शहर अभियंत्यांना घेराव घालण्याचा मनसेचा इशारा

शहर अभियंत्यांना घेराव  घालण्याचा मनसेचा इशारा

नवी मुंबई : 21 व्या शतकातील शहराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नवी मुंबई शहरातील एकमेव असणाऱ्या विष्णुदास भावे नाट्यगृहाची दुरवस्था व समस्यांमध्ये दिवसेंगणिक वाढच होत चालली आहे. गेल्या शनिवारी षडयंत्र या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग सुरु होण्याअगोदर नाट्यगृहातील टेलीक्‍लाइंबर मशिन स्लॅब वरून स्टेजवर पडले. याप्रकरणी नवी मुंबई महापालिका प्रशासनाला नाट्यप्रेमी अथवा नाट्य कलावंत मेल्यावरच पालिका प्रशासनाला जाग येणार काय, असा संतप्त सवाल उपस्थित करत नवी मुंबई मनसेचे अध्यक्ष गजानन काळे यांनी शहर अभियंता मोहन डगांवकर यांनाच घेराव घालण्याचा इशारा दिला आहे. 
मराठी नाट्यचळवळ रुजविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या गजानन काळेंनी गेल्या पाच वर्षात नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडे वाशीतील महापालिकेच्या विष्णूदास भावे नाट्यगृहाविषयी पाठपुरावा केलेला आहे. तीन वर्षापूर्वी महापालिकेच्या आयुक्तांसोबत विष्णुदास भावे नाट्यगृहाचा पाहणी दौरा आयोजित करून भावे नाट्यगृहाच्या समस्या आयुक्तांच्या निदर्शनासही आणून दिल्या होत्या. मनसेच्या पाठपुराव्यामुळे काही दिवसापूर्वीच पालिका प्रशासनाला विष्णुदास भावे नाट्यगृहाविषयी विकास आराखडा बनविण्यास भागही पडले होते. 
नाट्यगृहातील - वातानुकूलित प्लांटच्या अवस्थेपासून ते तालीम रूम, स्टेज, रेस्ट रूम पासून ते खुर्च्या या सगळ्याचीच दुर्दशा झाली असून आता डागडुजी न करता नव्याने विकास आराखडा करून या नाट्यगृहाचे काम होणे गरजेचे असल्याची बाब मनसेने सातत्याने मनपा प्रशासनाच्या लक्षात आणून दिली होती. नवी मुंबई मनसे चित्रपट सेनेने नाट्यगृहाचा विकास आराखडा जाहीर करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. या इशाऱ्यानंतर मनपाच्या अभियंता विभागाने नाट्यगृहाचा विकास आराखडा जाहीर केला. मात्र हा विकास आराखडा अंमलात आणायला वेळ का लागतोय असा प्रश्‍न चित्रपट सेना शहर संघटक श्रीकांत माने यांनी यानिमित्ताने उपस्थित केला आहे. 
यापुढे जर अशी एखादी घटना घडली आणि जीवितहानी झाली तर मनपा प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसे करेल असे मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी म्हटले आहे. यापुढे नाट्यगृहात येताना जीव मुठीत घेऊनच प्रेक्षकांनी यावे अशी इच्छा मनपा प्रशासनाची दिसत असल्याचे देखील सांगत गजानन काळे यांनी प्रशासनाच्या उदासिनतेविषयी संताप व्यक्त केला आहे. 
एकमेव अशा विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या दुरावस्थे बद्दल स्थायी समिती अथवा महासभेत ही येथील लोकप्रतिनिधी आवाज उठवत नाही याचेही आश्‍चर्य आहे असे मत गजानन काळे यांनी व्यक्त केले आहे. मात्र मनसे भावे नाट्यगृहाच्या समस्यांबद्दल सातत्याने आवाज उठवत राहणार व वेळप्रसंगी शहर अभियंता मोहन डगांवकर यांना घेराव घालण्याचा इशारा गजानन काळे यांनी यावेळी दिला आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com