क्रांतीकारकाच्या नातीची सुराज्यातली भरारी

जर्मन, संस्कृत, इंग्रजी, हिंदी आणि मराठी अशा पाच भाषांवर प्रभुत्व असलेल्या रजनी पाटील यांचा राजकीय प्रवास विलक्षण आहे. गांधी घराण्याशी एकनिष्ठ असलेल्या पाटील यांनी जिल्हा परिषदेचे सभागृह जसे गाजवले त्याच तडफेने संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेतही आपल्या वक्तृत्वाचा परिचय करून दिला.
क्रांतीकारकाच्या नातीची सुराज्यातली भरारी

बीड : देशासाठी हौतात्य पत्करणाऱ्या पिढीत आणि क्रांतीकारकांच्या पोटी जन्म घेतल्याने खासदार रजनी पाटील यांच्या अंगी अंगभूतच धैर्य आहे. बालपणीच 
यशवंतराव चव्हाणांसारख्या सुसंस्कृत नेत्याचा सहवास लाभला आणि त्यांच्या सुसंस्कृतपणाचा प्रभावही त्यांच्यावर पडला. दिवंगत माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या मानसकन्या असलेल्या रजनी पाटील यांचा जिल्हा परिषदेपासून सुरु केलेला राजकीय प्रवास थेट संयुक्त राष्ट्रसंघापर्यत एकूणच त्यांच्या 35 वर्षांच्या राजकीय प्रवासाला गांधी कुटूंबियांचे बळ आणि प्रोत्साहन आहे. 

गदर चळवळीचे संस्थापक आणि 1915 लाहोर येथे मृत्यूदंड झालेले हुतात्मा गणेश पिंगळे यांच्या रजनी पाटील नात तर क्रांतीवीर आत्माराम बापू पाटील त्यांचे वडिल. आत्माराम बापू पाटलांनी 1937 मध्ये सातारा मतदार संघातून देशात दुसऱ्या क्रमांकाने सर्वाधिक मते घेऊन विजय मिळवल्याचा इतिहास आहे. गोवा मुक्तीसंग्रामातील सहभामुळे त्यांना तुरुंगवासही सहन करावा लागला. देशासाठी बलिदान देणाऱ्या आणि पंडित नेहरु व महात्मा गांधींच्या विचारांशी एकनिष्ठ असलेल्या कुटूंबात जन्मलेल्या रजनी पाटील 1981 पासून राजकारणात सक्रीय झाल्या. केवळ इतिहासात रममाण न होता त्यांनीही स्वकृत्वाने स्वत:च्या कर्तृत्वाची नोंद केली आहे. 

दिवंगत खासदार केशरबाई क्षीरसागरांसारख्या मातब्बर नेत्यावर विजय मिळवण्याची कामगिरीही त्यांनी केली आहे. रजनी पाटील यांनी कॉंग्रेसच्या तत्कालिन अध्यक्षा सोनिया गांधी यांची मर्जी संपादन केल्याने त्यांना नवनवीन संधी मिळत गेल्या. पुणे विद्यापीठातून जर्मन भाषा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असलेल्या रजनी पाटील यांचे मराठी, हिंदीसह इंग्रजी, जर्मन आणि संस्कृत भाषेवरही प्रभूत्व आहे. 

"एनएसयुआय' च्या राष्ट्रीय सचिव, पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्या म्हणूनही त्यांनी काम केले. पक्षांतर्गत पातळीवर सध्या कॉंग्रेसच्या महाराष्ट्र कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा असलेल्या रजनी पाटील यांनी महिला प्रदेश कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदी भूषविलेले आहे. एनएसयुआयच्या राज्य आणि राष्ट्रीय सचिव पदावर काम करण्याची संधीही त्यांना मिळाली. 

खादी ग्रामोद्योग, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या आणि देशभर राबता असलेल्या केंद्रीय समाज कल्याण बोर्डाच्या अध्यक्षपदाचा मानही त्यांना युपीए सरकारच्या काळात मिळाला. सध्याही त्या बॅंकर्स, महिला सक्षमीकरण, पर्यावरण, राजभाषा अशा महत्वाच्या समित्यांचे केंद्रात प्रतिनिधित्व करत आहेत. पाटील यांनी ऑलिंपिक पाहणी समिती, कॉमनवेल्थ गेम नियोजन समिती सदस्या म्हणूनही जबाबदारी पेलेली आहे. 

माजी मंत्री अशोक पाटील यांच्यासोबत विवाह झाल्यावरही त्या राजकारणात सक्रीय राहिल्या. शिक्षण, सहकार आणि महिलांसाठी काम करत असताना त्या बिनविरोध जिल्हा परिषद सदस्या झाल्या. त्यानंतर त्यांनी मातब्बर आणि मुरब्बी राजकारणी म्हणून ओळख असलेल्या दिवंगत केशरबाई क्षीरसागरांचा पराभव करत संसदेत प्रवेश केला. केंद्रीय पातळीवरील काम करण्याची त्यांची क्षमता ओळखून सोनिया गांधींनी त्यांना दिवंगत विलासराव देशमुख यांच्या निधनाने रिक्त झालेल्या राज्यसभेतील जागेवर काम करण्याची संधी दिली. म्हणूनच त्या यूपीए सरकारच्या काळात युनोमध्ये प्रतिनिधीत्व करु शकल्या. युनायटेड नेशनच्या जनरल असेंब्लीमध्ये भाषण देण्याचा मानही त्यांना मिळाला आहे. 

जिल्हा परिषदेपासून त्यांचा सुरु झालेला प्रवास सध्या राज्यसभा सदस्यापर्यंत पोचला आहे. मधल्या काळात त्यांनी सिनेटपासून राज्य आणि केंद्रातील विविध समित्या आणि महामंडळांचे अध्यक्षपद तसेच पक्षसंघटनेतील महत्वाची पदे सांभाळली. जर्मन भाषेचे ज्ञान असलेल्या रजनी पाटलांनी जर्मनीत भरलेल्या जागतिक पर्यावरण बदल (क्‍लायमेट चेंज) या विषयावरील परिषदेतही देशाचे प्रतिनिधित्व केले. लंडनच्या क्वीन्स महाविद्यालयात निवडक खासदारांसोबत त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले. पक्षाकडून दक्षिण अफ्रिकेत अफ्रिकन कॉंग्रेसच्या परिषदेत प्रतिनिधीत्व करणाऱ्या रजनी पाटलांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणुकीचा अभ्यास करण्यासाठी पक्षाकडून पाठवण्यात आलेल्या निवडक खासदारांच्या शिष्टमंडळात सहभाग घेतला होता. 

सुसंस्कृतपणा आणि प्रभावी मांडणी 
विविध भाषा ज्ञात असलेल्या रजनी पाटील यांनी आपल्या विषयाची प्रभावी मांडणीची झलक सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या सभागृहात दाखवून दिली. त्याचा प्रवास मग संयुक्त राष्ट्रसंघापर्यंत झाला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com