नेतृत्वहीन रायगड कॉंग्रेस खिळखिळी; ग्रामपंचायत निवडणुका कोणाच्या भरवशावर लढायच्या : कार्यकर्त्यांचा प्रश्न  - Raigad news - congress debacle | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

नेतृत्वहीन रायगड कॉंग्रेस खिळखिळी; ग्रामपंचायत निवडणुका कोणाच्या भरवशावर लढायच्या : कार्यकर्त्यांचा प्रश्न 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

प्रदेशाच्या बेपर्वाईमुळेच रायगड कॉंग्रेस नेतृत्वहीन झाली आहे. असे असले तरी कॉंग्रेसला मानणारे पनवेलसह रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे पक्षाला संजीवनी मिळणे गरजेचे आहे. 
- शशिकांत बांदोडकर, सरचिटणीस, रायगड जिल्हा कॉंग्रेस

मुळात पक्षांतर्गत निवडणुकांमुळे रायगड जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत यांनी दिलेला राजीनामा प्रदेश कॉंग्रेसने स्वीकारलेला नाही. नवी कार्यकारिणी जाहीर होईपर्यंत लौकिक अर्थाने अध्यक्ष म्हणून नव्हे, तर काळजीवाहू म्हणून त्यांनीच काम पाहावे, असे अभिप्रेत आहे. पनवेल महापालिका क्षेत्राची नवी जिल्हा कॉंग्रेस कार्यकारिणी जाहीर होणार असून जिल्हाध्यक्ष आणि महापालिका अध्यक्ष या वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
- डॉ. भक्तिकुमार दवे, ज्येष्ठ नेते, रायगड कॉंग्रेस 

नवीन पनवेल - सिंधुदूर्ग जिल्ह्यात नारायण राणेंनी केलेल्या राजकीय सीमोल्लंघनानंतर सिंधुदूर्ग कॉंग्रेस बरखास्त करून जिल्ह्याध्यक्षांची नेमणूक केली आहे. मात्र पक्षांतर्गत निवडणुकीचे कारण सांगून रायगड कॉंग्रेसला जिल्हाध्यक्षांची नेमणूक केली जात नाही. त्यामुळे रायगडवर अन्याय होत असल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया रायगड जिल्हा कॉंग्रेसचे सरचिटणीस शशिकांत बांदोडकर यांनी दिली आहे. सातत्याने दुजाभाव होत असून नेतृत्वहीन रायगड कॉंग्रेस खिळखिळी झाली आहे, असेही ते म्हणाले.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या धामधुमीत रायगडसह पनवेलमध्ये कॉंग्रेसचे अस्तित्वच दिसत नाही. कारण रायगड कॉंग्रेस नेतृत्वाविना काम करत आहे. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्यामुळे कॉंग्रेसला संजीवनी मिळाली होती. त्यांच्या भाजप प्रवेशाने ती पुन्हा गतप्राण झाली आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत खारघर टोलच्या मुद्द्यावर तत्कालीन कॉंग्रसचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर भाजप  प्रवेश करून त्यांनी कॉंग्रेसच्या अस्तित्वालाच आव्हान दिले. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि पनवेल महापालिकेच्या निवडुकीत कॉंग्रेसला अपयश आल्याने जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा देऊन दोन महिने झाले, तरी नवीन जिल्हाध्यक्षांची नेमणूक होत नसल्याची खंत कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत.

बॅरिस्टर अंतुलेंच्या जिल्ह्यात कॉंग्रेसची वाताहत होत असून कॉंग्रेसच्या राज्य कार्यकारिणीकडून दुजाभावाची वागणूक मिळत असल्याचे दिसत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणाच्या भरवशावर निवडणुका लढायच्या, हा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. माजी जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत यांचा राजीमामा स्वीकारला नसल्याचे प्रदेश कॉंग्रेसकडून सांगण्यात येत असले तरी पेणस्थित माजी मंत्री रवीशेठ पाटील, महाडचे माजी आमदार माणिकराव जगताप आणि उरणचे कामगारनेते महेंद्र घरत यांच्या जिल्हाध्यक्षपदासाठी हालचाली सुरू असल्याचे खात्रीशीर सूत्रांकडून समजते. त्यातच कार्यकर्त्यांना पक्षांतर्गत निवडणुकीचे कारण सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न पक्षश्रेष्ठींकडून होत आहे. 

प्रदेशाच्या बेपर्वाईमुळेच रायगड कॉंग्रेस नेतृत्वहीन झाली आहे. असे असले तरी कॉंग्रेसला मानणारे पनवेलसह रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे पक्षाला संजीवनी मिळणे गरजेचे आहे. 
- शशिकांत बांदोडकर, सरचिटणीस, रायगड जिल्हा कॉंग्रेस

मुळात पक्षांतर्गत निवडणुकांमुळे रायगड जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत यांनी दिलेला राजीनामा प्रदेश कॉंग्रेसने स्वीकारलेला नाही. नवी कार्यकारिणी जाहीर होईपर्यंत लौकिक अर्थाने अध्यक्ष म्हणून नव्हे, तर काळजीवाहू म्हणून त्यांनीच काम पाहावे, असे अभिप्रेत आहे. पनवेल महापालिका क्षेत्राची नवी जिल्हा कॉंग्रेस कार्यकारिणी जाहीर होणार असून जिल्हाध्यक्ष आणि महापालिका अध्यक्ष या वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
- डॉ. भक्तिकुमार दवे, ज्येष्ठ नेते, रायगड कॉंग्रेस 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख