आता राज ठाकरे दुष्काळावरुन सरकारला धारेवर धरणार  - Raj Thakaray to attack government on drought situation | Politics Marathi News - Sarkarnama

आता राज ठाकरे दुष्काळावरुन सरकारला धारेवर धरणार 

प्रशांत बारसिंग 
बुधवार, 1 मे 2019

 महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिका-यांना दुष्काळाकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.

मुंबई :  लोकसभा निवडणुक प्रचाराची धामधूम संपल्यानंतर  मनसे अध्यक्ष राज ठाकरे  दुष्काळी भागांचे दौरे करणार असल्याचे मनसेच्या प्रवक्त्याने सांगितले . महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिका-यांना दुष्काळाकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.

लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार न उतरवताही भाजपच्या विरोधात दहा मॅरेथॉन सभा घेत राज ठाकरेंनी राजकारण ढवळून काढले आणि सत्ताधारी भाजप-शिवसेनेला धडकी भरवली. निवडणुका संपल्यानंतर राज ठाकरे काहीसे शांत झाले, असे वाटताच पुन्हा एकदा दुष्काळाच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे मैदानात उतरण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. 

महाराष्ट्र दिनाच्या सदिच्छा देण्यासाठी राज ठाकरे यांनी त्यांच्या ट्‌विटर हॅंडलवरुन एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यातून महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देत, राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील दुष्काळ स्थितीबद्दलही चिंता व्यक्त केली आहे.महाराष्ट्रातील दुष्काळाची स्थिती गंभीर आहे. अनेक तज्ञांच्या मते तर यावेळचा दुष्काळ 1972 च्या दुष्काळापेक्षा गंभीर आहे, असे म्हणत राज ठाकरे यांनी राज्यातील दुष्काळाची स्थिती आपल्या पत्रकातून मांडली आहे.

 यावेळी राज ठाकरे यांनी दुष्काळासोबत बेरोजगारी हा विषय जोडत, यातील गांभीर्य दाखवून दिले आहे. राज म्हणतात की," दुष्काळी परिस्थितीवर महाराष्ट्र सैनिक लक्ष ठेवून आहेत आणि जिथे जिथे सरकारी यंत्रणा त्यांच्या कामात दिरंगाई करत आहेत, तिथे तिथे मनसे दणका देत आहेत. पण हे दोन्ही विषय इतके गंभीर आहेत की, तमाम मराठी जनांनी जनमताचा रेटा निर्माण करायला हवा. आणि त्यासाठी 'महाराष्ट्र दिन' याशिवाय दुसरा उत्तम दिवस असूच शकत नाही."
 माझी महाराष्ट्रातील जनतेला विनंती आहे, की दुर्लक्ष करु नका, गाफील राहू नका, असे राज ठाकरे यांनी आज प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून म्हटले आहे.  येत्या काळात राज ठाकरे दुष्काळाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारला धारेवर धरण्याची शक्‍यता आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख