राजसाहेब, गोळ्या कोणा कोणाला घालायच्या ? 

राज ठाकरे यांनी मरकलना गोळ्या घालण्याची जी भाषा केली ती ही अयोग्य आहे. इतकी टोकाची भूमिका घेऊन कोरोनाचा प्रश्‍न संपेल का ? हाच मुख्य प्रश्‍न आहे. जे लोक लाऊकडॉनचे उल्लंघन करीत आहेत. त्यामध्ये सर्वच धर्माचे लोकही दिसून येतात. त्यामुळे नियम एखाद्या धर्मियांचे लोकच तोडतात असे म्हणणेही योग्य होणार नाही. तसेच देशावर संकट असल्याने प्रत्येकाने आपला देव, धर्म चार भिंतीच्या आत ठेवला पाहिजे हे ही तितकेच खरे आहे.
राजसाहेब, गोळ्या कोणा कोणाला घालायच्या ? 

कोरोनाचे संकट अधिक गडद होताना दिसतेय. संपूर्ण जगावर अधिराज्य गाजविणारा अमेरिकेसारखा देश पार कोलमडून पडलाय. श्रीमंत युरोपातील विकसित राष्ट्रेही या संकटातून सुटली नाहीत.

असे भयावह चित्र जगाचे असताना 130 कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या आणि विविध जातीधर्माचे लोक असणाऱ्या भारताने कोरोनाला कसे रोखले याचे आश्‍चर्य सर्वाधिक अमेरिकेला वाटते. 

ज्या रशियाचा तिरस्कार आणि द्वेष केला त्याच रशियाचीच नव्हे मित्राबरोबर शत्रू राष्ट्रापुढेही अमेरिकेने मदतीसाठी पदर पुढे केला आहे. कोरोनाच्या संकटावर प्रत्येक भारतीय मनापासून लढतोय तरीही काही मंडळींना कोरोनाची भिती वाटत नाहीत. नियम तोडण्यातच ते जर धन्यता मानत असतील तर ही सर्व मंडळी मुर्खाच्या नंदनवनात वावरत आहेत. 

भारतात शेकडो पक्ष आणि विविध विचारसरणी लोक वर्षोनुवर्षे गुण्यागोविंदाने नांदताहेत. मतभेद आहेत. भांडणं आहेत. अगदी टोकाचे विरोधही आहेत तरीही आपल्या देशाचे वैशिष्ठ्य असे की संकटात 130 कोटी जनतेचा बुलंद आवाज चारही दिशेला घुमतो. "जय हिंद', "भारत माता की जय' चा नारा दिला जातो. या नाऱ्याने प्रत्येकाची छाती अभिमानाने फुगते.

हा सर्व इतिहास असताना कोरोनाच्या देशावरील संकटात का एकमेकांवर शिंतोडे उठविले जात आहेत. कोरोनाला नष्ट करूया अशी शपथ आपण घेतली असताना काही मूठभर मंडळी लॉकडाऊनचे उल्लंघन करतात. आज सर्वजाती धर्माची मंदिरे, मशीद, चर्च, बुद्ध विहारे बंद आहेत. जेथे गर्दी कधी हटत नाही अशा देवस्थानात देव बंदिस्त आहेत. तेथे माणसं नाहीत. गर्दी करून दर्शन घेण्याचे आज तरी दिवस नाहीत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लॉकडाऊनला कॉंग्रेसने समर्थन दिले मात्र त्यांची अंमलबजावणी त्यांना खटकली हे कदाचित बरोबरही असू शकते. गरीब माणसाचे हाल होणार नाहीत त्यांची काळजी घ्यायला हवी होती असे कॉंग्रेसला वाटत असेल तर त्यामध्ये चूक असे काही नाही. पुढे तर मोदींनीही गरीबांची माफी मागितली. याचाच अर्थ लॉकडाऊनमध्ये गरीबांचे हाल झाले हे त्यांनी अप्रत्यक्ष मान्य केले. 

दुसरीकडे मोदींनी देशासाठी काही निर्णय घेतले रे घेतले की त्यांच्या प्रत्येक निर्णयला विरोध करण्याची फॅशनही झाली आहे. कदाचित दिवे लावण्याचे समर्थन होऊ शकत नाही पण, टाळी-थाळीत गैर असे काही नव्हते. ज्यांनी रुग्णांची सेवा केली त्यांना आपण सलाम केला होता. भाजपसह मोदीविरोधक असलेल्या पक्षांनीही टाळी वाजविली होती. असो. 

