मिसळ पार्टीनंतर आता मैत्रीदिनी शिवेंद्रसिंहराजे आणि नरेंद्र पाटलांची " टी' पार्टी ...

 मिसळ पार्टीनंतर आता मैत्रीदिनी शिवेंद्रसिंहराजे आणि नरेंद्र पाटलांची " टी' पार्टी ...

सातारा : लोकसभा निवडणुकीपूर्वी माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील आणि साताऱ्याचे राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी साताऱ्यात एकत्र मिसळ खाल्ली होती. त्याचा ठसका अनेकांना लागला पण तो निवडणुकीच्या मतांमध्ये दिसला नाही, तरीही नरेंद्र व शिवेंद्रसिंहराजेंची मैत्री कमी झाली नाही. आज मैत्रीदिनी पुन्हा दोघांनी एकत्र येत त्याच हॉटेलमध्ये चहा पार्टी केली. यावेळेस शिवेंद्रसिंहराजे भाजपमधून साताऱ्यातून निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे आता नरेंद्र पाटील विधानसभा निवडणुकीत मैत्री धर्म पाळणार का, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. 

साताऱ्याचे माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व माथाडीचे नेते आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची मैत्री सर्वज्ञात आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी उदयनराजेंना राष्ट्रवादीकडून तिकिट जाहीर होण्यापूर्वी नरेंद्र पाटील यांनी भाजपच्या माध्यमातून सातारा लोकसभेसाठी शड्डू ठोकला होता. संपर्क मोहिमेदरम्यान, त्यांनी शिवेंद्रसिंहराजेंसोबत साताऱ्यातील चंद्रविलास हॉटेलमध्ये एकत्र येऊन मिसळ खाल्ली होती. 

या दोन नेत्यांनी खालेल्या मिसळेची जोरदार चर्चा रंगली. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान शिवेंद्रसिंहराजेंनी, मी मिसळ खाल्लीच नव्हती मी पोहे खाल्ले होते, असे सांगून नरेंद्र पाटलांच्या मिसळीला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर लोकसभा निवडणुक झाली. यामध्ये उदयनराजेंविरूध्द नरेंद्र पाटील अशी लढत झाली. यामध्ये उदयनराजे दीड लाखांवर मतांनी निवडुन आले. पण नरेंद्र पाटील यांना साडे चार लाखांपेक्षा अधिक मते मिळाली. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजेंनी नरेंद्र पाटील यांना सातारा जावलीतून मदत केली नाही, हे स्पष्ट झाले. 

उदयनराजेंना सर्वाधिक मताधिक्‍क्‍य सातारा मतदारसंघानेच दिले. आता शिवेंद्रसिंहराजेंनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर नरेंद्र पाटील हे शिवसेनेत आहेत. आज नरेंद्र पाटील साताऱ्यात आल्यावर त्यांनी शिवेंद्रसिंहराजेंची भेट घेतली. तसेच मैत्रीदिनाच्या निमित्ताने त्याच हॉटेलमध्ये दोघांनी आज कोरा चहा घेतला. हा चहा घेताना मराठा क्रांती मोर्चाचे काम, महामंडळाचे काम आणि राजकीय हालचालींवर दोघांच्या गप्पा झाल्या. आता विधानसभा निवडणुकीसाठी शिवेंद्रसिंहराजे साताऱ्यातून भाजपचे इच्छुक आहेत. त्यामुळे आता नरेंद्र पाटील विधानसभा निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजेंना मदत करून मैत्रीधर्म पाळणार का, याची उत्सुकता सर्वांना आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com