Raigad District Political Analysis for Vidhansabha Elections | Sarkarnama

रायगड जिल्हा : आघाडीच्या बंडखोरीत युतीचे यश!

महेंद्र दुसार 
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

राज्यात पक्षांतराचे वादळ घोंघावत असताना रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण शांत आहे. मुख्यत: शिवसेना-भाजप युतीचे जिल्ह्यातील वाढते वर्चस्व मोडीत काढण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस, शेकाप, कॉंग्रेस आघाडीने कार्यकर्त्यांना पक्षांतरापासून दूर ठेवण्यात यश मिळवल्याचे फळ लोकसभा निवडणुकीत दिसून आले; मात्र आता युतीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांवर मोहिनी घालण्यास सुरवात केली आहे. आघाडीत जितकी बंडखोरी वाढेल, तितके यश युतीच्या पदरात पडण्याची शक्‍यता आहे. 

जिल्ह्यात विधानसभेचे सात मतदारसंघ आहेत. यात लोकसभेच्या रायगड मतदारसंघातील महाड, श्रीवर्धन, अलिबाग आणि पेण, तर मावळ मतदारसंघात पनवेल, उरण आणि कर्जत या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. लोकसभेच्या मावळ आणि रायगड मतदारसंघांत शिवसेनेची मक्तेदारी होती. शिवसेना-भाजपची ही वाढती ताकद रोखण्यासाठी एकेकाळचे कट्टर विरोधक मानले जाणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुनील तटकरे आणि शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) जयंत पाटील यांनी आघाडी केली. त्याला लोकसभेच्या रायगड मतदारसंघात यश आले.

सुनील तटकरे यांनी 31 हजार 438 मतांच्या फरकाने युतीचे अनंत गीते यांचा पराभव केला. मावळ मतदारसंघातील शिवसेनेचे वर्चस्व विरोधकांच्या डोळ्यांत खुपणारे आहे. या मतदार संघात श्रीरंग बारणे सलग दुसऱ्यांदा विजयी झाले. त्यांनी या वेळी "राष्ट्रवादी'चे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांचा पराभव केला. यावरून आता विधानसभा निवडणुकीतील भाकिते वर्तवली जात आहेत. 

भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व वाढत आहे. हे आघाडीच्या नेत्यांनी गांभीर्याने घेतले आहे. भाजपमध्ये जाणाऱ्या कार्यकर्त्यांना रोखण्यात आघाडीच्या नेत्यांचे शर्थीचे प्रयत्न आहेत. राज्यातील पक्षांतराचे लोण अद्याप रायगड जिल्ह्यापर्यंत पोचलेले नाही. आपल्या गळाला काही उमेदवार लागतात का, याची चाचपणी शिवसेना आणि भाजप करीत आहे. श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे यांनी आपली रणनीती अद्याप जाहीर केलेली नाही. नात्याने काका असलेले खासदार सुनील तटकरे यांच्याशी बिनसल्यानंतर त्यांनी विरोधात मोर्चेबांधणी केली होती.

अवधूत तटकरे यांचे बंड मोडीत काढण्यात सुनील तटकरेंना तूर्तास यश आले असले तरी, पुन्हा शिवसेनेने मोहिनी अस्त्र टाकल्यास श्रीवर्धनमधील राजकीय गणिते बदलू शकतात. अवधूत "शिवबंधना'त अडकतील, अशी चर्चा आहे. त्यामुळे येथे राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आणि सुनील तटकरेंच्या कन्या अदिती रिंगणात उतरण्याची शक्‍यता आहे. श्रीवर्धन मतदारसंघ सोडल्यास इतर सहा मतदारसंघांतील आमदारांनी दावेदारी कायम ठेवली आहे. 

अलिबागमध्ये शेकापचे आमदार पंडित (सुभाष) पाटील, महाडमध्ये शिवसेनेचे भरत गोगावले, पेणमध्ये शेकापचे धैर्यशील पाटील, कर्जतमध्ये राष्ट्रवादीचे सुरेश लाड, पनवेलमध्ये भाजपचे प्रशांत ठाकूर आणि उरणमध्ये शिवसेनेचे मनोहर भोईर यांनी आपापले पारंपरिक गड मजबूत केले आहेत. 

लोकसभेच्या मावळ मतदारसंघात "राष्ट्रवादी'चे पार्थ पवार यांना पावणेदोन लाख मतांच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता. पक्षासाठी हा मोठा धक्का होता. पनवेल, उरण आणि कर्जतमध्ये शिवसेना-भाजपची वाढती ताकद आघाडीच्या उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरणारी आहे. पनवेलमधून प्रशांत ठाकूर यांच्या विरोधात सक्षम उमेदवारही अद्याप विरोधकांना मिळालेला नाही. उरणमध्ये भाजपचे महेश बालदी आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत; परंतु येथे विद्यमान आमदार मनोहर भोईर यांनाच पुन्हा संधी मिळाल्यास बालदी अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची शक्‍यता आहे. या दोघांच्या भांडणात शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना लाभ होऊ शकतो. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख