पिकांच्या नुकसानीबद्दल राज्य सरकार गंभीर नाही - राजू शेट्टी

पिकांच्या नुकसानीबद्दल राज्य सरकार गंभीर नाही - राजू शेट्टी

तुळजापूर : राज्यात परतीच्या पावसामुळे 100 लाख हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्राचे नुकसान झाले आहे. सरकारने 70 लाख हेक्‍टरचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे, सरकारची ही आकडेवारी योग्य वाटत नाही. पिकांच्या नुकसानीकडे सरकार गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. 

येथील सरकारी विश्रामगृहात गुरुवारी (ता. सात) आयोजित पत्रकार परिषदेत श्री. शेट्टी बोलत होते. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, पश्‍चिम महाराष्ट्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक उपाध्यक्ष अमरसिंह कदम, अभिजित संगमे, जिल्हा उपाध्यक्ष तानाजी पाटील, दुर्वास भोजने आदी उपस्थित होते. 

श्री. शेट्टी म्हणाले की, राज्यात सर्व विभागांतील शेतकरी कोलमडला आहे. कोकणातील भात शेती गेली. आंब्याचा हंगाम दोन महिने पुढे गेला आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात महापूर आणि अतिवृष्टी झाली. मराठवाड्यात सोयाबीन, कांदा , द्राक्षे ही पिके गेली. ज्वारी काळी पडली. रब्बी पेरणीचा हंगाम दोन महिने पुढे गेला आहे. पेरणी करता येत नसल्याने पुढच्या पिकाचे भवितव्यही अंधारात आहे. याकडे सरकार गांभीर्याने पाहत नाही. 

नुकसान एवढे झाले असताना पंचनाम्याची गरज काय, असा सवालही त्यांनी केला. एनडीआरएफच्या प्रमाणे शेतकऱ्यांना नुकसानीच्या तिप्पट आर्थिक मदत देण्यात यावी. शेतकऱ्यांनी विमा उतरविताना सर्व कागदपत्रे कंपन्यांकडे दिलेली आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यावर संरक्षित रक्कम वर्ग करावी, अशी मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांना यंदाची दिवाळी शिमग्यासारखी गेली. शेतातील कचरा काढण्यासाठी ताबडतोब मदत द्यावी, अशीही मागणी त्यांनी केली. 
विमा कंपन्यांचा नफा 12 हजार कोटीचा... 
विमा कंपन्यांनी मागील चार वर्षात 12 हजार कोटी रुपयांचा नफा मिळविला आहे. शेतकऱ्यांच्या खिशातुन विमा कंपन्यांनी नफा कमविला आहे. विमा कंपन्या आणि सरकारच्या विरोधात प्रसंगी कडकपणे आंदोलन उभे केले जाईल, असेही श्री. शेट्टी यांनी सांगितले. पश्‍चिम महाराष्ट्रात झालेल्या पुरामुळे देण्यात आलेली मदत अजून मिळालेली नसल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यात आम्ही विरोधात आहोत. आमचे विरोधी आघाडीचे 98 आमदार आहेत, असे श्री. शेट्टी यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com