Rahul kul will not leave me : Jankar | Sarkarnama

राहुल कुल मला सोडून जाणार नाहीत : जानकर 

ज्ञानेश्वर रायते
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

राष्ट्रीय समाज पक्षाचा विभागीय मेळावा बारमतीत झाला. पश्चिम महाराष्ट्रात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी या वेळी केले. तसेच पक्षाचे एकमेव आमदार राहुल कुल हे मला सोडून जाणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बारामती : राष्ट्रीय समाज पक्षाच्या बारामती येथील विभागीय मेळाव्यास पक्षाचे एकमेव आमदार राहुल कुल आज अनुपस्थित राहिले.. त्यांची अनुपस्थिती ठळकपणे जाणवली. मात्र पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी कुल हे राज्याच्या शिष्यमंडळासमवेत दिल्लीला गेल्याने आज येथे नसल्याचे स्पष्टीकरण दिले. 

""कुल हे आमच्यासोबतच आहेत. ते पुढील काळात पक्षाचे गटनेते असतील. तो मला कोणत्याही स्थितीत सोडणार नाही,'असा दावा त्यांनी केला. दौंडमध्ये रासपचा आमदार होण्यासाठी 80 टक्के योगदान राहुल कुल आणि कै. सुभाष कुल यांचे आणि फक्त 20 टक्के योगदान हे रासपचे आहे, अशी कबुलीही त्यांनी दिली. 

कुल हे भाजपशी जास्त जवळीक असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यांना मंत्रिपद नाकारल्याने रासपशी त्यांनी फारसा संबंध ठेवलेला नाही. त्यांच्याच मतदारसंघाजवळ हा मेळावा असूनही ते न फिरकल्याने साहजिकच आश्‍चर्य व्यक्त झाले. याबाबत कार्यकर्त्यांत कुजबुज सुरू होतीच. त्यावर जानकर यांनी हे स्पष्टीकरण केले. 

या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जानकर म्हणाले, ""25 वर्षांपूर्वी एकट्याने पक्ष काढला आणि किमान दीड कोटी मतदार तयार झाले. पश्‍चिम महाराष्ट्रात रासपची स्थिती चांगली नाही, त्यामुळे बाबांनो, व्हाटस ऍपवर पक्ष चालवू नका. गावात किमान पाच कार्यकर्ते तरी जोडा, विधानसभेसाठी तयारीला लागा.'' 

या मेळाव्यात जानकर यांनी विविध जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी स्वतंत्रपणे चर्चा केली. यावेळी राज्य पशुसंवर्धन समितीचे सदस्य माणिकराव दांगडे पाटील, राष्ट्रीय समाज पक्षाचे महासचिव बाळासाहेब दोडतले, दादासाहेब केसकर, संदिप चोपडे, उज्वला हाके, श्रध्दा भांतांब्रेकर, आण्णासाहेब रुपनवर आदी यावेळी उपस्थित होते. 

जानकर म्हणाले,""जिकडे रिझल्ट तिकडे जानकर अशीच रणनिती यापुढे ठेवावी लागेल. केवळ दोन आमदार असतानाही भाजप सरकारने आपल्याला मंत्रीपद दिले. मात्र आपल्याला या मंत्रीपदावर न थांबता पुढील वीस वर्षात देशात रासपचे खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. आमची भाजपबरोबर यापुढेही युती करायची इच्छा आहे, मात्र त्यासाठी सन्मान मिळाला पाहिजे. रासपशिवाय सरकार बनत नाही हे आपल्याला सर्वांना दाखवून द्यावे लागेल. पश्‍चिम महाराष्ट्रात खूप कष्ट घ्यावे लागणार आहेत. त्याची तयारी आतापासूनच कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी करावी. भाजपची सत्ता केवळ भाजपच्या पदाधिकाऱ्यांमुळे आलेली नाही. त्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने खूप वर्षे मेहनत केली आहे.'' 

धनगर आरक्षणावर ते म्हणाले, ""आरक्षणासाठी लढा सुरूच राहील. मात्र गेली अनेक वर्षे मराठा मुख्यमंत्री असूनही मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही, कारण ते पक्षाचे नेते होते, जातीचे नव्हते. येणाऱ्या विधानसभेत रासपचे किमान 25 आमदार निवडून येण्यासाठी आता प्रयत्न करा.''

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख