मनसे 'मन से' नाही तर केवळ 'राज' हुकूमावर चालणार - Raj Thakre Kalyan Dombivli Tour | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

मनसे 'मन से' नाही तर केवळ 'राज' हुकूमावर चालणार

शर्मिला वाळुंज
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

सततच्या पराभवामुळे संघटनेची होत असलेली घसरण लक्षात घेता राज ठाकरे यांनी आता पक्षाची सर्वसुत्रे स्वतःच्या हाती घेतली आहेत. राज यांच्या या भूमिकेमुळे आता मनसे पक्षात राज यांच्याशिवाय एकही पान हलणार नाही अशीच व्यवस्था त्यांनी केली असल्याचे त्यांना कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावरुन दिसून आले.

ठाणे - सततच्या पराभवामुळे संघटनेची होत असलेली घसरण लक्षात घेता राज ठाकरे यांनी आता पक्षाची सर्वसुत्रे स्वतःच्या हाती घेतली आहेत. राज यांच्या या भूमिकेमुळे आता मनसे पक्षात राज यांच्याशिवाय एकही पान हलणार नाही अशीच व्यवस्था त्यांनी केली असल्याचे त्यांना कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावरुन दिसून आले.

कल्याण डोंबिवलीत राज यांनी पक्षाची नवी कार्यकारिणी जाहीर केली असून प्रत्येकाला त्याचे कामही वाटून दिले आहे. वर्षभरामध्ये या पदाधिकाऱ्यांच्या कामाचा कस लागणार असून त्यावर त्यांचे पदही टिकून असेल. तसेच राज यांनी सुचविल्यानुसारच प्रत्येकाने आपल्या प्रभागात कार्यक्रम, आंदोलने राबवायची आहेत असा हुकूमही राज यांनी पदाधिकाऱयांशी झालेल्या बैठकीत सोडल्याची माहिती मनसेच्या पदाधिकाऱयांनी 'सकाळ' ला दिली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे हे दोन दिवस कल्याण डोंबिवलीच्या दौऱयावर आले होते. एकीकडे सततच्या पराभवामुळे पक्ष संघटनेची घसरण होत चालली आहे, तर दुसरीकडे पक्षातील काही कार्यकर्ते हे पक्ष नेतृत्वांशी कोणतीही चर्चा न करता स्वतःच आंदोलन, कार्यक्रम घेत होते. यामुळे कोठेतरी पक्षाच्या प्रतिमेला तडा जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. हे पहाता पक्षाची पुन्हा एकदा मोट बांधणी करण्यासाठी राज कल्याण डोंबिवलीच्या दौऱयावर आले होते. पक्षाच्या इंजिनाला आता स्वतःच दिशा दाखविण्याचे त्यांनी ठरविले असून त्यानुसार त्यांनी डोंबिवलीत पक्षाचे शाखाअध्यक्ष, उपशाखाध्यक्ष, गट अध्यक्ष, प्रभागअधिकारी, महिला संघटक यांची बैठक घेतली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर राज यांनी नव्या कार्यकारिणीची निवड प्रसिद्ध करीत त्यांना काही सुचना केल्या. या सुचनांमध्ये पदाधिकाऱयांनी आपआपसातील मतभेद हे पक्षाच्या बाहेर ठेवून पक्षासाठी एकत्र काम करायचे आहे. नव्या कार्यकारिणीनुसार राज यांनी स्वतः प्रत्येकाच्या कामाची विभागणी करत त्यांना त्यांचे काम समजावून दिले. तसेच प्रत्येकाने केवळ आपले काम पहायचे असून दुसऱयाच्या कामात ढवळाढवळ करु नका असे सांगत पदाधिकाऱयांची कानउघडणी केली. कार्यकरत्यांनी केलेल्या कामाचा आढावा राज यांना पाठवायचा असून त्यावर राज यांचे बारीक लक्ष रहाणार आहे. प्रत्येक वर्षाला या कामाचा आढावा घेतला जाऊन जो नियमांचे पालन करणार नाही त्यांच्या हातून पद काढून घेतले जाईल असेही राज यांनी यावेळी सांगितल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली.

राज यांनी केलेल्या सुचना
1) प्रत्येक प्रभागात शाखाअध्यक्ष, उपशाखाध्यक्ष, गटअध्यक्ष, नगरसेवक, प्रभाग अधिकारी यांनी एकत्र फिरुन प्रभागाचा आढावा घ्यायचा आहे. कोणीही एकट्याने आपला प्रचार करत फिरायचे नाही.

2) प्रभागातील कामाचा आढावा राज ठाकरे यांना पाठवायचा आहे.

3) पक्षातील पदाधिकाऱयांनी त्यांना ठरवून दिलेले काम, कार्यक्रम ऐवढेच पहायचे आहे.

4) राज यांनी सांगितल्याप्रमाणेच कार्यकर्त्यांनी प्रभागात कार्यक्रम राबवायचे आहेत, आंदोलनात सहभाग घ्यायचा आहे. हे काम होत आहे की नाही यावर राज यांचे लक्ष रहाणार आहे.

5) येणाऱया काळात पक्ष, विकासाचे प्रश्न, नागरि समस्या कशा सोडवाव्यात याविषयी राज यांनी कार्यकर्त्यांना यावेळी अत्यावश्यक सुचना केल्या.

6) प्रत्येकाने पहिल्यापेक्षा जास्त काम करायचे असून प्रत्येकाकडून राज यांना अपेक्षा असल्याचे त्यांनी बैठकीत सांगितले

7) आपआपसातील मतभेद पक्षाच्या बाहेर ठेवून पक्षासाठी एकत्र काम करा. पक्षामधील कार्यकर्त्यांमध्ये मतभेद आहेत हे यापुठे चालणार नाही, एकमेकांशी जुळवून घ्या.

मतदारांशी नव्याने सलोखा निर्माण करा...
आगामी निवडणुका लक्षात घेता राज यांनी आत्तापासून पक्षाची पुन्हा एकदा बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. प्रभागातील मतदारांशी संपर्क साधून त्यांच्याशी एक वेगळे नाते तयार करा असा सल्ला बैठकीत राज यांनी दिला. प्रभागातील प्रत्येक घरात जाऊन त्या घरातील मतदारांची नावे, त्यांची जन्मताऱीख व शिक्षण अशी माहिती संकलीत करुन ती 30 नोव्हेंबर पर्यंत राज यांना पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख