राज ठाकरे ईडीच्या चौकशीला गेल्यानंतर पुत्र अमितनं सांभाळली जबाबदारी..! 

राज ठाकरे ईडीच्या चौकशीला गेल्यानंतर पुत्र अमितनं सांभाळली जबाबदारी..! 

मुंबई : " आपण थोडं बाजूला थांबूयात... अरविंद काही हवं तर सांगा... पोलिसांना पाण्याची सोय करता आली तर करा..', कडक उन्हात झाडांची सावली शोधत राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आपल्या कुटूंबियांसह मनसे कार्यकर्त्यांची काळजी घेत होते. 

उन्हाचा तडाखा व उकाडा असल्याने उभ्या पोलिसांना पिण्यासाठी पाण्याची सोय करा. अशी सूचनाही ते मनसेचे विभागप्रमुख अरविंद गावडे यांना करत होते. 

पिता राज चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात गेल्यानंतर बाहेरची सर्व जबाबदारी त्यांनी हाती घेतली. आई शर्मिला, पत्नी मिताली आणि बहिण उर्वशी यांच्यासोबत काही नातेवाईक व मित्रपरीवारांसोबत ते ईडी कार्यालयाच्या बाहेर सतत व्यस्त होते. 

मनसेचे निष्ठावंत कार्यकर्ते बाहेर शांततेत उभे होते. तर, उपस्थित लोकांनी शांतता राखावी. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार होणार नाही याकडे त्यांचे बारकाईने लक्ष होते. 

आज पहिल्यांदाच अमित यांच्यावर अशाप्रकारची जबाबदारी पडल्याचे चित्र होते. ईडी कार्यालयाच्या बाहेर सतत येरझारा घालताना त्यांची घालमेल सुरू होती. कार्यालायाच्या समोर पोलिसांची थोडी हालचाल झाल्यास त्यांनी लगेचच तिकडे धावत होते. राज कोणत्याही क्षणी बाहेर येतील अशी शक्‍यता असल्याने त्यांची नजर ईडी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशदाराकडे लागलेली होती. 

मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ताब्यात घेतले होते. मात्र, अरविंद गावडे हे पोलिसांना सहकार्य करत शांतता राखण्याचे काम करत होते. या परिसरात पोलिसांनी जमाबंदी लागू केल्याने कार्यकर्त्यांची फार वर्दळ होणार नाही. घोषणाबाजी होणार नाही. यावर त्यांचे कटाक्षाने लक्ष होते. यावेळी पक्षाचे प्रसिध्दीप्रमुख सचिन मोरे यांच्याशी ते सतत चर्चा करत काळजी घेत होते. 

राज ठाकरे यांच्यावर पहिल्यांदा अशाप्रकारचा प्रसंग आल्यानंतर धिरोदात्तपणे ते कुटूंबाची जबाबदारी सांभाळण्यात असल्याचे चित्र होते. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी छायाचित्र काढण्याची लगबग केल्यास कृपया नका फोटो काढू. चित्रीकरण नका करू. असे कुजबुजत ते त्यांच्या कामात व्यस्त होत होते. संपुर्ण दिवसभर ठाकरे कुटूंबिय ईडी कार्यालयाच्या बाहेर उपस्थित होते. मनसे कार्यकर्ते देखील शांतता व संयम बाळगून उभे असल्याने पोलिसांचा ताण हलका झाल्याचे चित्र परिसरात होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com