Rajkumar Badole's ambition was to become collector but he became minister | Sarkarnama

राजकुमार बडोलेंना व्हायचे होते कलेक्टर पण झाले मंत्री !

विकास गाढवे
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

 

या कार्यक्रमात पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी श्री. बडोले यांच्या कार्याचे कौतुक केले. सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना लोकाभिमुख करून त्यांनी विभागाला वेगळ्या उंचीवर नेल्याचे ते म्हणाले. इंदुमिलच्या जागेवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व लंडनमधील त्यांचे निवासस्थानाच्या बाबती श्री. बडोले यांच्या पुढाकाराचा त्यांनी गौरव केला. श्री. बडोले यांनीही निलंगेकर यांचे चांगले काम दिसत असून त्यांच्या विभागाकडून घेतलेल्या कामगार नोंदणीत आपल्या जिल्ह्यात सर्वाधिक नोंदणी केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. त्यांच्यामुळेच लातूरला रेल्वे बोगी निर्मितीचा कारखाना आल्याचे त्यांनी  नमूद केले.

लातूर  : लहानपणी आई म्हणायची बापू शाळेत जा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिकून मोठे झाले. त्यांच्या सारखा तुही शिकून मोठा हो. त्यामुळे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी  जिल्हाधिकारी (कलेक्टर) होण्याचा ध्यास घेतला होता . त्यांनी हे स्वप्न उराशी बाळगले होते. युपीएससीची एक पूर्व परीक्षाही दिली होती. त्यात त्यांना यश आले नाही. 

मात्र, स्वतःला कलेक्टर होता आले नाही तरी बार्टीच्या माध्यमातून मागील दोन वर्षात अनेक मुलांना कलेक्टर करून स्वप्न तडीस नेल्याचे समाधान राजकुमार बडोले यांना आहे . 

येथील मागासवर्गीय गुणवंत मुलांमुलींच्या वसतिगृह इमारतीच्या उदघाटनप्रसंगी बुधवारी (ता. 29) त्यांनी कलेक्टर होण्याच्या स्वप्नाची माहिती दिली.

स्थापत्य अभियांत्रिकीचे (डिप्लोमा इन सिव्हील इंजिनिअरिंग) शिक्षण घेतल्यानंतर श्री. बडोले हे जलसंपदा विभागात अभियंता म्हणून नोकरीला लागले. जिल्ह्याचा प्रमुख अधिकारी असलेल्या कलेक्टरचा रूबाब पाहून सर्वांनाच कलेक्टर व्हावे वाटते.  मात्र, त्यांना नेहमी कलेक्टर व्हावे, असे वाटत होते. 

नोकरी करतानाच त्यांनी 1990 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची (युपीएससी) नागरी सेवेची पूर्व परीक्षा दिली. त्यात त्यांना यश आले नाही व पुढेही त्यांनी काही प्रयत्न केले नाहीत. या स्थितीत सामाजिक न्यायमंत्री म्हणून अनेक मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे कलेक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केल्याचा त्यांना मोठा आनंद आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून युपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यात येते. पूर्वी केवळ शंभर विद्यार्थ्यांसाठी असलेली ही योजना त्यांनी दोनशे विद्यार्थ्यांची केली आहे. योजनेचा लाभ घेऊन मागील दोन वर्षात पन्नास मागासवर्गीय विद्यार्थी युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत .

या  विद्यार्थ्यांना आयएएस (कलेक्टर), आयपीएस व अन्य पदावर संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. स्वतःला कलेक्टर होता आले नाही तरी आपल्या समाजातील विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण करता आल्याचे समाधान त्यांना आहे.    

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख