Raj Thakray gears up his party in Marathwada | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

राज ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याने मनसेला उभारी 

जगदीश पानसरे 
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

औरंगाबादचे व्हिजन जाणून घेत असतांना राज ठाकरे यांचे व्हिजन मात्र येत्या वर्षात होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा  निवडणूकाच असल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. 

औरंगाबादः मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक पाठोपाठ  राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठवाडा विभागावर लक्ष  केंद्रीत केले आहे असे दिसते .  आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकंमध्य महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभेच्या आणि विधानसभेच्या काही जागा लढवणार अशी चिन्हे दिसत आहेत . राज ठाकरेंच्या लागोपाठच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांना उभारी आली आहे . 

राज ठाकरे यांनी  दीड महिन्यात औरंगाबादसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांचा दौरा केलेला आहे . त्यामुळे  आतापर्यंत राज ठाकरेंच्या आदेशाची वाट पहात बसलेल्या मनसैनिकांमध्ये देखील या दौऱ्याने जान आली आहे .  नजीकच्या काळात पक्षाला चांगली उभारी आलेली पहायला मिळेल असे बोलले जाते. 

दीड महिन्यापुर्वी मराठवाड्याचा दौरा अर्ध्यावर सोडून गेलेले मनसे प्रमुख राज ठाकरे बुधवारी (ता.29) औरंगाबादेत दाखल झाले. ज्या उत्साहात कार्यकर्त्यांनी चिकलठाणा विमानतळापासून वाहन रॅली काढत त्यांचे स्वागत केले ते चित्र मनसेच्या नेत्यांना सुखावणारे होते. 

औरंगाबाद आणि मराठवाड्याशी तसा राज ठाकरे यांचा अगदी 90-95 पासूनचा संबंध.  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून राज यांनी राजकारणाचे बाळकडू घेतले . बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरे त्या काळात  मराठवाडा दौऱ्यात  अनेकदा आले होते .  बाळासाहेबांचे धगधगते, ज्वलंत विचार ऐकूनच राज यांनी त्यांची कार्यशैली अंगीकारली. 

शिवसेनेत असतांना महापालिका, विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने औरंगाबादेत राज ठाकरे यांच्या स्वतंत्र सभांना देखील प्रचंड प्रतिसाद मिळायचा. सिडको-हडको या भागात राज यांच्या जाहीर सभा हमखास ठेवल्या जायच्या. अनेक तालुक्यांच्या ठिकाणी देखील त्यांच्या सभा होत असत . 

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर मनसेची स्थापना केल्यानंतरही राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग औरंगाबाद व मराठवाड्याच्या इतर जिल्ह्यात पहायला मिळतो. एवढेच नाही तर शिवसेनेतील अनेक नेते, पदाधिकारी यांना आजही राज ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती आणि आपुलकी असल्याचे ते खाजगीत बोलतात. 

बाळासाहेबांनी जशी शिवसेनेची स्थापना करतांना आधी मुंबई आणि मग राज्यातील इतर भागात प्रचार आणि प्रसार केला, अगदी त्याच पध्दतीने राज ठाकरे यांच्या मनसेची वाटचाल देखील सुरू असतांना दिसते. 2009 च्या लोकसभा आणि विधानसभेत राज ठाकरे यांचा करिश्‍मा चालला पण, 2014 मधील मोदी लाटेत मनसे दूर फेकली गेली. 

आता झाले गेले विसरून राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मनसेचे  इंजिन स्टार्ट केले आहे. गेल्या महिन्यात मराठवाडा विशेषता औरंगाबादेत आल्यानंतर त्यांनी काही संघटनात्मक बदल करत पक्षाची बांधणी केली. पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या नियुकत्या करत त्यांना भविष्यातील वाटचाल आणि मनसेच्या व्हिजनची कल्पना देत कामाला लागण्याचे आदेश दिले. नवे काही करून दाखवण्याची जिद्द असणाऱ्या तरुणांना संधी देणार असे आवाहन केल्यानंतर मनसेकडे येणाऱ्या तरूणांचा ओढा देखील वाढला. 

औरंगाबाद व्हिजन कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी (ता. 30) राज ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. डॉक्‍टर, वकील, इंजिनिअर, व्यापारी, उद्योजक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या आपल्या पक्षाकडून काय अपेक्षा आहे याचा आढावा राज ठाकरे यांनी घेतला. औरंगाबादचे व्हिजन जाणून घेत असतांना राज ठाकरे यांचे व्हिजन मात्र येत्या वर्षात होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा  निवडणूकाच असल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. 

शहरातील कचरा, रस्ते आणि पाणी या मुलभूत प्रश्‍नावरून लोकांमध्ये असलेल्या प्रस्थापित सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील संतापाला वाट मोकळी करून देण्यासाठी एकदा मनसेला संधी द्या ,असे आवाहन राज ठाकरे यांनी उपस्थितांना केले. औरंगाबादचे व्हिजन कसे साकारणार हे सांगताना राज ठाकरे यांनी नाशिक विकासातीळ मनसेचे योगदान सांगितले . आता प्रत्यक्षात नाशिकमध्ये जे झाले ते इथे होणार का? त्यासाठी मनसेला औरंगाबादकर सत्ता देणार का? हे भविष्यात दिसून येईल. 

सुदाम सोनावणे  मनसेला बळ देणार 

राज ठाकरे यांच्या दौऱ्या निमित्त शहरातील काही महत्वाचे पदाधिकारी मनसेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा होती. या संदर्भात मनसेकडून गुप्तता पाळण्यात आल्यामुळे काही धक्कादायक नावे समोर येतील अशी अपेक्षा होती. पण शिवसेनेचे माजी महापौर सुदाम (मामा) सोनवणे वगळता सध्या तरी मनसेच्या गळाला कुणी लागलेले नाही. 

सिडको-हडको सारख्या हिंदुबहुल भागात सुदाम सोनवणे गेल्या 20 वर्षापासून कार्यरत आहेत. कार्यकर्त्यांचे मोहळ आणि दांडगा संपर्क या जोरावरच शिवसेनेने त्यांना महापौर पदाची संधी दिली होती. कालांतराने नारायण राणे यांनी शिवसेना सोडली आणि पाठोपाठ त्यांचे खंदे समर्थक समजले जाणारे सुदाम मामाही बाहेर पडले. 

पुढे नारायण राणे यांचेच राजकीय भवितव्य धोक्‍यात आल्यामुळे सुदाम सोनवणे देखील केवळ नामधारीच राहीले. राजकारणात सक्रीय नसतांनाही त्यांच्याकडील कार्यकर्त्यांची गर्दी मात्र कमी झालेली नाही. त्यामुळे त्यांच्या पक्ष प्रवेशाने मनसेला फायदाच होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. सुदाम सोनवणे यांच्याशिवाय एक अपक्ष आणि एक राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचा मनसेत प्रवेश होणार असे सांगितले जात होते. मात्र त्यांनी त्याला नम्रपणे नकार दिल्याचे कळते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख