rajendra gavit said i am member of bjp in shivsena | Sarkarnama

पालघरचे खासदार म्हणतात, " मी भाजपचा प्रतिनिधी म्हणून शिवसेनेत !'' 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 31 डिसेंबर 2019

पालघर : " मी भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केला असला, तरी मी भाजपचा प्रतिनिधी म्हणून शिवसेनेत आहे. मी आता दुसऱ्या कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही, असे पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी म्हटले आहे. गावित हे शिवसेनेचे की भाजपचे असा प्रश्‍न आता पालघरकरांना पडला आहे. 

पालघर : " मी भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केला असला, तरी मी भाजपचा प्रतिनिधी म्हणून शिवसेनेत आहे. मी आता दुसऱ्या कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही, असे पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी म्हटले आहे. गावित हे शिवसेनेचे की भाजपचे असा प्रश्‍न आता पालघरकरांना पडला आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळाच्या 48व्या अधिवेशनाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. गावित हे मुळचे कॉंग्रेसचे. ते या पक्षाचे आमदार म्हणून पालघरमधून निवडून आले होते आणि कॉंग्रेसचे मंत्री राहिले. राज्यात कॉंग्रेस आघाडीचे सरकार पायउतार झाल्यानंतर ते पक्षात राहिले. पुढे भाजपचे पालघरचे खासदार चिंतामन वनगा यांचे निधन झाले. 

त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत ते एकारात्रीत भाजपमध्ये आले आणि तिकिटही मिळविले. तर दुसरीकडे वनगा यांचे कुटुंब भाजपला रामराम करून शिवसेनेत दाखल झाले होते. पोटनिवडणुकीत गावित यांचा विजय झाला. पुढे 2019 मध्ये शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र आले. त्यावेळी ते भाजपमधून शिवसेनेत आले. त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच शिवसेनेत पाठविले होते अशी आजही चर्चा आहे. 

2019 मध्ये ते पुन्हा खासदार झाले ते शिवसेनेचे. आज शिवसेनेत असले तरी भाजप नेत्यांशी त्यांचे आजही उत्तम संबंध आहे. त्यांच्या अवतीभोवती शिवसैनिकांपेक्षा भाजपचेच कार्यकर्ते अधिक दिसून येतात अशी कुजबूज शिवसेनेत नेहमीच सुरू असते. 

त्यातच त्यांनी मी भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केला असला, तरी मी भाजपचा प्रतिनिधी म्हणून शिवसेनेत असल्याचे सांगितल्याने ते नेमके कोणाचे हा प्रश्‍न पडला आहे. आज तर शिवसेना आणि भाजप एकमेकांचे कडवे विरोधक बनले आहेत. त्यामुळे तर गावितांची मोठी अडचणच झाल्याचीही चर्चा पालघरच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख