raju shetti vs jayant patil | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

राजू शेट्टींविरोधात जयंत पाटील लढणार ! 

निवास चौगले 
शुक्रवार, 7 जुलै 2017

राजकीय परिस्थिती पाहता राष्ट्रवादीकडून श्री. पाटील हेच रिंगणात उतरतील असे दिसते. त्यादृष्टीने त्यांनी तयारीही सुरू केली असून दोन दिवसापुर्वीच वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी माजी खासदार कल्लाप्पा आवाडे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यापुर्वी त्यांना हा वाढदिवसही माहित नसावा किंवा प्रत्यक्ष भेटून कधी शुभेच्छाही दिलेल्या आठवत नाहीत. काल श्री. पाटील यांनी वारणेत जाऊन "जनसुराज्य' चे विनय कोरे यांची भेट घेऊन बंद खोलीत तासभर चर्चा केली.

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांचा वारू रोखण्यासाठी राज्याचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनाच हातकणंगले लोकसभा मतदारसंघात त्यांच्या विरोधात उभे करण्याच्या हालचाली सुरू आहेत. श्री. पाटील यांनीही त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. श्री. पाटील यांच्याशिवाय दुसरा कोणी श्री. शेट्टी यांना आव्हान देण्यासारखा उमेदवार नसल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही श्री. पाटील यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. 

सलग दोनवेळा श्री. शेट्टी या मतदार संघातून विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत. एकदा त्यांनी माजी खासदार श्रीमती निवेदीता माने यांचा तर 2014 मध्ये श्री. आवाडे यांचा दारूण पराभव केला. शेतकरी प्रश्‍नावर त्यांचे होणारे आक्रमक आंदोलन, या आंदोलनाला पक्ष विसरून शेतकऱ्यांची मिळणारी साथ आणि परिणामांची चिंता न करता कोणालाही अंगावर घेण्याची तयारी या श्री. शेट्टी यांच्या अतिशय जमेच्या बाजू आहेत. या जोरावरच दोन्हीही निवडणुकीत तगडे उमेदवार विरोधात असताना आणि दोन जिल्ह्यातील मातब्बर नेते एका बाजूला असताना श्री. शेट्टी सहज पण दणदणीत विजय मिळवला. 

श्री. शेट्टी हे धड भाजपाचेही नाहीत आणि दोन्ही कॉंग्रेसचेही नाहीत अशी परिस्थिती आहे. सद्या ते भाजपासोबत असले तरी त्यांच्याशीच त्यांनी पंगा घेत सरकारवर मिळेल तिथे आक्रमण करण्याची संधी सोडलेली नाही. त्यामुळे भाजपा त्यांच्यावर नाराज आहे. राष्ट्रवादीसोबत त्यांचे कधीच जुळलेले नाही. अशा परिस्थितीत त्यांची कोंडी करण्यासाठीच श्री. पाटील यांना त्यांच्या विरोधात उतरण्याच्या हालचाली सुरू आहेत. 

मतदार संघ पुर्नरचनेत या लोकसभा मतदार संघात सांगली जिल्ह्यातील शिराळा व वाळवा हे दोन मतदार संघ समाविष्ट झाले आहेत. यातील वाळवा मतदार संघाचे श्री. पाटील विद्यमान आमदार आहेत. दोन्ही कॉंग्रेसची लोकसभेला आघाडी होणार यात शंका नाही. यापुर्वीही ही आघाडी होती, त्यावेळी जिल्ह्यातील दोन्ही जागा राष्ट्रवादीकडे होत्या. गेल्यावेळी मात्र राष्ट्रवादीने ही जागा कॉंग्रेसला सोडली, त्या बदल्यात विदर्भातील कॉंग्रेसचा एक मतदार संघ राष्ट्रवादीला मिळाला. आता पुन्हा राष्ट्रवादीकडूनच या मतदार संघावर दावा केला जाण्याची शक्‍यता आहे. कारण, कॉंग्रेसला जागा दिली तरी त्यांच्याकडे उमेदवार कोण ? येथून सुरूवात आहे. श्री. आवाडे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाशी संधान साधले. अध्यक्ष निवडीत कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांना शह देण्यासाठी आपल्या दोन सदस्यांसह ते भाजपासोबत गेले. त्यामुळे पी. एन. यांचाच त्यांच्या उमेदवारीला विरोध असेल. 

ही सर्व सद्य राजकीय परिस्थिती पाहता राष्ट्रवादीकडून श्री. पाटील हेच रिंगणात उतरतील असे दिसते. त्यादृष्टीने त्यांनी तयारीही सुरू केली असून दोन दिवसापुर्वीच वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी माजी खासदार कल्लाप्पा आवाडे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यापुर्वी त्यांना हा वाढदिवसही माहित नसावा किंवा प्रत्यक्ष भेटून कधी शुभेच्छाही दिलेल्या आठवत नाहीत. काल श्री. पाटील यांनी वारणेत जाऊन "जनसुराज्य' चे विनय कोरे यांची भेट घेऊन बंद खोलीत तासभर चर्चा केली. वरवर ही चर्चा ऊस दरावरची असे भासवण्याचा प्रयत्न असला तरी त्यात लोकसभेची पेरणीच झाल्याची शक्‍यता आहे. 

या मतदार संघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदार संघापैकी तीन आमदार शिवसेनेचे, दोन भाजपाचे तर स्वतः श्री. पाटील राष्ट्रवादीचे आमदार आहेत. शिवसेना-भाजपातही सख्य नाही. भाजपावर श्री. शेट्टी तुटुन पडल्याने भाजपाही त्यांच्यासोबत असेलच असे नाही. अर्थिक व संपर्काच्या बाबतीत श्री. पाटील यांचेही पारडे जड आहे. त्यामुळे लोकसभेत हातकणंगले मतदार संघात शेट्टी विरूध्द जयंतराव असाच सामना रंगणार हे निश्‍चित मानले जात आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख