राहुल कुल यांचे कार्यकर्ते भाजपात; आमदारांचे मात्र तळ्यात-मळ्यात 

राहुल कुल यांचे कार्यकर्ते भाजपात; आमदारांचे मात्र तळ्यात-मळ्यात 

दौंड : राष्ट्रीय समाज पक्षाचे दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या समर्थकांना भाजपच्या तालुका कार्यकारिणीत स्थान मिळाल्याने राजकीय वर्तुळात आता कुल यांच्या वाढत्या भाजप प्रेमाची चर्चा सुरू झाली आहे. भाजपमध्ये जाण्याचा आपला विचार नसल्याचे कुल यांनी स्पष्ट केले असले तरी भाजप नेत्यांनी त्यांच्यावर डोळा ठेवल्याचे उघडपणे बोलले जात आहे. 

दौंड तालुक्‍यात एकीकडे कुल यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय समाज पक्षाचे संघटन असताना त्यांचे समर्थक तिकडे आकृष्ट न होता भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत असल्याने राष्ट्रीय समाज पक्षात अस्वस्थता आहे. दुसरीकडे भाजपमध्ये सध्या दोन तालुकाध्यक्ष कार्यरत असल्याने पक्षांतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. 

"मी राष्ट्रीय समाज पक्षाचा आमदार असून विधिमंडळात भारतीय जनता पक्षाचा सहयोगी सदस्य आहे. भाजपमध्ये जाण्याचा सध्या विचार नाही,'' असे कुल यांनी "सरकारनामा'शी बोलताना सांगितले. मात्र ऐन निवडणुकीच्या वेळी काहीही घडामोडी घडू शकतील, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. भाजपला राज्यात स्वबळावर सरकार आणावयाचे असल्याने अनेक आमदारांना गळाला लावण्याचे काम सुरू आहे. पालकमंत्री गिरीश बापट हे कुल यांना सहकार्य करण्यात मागेपुढे पाहत नाहीत. कुल हे कालांतराने भाजपचेच होणार असल्याचे त्या पक्षाच्या वर्तुळातून सांगण्यात येते. 

दौंड विधानसभा मतदारसंघ भाजप - शिवसेना युतीच्या जागावाटपात भाजपकडे होता. 2014 मध्ये भाजप - शिवसेना युती तुटल्यानंतर भाजप व अन्य मित्रपक्षांच्या महायुतीत हा मतदारसंघ जागावाटपात राष्ट्रीय समाज पक्षाकडे आला. 2014 च्या निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार म्हणून राहुल कुल यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार रमेश थोरात यांचा पराभव केला होता. 

महायुतीच्या जागावाटपात दौंड विधानसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष किंवा रिपाईं (आठवले गट) यांना दिला जाऊ शकतो. राहुल कुल यांची मात्र जागावाटपात कोणत्याही पक्षाकडे हा मतदारसंघ गेला तरी तेथून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विकासकामांसाठी आग्रही मागणी करणे आणि मतदारसंघातील विकासकामांसाठी संबंधित मंत्री यांच्याकडे सतत पाठपुरावा करत असल्याने राहुल कुल यांच्याविषयी सत्ताधारी गटात अनुकूल मत आहे.

भाजप प्रवेशाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर विचारले असता आमदार राहुल कुल म्हणाले, " माझ्या काही समर्थकांनी राष्ट्रवादीत तर काहींनी भाजपमध्ये प्रवेश केला असल्यास तो त्यांचा वैयक्तीक प्रश्न आहे. प्रत्येकाला कुठे जायचे याचे स्वातंत्र्य आहे.'' 

कुल यांची अशी भूमिका असली तरी त्यांच्या जवळचे कार्यकर्ते थेट भाजपचे पदाधिकारी होत असल्याने राष्ट्रीय समाज पक्षात नाराजी आहे. मित्रपक्षांना जवळ करून नंतर त्यांचे आमदार कसे फोडायचे, याचे गणित भाजप आखण्यात प्रवीण आहे. मित्र पक्ष असलेल्य शिवेसेनेचे अनेक आमदार भाजप प्रवेशासाठी रांगत असल्याचे बोलण्यात येते. त्याच धर्तीवर रासपचा एकमेव आमदार गळाला लावण्यात भाजपवाले कसे मागे राहतील, अशीही चर्चा होते. त्यामुळेच कुलही भाजपमध्ये जाण्याचा सध्या विचार नाही, असे सांगत आहेत. सध्या विचार नाही, याचा अर्थ भविष्यात भाजपचा पर्याय खुला असल्याचेही ते सांगत असल्याचे दिसून येत आहे. 
 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com