Rajiv Gauda criticizes government | Sarkarnama

सरकारने देशाला कॅशलेस केले : खासदार राजीव गौडा

सरकारनामा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

..

पुणे : चुकीची आर्थिक धोरणे राबवून भाजपने या देशाला "कॅशलेस' केले आहे. सर्व सामान्यांची बचत करण्याची शक्तीही त्यांनी काढून घेतली असल्याची टिका कॉंग्रेसचे खासदार राजीव गौडा आणि प्रवक्‍त्या अमी यागनिक यांनी बुधवारी केली.

खासदार गौडा आणि यागनिक या पुणे दौऱ्यावर आल्या होत्या. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मोदी सरकारच्या करभारावर जोरदार टिका केली. यावेळी शहराध्यक्ष रमेश बागवे, उल्हास पवार, अभय छाजेड, अरविंद शिंदे, आदी उपस्थित होते. यावेळी यागनिक आणि गौडा यांनी गेल्या पाच वर्षातील मोदीच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुंळे देशात कशी मंदीची परिस्थीती निर्माण झाली आहे, यांची माहीती दिली. पुढील काळात याविषयीची माहिती कॉंग्रेस सातत्याने देशातील नागरीकांसमोर मांडण्याचे काम करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

कॉंग्रेस सरकारच्या काळात पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली देशाचा आर्थिक विकासाचा दर टिकून राहीला होता. परंतु, भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर आर्थिक विकासाचा दर घसरत चालला आहे. चुकीची आर्थिक धोरण राबविल्याचा परीणाम भोगावा लागत आहे. नोटबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला पहीला धक्का बसला, त्यानंतर जीएसटीची अंमलबजावणी चुकीच्या पद्धतीने केल्याने भारतीय अर्थव्यवस्थेची घसरण सुरु झाली. देशांत गेल्या 45 वर्षांत प्रथमच सर्वांत जास्त बेरोजगारी निर्माण झाली, असे गौडा यांनी सांगितले.

तर देशाच्या आर्थिक विकासाचा दर हा पाच टक्‍क्‍यापर्यंत खाली आला. खासगी क्षेत्रातील गुंतवणुक गेल्या 16 वर्षांत प्रथमच कमी झाली, औद्योगिक विकास, उत्पादन क्षेत्राचा विकास दर, निर्यात यासर्वच ठिकाणी घसरण सुरू आहे. बॅंकीग क्षेत्रात सुमारे 8 लाख कोटी रुपये इतका एनपीए आहे. बॅंकींग क्षेत्रात 1 लाख 74 हजार कोटी रुपयांचा घोटाळा आहे. जीएसटी जमा होण्यात घट झाली आहे, असेही ते म्हणाले.

"मेक इन इंडीयाचे काय झाले', असा सवाल करून यागनिक म्हणाल्या, "नोटबंदीचे परीणाम आता दिसु लागले आहे. लघुउद्योगाला त्याचा फटका बसला आहे, अनेक कंपन्यांना कुलुप लावण्याची वेळ आली आहे. एकीकडे डिजीटल व्यवहार करण्याची भाषा केली जाते. पण त्याचवेळी इंटरनेटचे नेटवर्कच उपलब्ध नसते अशी स्थिती आहे.''
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख