राज ठाकरेंचा रामदास आठवलेंना पुण्यातील पोटनिवडणुकीसाठी "शब्द' 

राज ठाकरेंचा रामदास आठवलेंना पुण्यातील पोटनिवडणुकीसाठी "शब्द' 

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची एकमेकांवर टीका करण्याची स्टाइल सर्वश्रुतच आहे. अनेकदा त्यातून लोकांचे मनोरंजनच अधिक होते. मात्र पुण्यातील पोटनिवडणुकीमुळे या दोन्ही संवेदनशील नेत्यांनी एकमेकांशी संवाद साधत रिपब्लिकन पक्षाला सहकार्याचा शब्दही राज ठाकरे यांनी आठवले यांना दिला. 

आठवले असो किंवा राज ठाकरे, या दोन्ही मोठ्या नेत्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांची अवघ्या महाराष्ट्राला चांगलीच जाण आहे. काही वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी एका सभेमध्ये आठवले यांची केलेली नक्कल आणि त्यास आठवले यांनी आपल्या शीघ्र कवितेतून दिलेले सडेतोड उत्तर आजही "यू ट्युब'वर गर्दी खेचत आहे. या दोन्ही नेत्यांचा "प्लस पॉइंट' म्हणजे त्यांचे जिवाभावाचे कार्यकर्ते. याच कार्यकर्त्यांमुळे या दोन्ही नेत्यांमध्ये काही क्षणांचा का होईना, परंतु काही दिवसांपूर्वी संवाद घडला. 

त्याचे घडले असे. पुण्याचे उपमहापौर व रिपब्लिकन पक्षाचे नेते नवनाथ कांबळे यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर झालेल्या शोकसभेमध्ये सगळ्याच प्रमुख राजकीय पक्षांनी कांबळे यांच्या कन्या हिमाली कांबळे यांना बिनविरोध निवडून आणण्याबाबतची घोषणा केली. कॉंग्रेस, शिवसेनेप्रमाणे मनसेनेही पाठिंबा दिला. त्यानुसार कोरेगाव पार्क- घोरपडी या प्रभाग 21 साठी काही दिवसांपूर्वीच पोटनिवडणूक जाहीर झाली. दरम्यान 18 सप्टेंबरला शिर्डी येथे रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीवेळी पक्षाचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, परशुराम वाडेकर, बाळासाहेब जानराव, असित गांगुर्डे यांनी पुण्यातील पोटनिवडणुकीविषयी चर्चा करण्यासाठी आठवले व राज ठाकरे यांच्याशी फोनद्वारे चर्चा घडवून आणली. 

आठवले यांनी दिवंगत कांबळे यांनी पक्षासाठी दिलेले योगदानाबद्दलची माहिती ठाकरे यांना दिली. तसेच शोकसभेमध्ये मनसेने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेविषयी आभार मानत निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी विनंती केली. त्यावर ठाकरे यांनी आठवले यांना "तुमची काय इच्छा आहे' असा प्रश्‍न केला. आठवले यांनी "निवडणूक बिनविरोध होण्यासाठी तुमचा पाठिंबा मिळावा' अशी इच्छा व्यक्त केली. त्यावर "झाली बिनविरोध' अशा शब्दात राज ठाकरे यांनी आठवले यांना शब्द दिला.

आपल्यासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्याच्या प्रेमाखातर कुठल्याही अटी न ठेवता सहकार्याची भूमिका घेणाऱ्या या दोन संवेदनशील नेत्यांमधील दोन-चार मिनिटांच्या संवादाने कार्यकर्त्यांना मात्र हत्तीचे बळ मिळाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com