माझे कामच माझी हॅट्रिक घडवून आणेल : राजेश क्षीरसागर 

..
MLA_Rahesh_Kshirsagar
MLA_Rahesh_Kshirsagar

निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मी कधी काम केले नाही. 2004 च्या शिवसेना उमेदवाराच्या पराभवानंतर अनेकांनी पक्ष सोडला; पण माझी बांधिलकी कायम राहिली. शाखांचा विस्तार केला. त्याचे फळ पहिल्यांदा 2009 व नंतर 2014 ला मिळाले. शिवसैनिक तसेच कोल्हापूरच्या जनतेचा फार मोठा वाटा दोन्ही विजयात आहे. मी कुणालाही राजकीय शत्रू मानले नाही. लोकांना माझे काम दिसते आणि तेच हॅट्रिक  घडवून आणतील. 
 

*निवडणुकीचा आपला अजेंडा कोणता? 
-कोल्हापूर शहरात पूर्वी जे विकास आराखडे झाले त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली नाही. शहरात आज ज्या काही समस्या उभ्या आहेत, त्या विकास आराखड्यामुळे निर्माण झाल्या आहेत. ज्याला जे वाटेल त्याप्रमाणे आरक्षणे टाकली गेली आणि ती उठविली गेली. मतांचे राजकारण डोळ्यांसमोर ठेवून हद्दवाढ होऊ दिली नाही.

मी गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने हद्दवाढीच्या बाजूने उभा राहिलो, मात्र दुर्दैवाने हद्दवाढ झाली नाही. विकासाचे सगळे प्रश्‍न विकास आराखडा आणि हद्दीवाढीसंबंधित आहेत. सर्वच प्रश्‍नांची फार मोठी कोंडी होऊन बसली आहे. अंबाबाई दर्शनाच्या निमित्ताने पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. भविष्यात ही संख्या अधिक वाढणार आहे.

सध्या शहराचा नवा विकास आराखडा तयार सुरू करण्याचे काम सुरू आहे. शासकीय यंत्रणा काम करेल; पण विकास आराखड्यात आरक्षणे नीट टाकली जातात की नाही यासाठी स्वतंत्र दोन आर्किटेक्‍टची नियुक्ती करणार आहे. मनमानी पद्धतीने आराखड्याचे काम होऊ देणार नाही. आराखडा निश्‍चित झाल्यानंतर मुक्त श्‍वास घेण्यास शहर मोकळे होईल. 

*उल्लेखनीय काम कोणते? 
-कोणत्याही घरात एखादी व्यक्ती आजारी पडली की, त्या घराचे अर्थकारण कोलमडून जाते. पैशाच्या अडचणींमुळे कोणत्याही गंभीर आजाराचा मुकाबला कुणीही करू शकत नाही. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अनेकांना मदतीचा हात दिला. अवघड अशा शस्त्रक्रिया प्रसंगी मुंबईत केल्या.

मतदारसंघात सात हजार जणांना वैद्यकीय मदत झाली आहे. अन्य कामे आहेतच; पण आजारी रुग्ण बरा झाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचे जे समाधान आहे, ते पैशात मोजता येणारे नाही. हजारो लोकांना झालेली वैद्यकीय मदत उल्लेखनीय असे काम आहे.

शहरातील अनेक बाग-बगीचे खेळण्याविना खिळखिळे झाल्या होते. आज प्रत्येक बागेत नीटनेटकी अशी खेळणी नजरेस पडतील. ओपन जिम हा अभिनव प्रयोग राबविला. ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्राची उभारणी केली. 

*महापुराचे संकट येऊ नये यासाठी काय करणार? 
- रेडझोनमधील बांधकामामुळे शहरावर पावसाळ्यात महापुराचे संकट उभे राहिले, पूररेषेतील बांधकामामुळे पाण्याचा फुगवटा निर्माण झाला. 

पुराचे पाणी नागरी वस्तीत गेले. ज्यांचा बांधकामाशी काहीही संबंध नाही अशांचे मोठे नुकसान झाले. आमच्या स्तरावर जेवढे शक्‍य आहे तेवढी मदत केली. 2011 ला पंचगंगा नदी परिसरातील भराव त्यामुळे महापुराच्या धोका याकडे विधिमंडळात प्रश्‍न उपस्थित केला.

तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संबंधितावर कायदेशीर कारवाईचे लेखी आश्‍वासन दिले. नऊ वर्षांपूर्वीच महापुराचा धोका ओळखला होता. हे प्रश्‍न विकास आराखड्यासंबंधित आहेत. नियोजित आराखड्यात पूररेषा नव्याने निश्‍चित केली जाईल. यानंतरही बांधकामे केली, तर त्याची गय केली जाणार नाही. 

* महिलांच्या प्रश्‍नावर योगदान काय? 
- गारमेंटच्या माध्यमातून महिलांना रोजगार देण्याचा प्रयत्न केला. भगिनी महोत्सवाच्या माध्यमातून महिला बचत गटांना बळ दिले गेले. भविष्यात भगिनी स्वबळावर मोठ्या व्हाव्यात यासाठी ठोस असा कार्यक्रम आखला जाईल. 

* कोणत्या प्रश्‍नांना प्राधान्य देणार? 
- शाहू मिलच्या जागेत छत्रपती शाहू महाराज यांचे स्मारक आणि गारमेंट पार्क उभारण्याचे स्वप्न आहे. तरुणांच्या हाताला काम मिळण्यासाठी आय. टी. पार्कची उभारणी व्हावी यासाठी विशेष प्रयत्न राहणार आहेत. बेरोजगारीचा प्रश्‍न भेडसावू नये यासाठी आय.टी. पार्कची उभारणी ही काळाची गरज आहे. हैदराबाद हुसेन सागर तलावाच्या धर्तीवर रंकाळा तलाव विकसित करण्याचा प्रयत्न आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com