महाराष्ट्रात दंडुकेशाही चालणार नाही 
हे सर्व देशात सुरू असताना महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांची टीमही उत्तम कामगिरी करीतेय. त्यांनाही धन्यवाद दिलेच पाहिजे. त्यांच्या मागे प्रत्येकाने उभे राहिले पाहिजे. राज्यात या मुद्यावर राजकारण झाले नाही असे नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सरकारला काही सूचना देताना पोलिसांच्या दंडुकेशाहीवर प्रश्‍न उपस्थित केला होता. त्याचा समाचार घेताना शिवसेनेचे नेते संजय राऊत त्यांच्यावर घसरले. 

विरोधकांना दंडुके पडले पाहिजेच असा प्रहार केला. खरेतर विरोधकांच्या एखाद्या सुचनेवर इतकी टोकाची भूमिका घेणे योग्य नव्हते. हे येथेच थांबले नाही. भाजपच्या माजी कृषिमंत्र्यांनी राऊना श्‍वान म्हटले.

इकडेतिकडे थोड राजकारण झाले.परंतु सर्वानीच सरकारला पाठिंबा दिला. प्रत्येकजण गरीबांना मदत करतो आहे. लोक घरी बसले आहेत. हे स्वागतार्ह आहे. काहीही असो पोलिसांचीच नव्हे तर कोणत्याच पक्षाची दंडुकेशाही चालणार नाही ! 

दुसरीकडे मरकलप्रकरण गाजतेय. आरोग्य कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली जातेय. एकत्र जमण्यास विरोध करणाऱ्या पोलिसांवर हल्ले होताहेत. ज्या महिला नर्स रूग्णांवर उपचार करीत आहेत. त्यांच्याशी अश्‍लिल चाळे करून विनयभंग केला जात आहे. हे संताप आणणारे आहे.

वास्तविक मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत संताप व्यक्त करीत मरकलना तर गोळ्या घातल्या पाहिजेत असे वादग्रस्त विधान केले. राज यांची चीड समजण्यासारखी आहे. 

राज यांनी मरकलना गोळ्या घालण्याची जी भाषा केली ती ही अयोग्य वाटते. इतकी टोकाची भूमिका खरंच घेता येईल ? हा प्रश्‍न आहे. आज मरकलच नव्हे जे लोक लाऊकडॉनचे उल्लंघन करीत आहेत. रस्त्यावर बिनधास्त फिरत आहेत. त्यामध्ये हिंदुसह सर्वच धर्माचे आणि इतर जातीचे लोकही दिसून येतात. त्यामुळे नियम एखाद्या धर्मियांचे लोकच तोडतात असे म्हणणेही उचित ठरणार नाही. 

येथे एक गोष्ट मुद्दाम नमूद करावीशी वाटते की आपल्या राज्यातही मशीदी आहेत. मालेगावला सर्वाधिक आहेत. गावगाड्यातील मराठी मुसलमान संकटात राज्य सरकारला सहकार्य करीत आहे. तो कुठेही चुकीची भूमिका घेत नाही. तो लॉकडाऊनचे उल्लंघन करीत नाही. शुक्रवारची नमाज बंद आहे हे चित्रही समाधान देणारे आहे. स्वत: मुस्लिम नेत्यांनी याकामी पुढाकार घेतला आहे हे ही विशेष. 

आज देशात कोरोना पसरला त्याला केवळ मुस्लिम जबाबदार आहेत असेही म्हणता येणार नाही. हे थोड डोकं शांत ठेवून विचार करण्याची गरज आहे. देशभरात ज्यांना कोरोना झाला आहे ते सर्वजाती धर्माचे लोक आहेत. कोरोनाचे संकट देशावर आहे.

त्यामुळे प्रत्येकांने देशाचा विचार करावा. जे ऐकायला तयार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी. यापुढे रस्त्यावर मान करून फिरणाऱ्यांना तुरूंगांत डांबले पाहिजे. मात्र गोळ्या घालून प्रश्‍न सुटणार नाही. राज ठाकरेंची भावना समजण्यासारखी असली तरी गोळी घालण्याचे समर्थन कदापि होऊ शकत नाही. 

तसे असते तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कधीच तसे आदेश दिले असते. त्यांनाही माहित आहे आपला देश विविध रंगाने नटला आहे. थोडे सबुरीनेच घ्यावे लागणार. कोरोनासारखे संकट पुन्हा येणारच नाही असे नाही. प्रत्येक भारतीयाने साथ दिल्यानेच आपण युद्ध जिंकत आणले आहे. आणखी थोडा धीर धरला, संयम राखला तर हे संकटही दूर होईल. अवघड असे काहीच नाही. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com