावर फळउत्पादक शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात येईल, असा कडक इशाराही त्यांनी दिला. 
सदाभाऊ खोत म्हणजे कच्चं मडकं 
राजकारणावर बोलताना श्री. शेट्टी यांनी मडकं तयार करताना कुंभार चांगलेच तयार करत असतो; परंतु एखादं मडकं कच्च निघालं, फुटलं तर दोष कुंभाराचा नसतो, असे म्हणत सदाभाऊ खोत यांना टोला लगावला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com