आत्मक्‍लेष यात्रेनंतर अंतरात्मा जो निर्णय देईल तशी वाटचाल - राजू शेट्टी

 आत्मक्‍लेष यात्रेनंतर अंतरात्मा जो निर्णय देईल तशी वाटचाल - राजू शेट्टी

मुंबई : राज्यपालांची उद्या (30 मे) साडेचारला भेट महाराष्ट्रातील साडे सहा लाख शेतकऱ्यांचे कर्जमुक्तीचे अर्ज त्यांना सादर करणार आहोत. त्यानंतर राज्य सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा करणार आहोत. आत्मक्‍लेष यात्रेच्या समाप्तीनंतर माझा अंतरात्मा जो निर्णय देईल तसा निर्णय घेणार असल्याची माहिती खासदार राजू शेट्टी यांनी "सरकारनामा'शी बोलताना दिली. 

राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेली शेतकरी संघटनेची "आत्मक्‍लेष यात्रा' सोमवारी दुपारी माटुंगा येथील फाईव्ह गार्डन इथे आली. त्यावेळी शेट्टी यांच्यासमवेत आलेल्या शेतकऱ्यांनी भोजनासाठी विसावा घेतला. त्यावेळी शेट्टी यांनी ही माहिती दिली. 

22 मे रोजी सुरू झालेल्या आत्मक्‍लेष यात्रेची उद्या दुपारी राजभवनावर समाप्ती होणार आहे. राजभवनावर जाताना पोलिसांनी कोठे ही यात्रा अडविल्यास तेथेच जाहीर सभा घेऊन आपली भूमिका स्पष्ट करण्याचा मानस शेट्टी यांनी यावेळी बोलून दाखविला. 

राज्यपालांनी उद्या दुपारी 4.30 नंतर राजभवनावर भेटीची वेळ दिली असून 25 ते 30 शेतकऱ्यांचे शिष्टमंडळही राज्यपालांची यावेळी भेट घेणार आहे. आज रात्री परळ येथील शिरोडकर विद्यालयात संघर्ष यात्रेचा मुक्काम होणार आहे. आठ दिवस चालून शेतकऱ्यांच्या पायाला फोड आले आहेत. मात्र या शेतकऱ्यांचा उत्साह कमी झालेला नाही. 
आठ ते नऊ हजार शेतकरी आपल्यासमवेत या आत्मक्‍लेष यात्रेत सहभागी झाल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

तीन वर्षापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन एनडीएसाठी मते मागितली. शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार असल्याचे सांगितले, पण आज शिवारात शेतकरी आणि सीमेवर शेतकऱ्याचा मुलगा असलेला जवान मरत आहे. अच्छे दिनाऐवजी मर जवान, मर किसान ही वेळ आली आहे अशी कडवट टीका त्यांनी यावेळी केली आहे. 


मोदी तेरा वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री असताना गुजरातच्या कृषी क्षेत्राचा विकास झाला होता. आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा होत्या. आताचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस विरोधी पक्षात असताना शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी करत होते आणि आता तेच फडणवीस कर्ज माफ केल्यावर आत्महत्या थांबतील याची खात्री मागत आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आम्हा शेतकरी नेत्यांच्या सांगण्यावर विश्‍वास ठेवून इतिहास घडविला, कॉंग्रेसचे पानिपत झाले, एनडीएचे तब्बल 42 खासदार निवडून आले. कंपनीत चांगले काम करणाऱ्या कामगारांना प्रमोशन व बोनस मिळतो. शेतकऱ्यांना मात्र एनडीएला पाठिंबा दिल्याची किंमत आत्महत्या करून मोजावी लागत असल्याचा संताप राजू शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केला. 

शेतकऱ्यांची एका बाजूला फसवणूक तर दुसऱ्या बाजूला चेष्टा होत आहे. शेतकरी आज आम्हाला अच्छे दिनचा जाब विचारू लागले आहेत. या परिस्थितीला आम्हीही जबाबदार आहोत, कारण आम्हीच यांच्यासाठी मते मागितली होती. त्यामुळेच महात्मा गांधीच्या विचारांना समर्पित होऊन या प्रकाराबाबत आत्मक्‍लेष करत शेतकऱ्यांसाठी यात्रा सुरू केली. 22 मेला महात्मा फुलेंच्या वाड्यावर जाऊन माफी मागितली व यात्रेला सुरवात केली. या यात्रेत शेतकरी वाढत गेले व एकही कमी झाला नसल्याचे खा. शेट्टी यांनी सांगितले. 

शेतकऱ्यांपेक्षा मतभेद मोठे नाहीत... 
पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत व तुमच्यातील मतभेदाचा आत्मक्‍लेष यात्रेवर परिणाम झाला का, असे शेट्टी यांना विचारले असता, परिणाम झाला असता तर आज आठ ते नऊ हजार शेतकरी पायाला फोड येऊनही तळपत्या उन्हाला चालायला आले नसते असे सांगितले. शेतकरी संघटना व शेतकऱ्यांपेक्षा कोणीही मोठे नाही. शेतकऱ्यांची कर्जे, त्यांच्या वेदना व त्यांच्या सुविधा यापेक्षा शेतकरी संघटनेत कोणीही मोठे नसल्याचे शेट्टी यांनी यावेळी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com