राहुल कुल : कट्टर पवार समर्थक ते आता कट्टर पवार विरोधक

भाजपला बारामती लोकसभामतदारसंघात उमेदवार लढण्यासाठी बाहेरचा उमेदवारशोधावा लागायचा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार खेळी करून पुणे जिल्ह्यातीलच कांचन राहुल कुल यांनासुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभेकेलेआहे.
राहुल कुल : कट्टर पवार समर्थक ते आता कट्टर पवार विरोधक

पुणे : दौंडमध्ये जो निवडून येईल तो आपला, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे आतापर्यंतचे सूत्र होते. राहुल कुल निवडून आले तरी आपलेच आणि रमेश थोरात आपल्याला सोडून कोठे जाणार, असा गेल्या 25 वर्षांचा शरद पवार आणि अजित पवार यांचा अनुभव होता. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत रासपच्या चिन्हावर आमदार झालेले राहुल कुल हे भाजपकडे गेेले ते परत पवारांकडे फिरकले नाहीत. उलट पवार यांचे कट्टर विरोधक बनून खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात भाजपची उमेदवारी कुल कुटुंबियाने घेतली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातून दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देऊन भाजपने थेट शरद पवार यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. या निमित्ताने एकेकाळचे पवार यांचे खंदे समर्थक असलेले आमदार कुल हे या निवडणुकीत कट्टर विरोधकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 

आमदार कुल यांचे वडील सुभाष कुल यांनी 1990 साली अपक्ष म्हणून आमदारकी मिळविली होती. तीदेखील पवार यांच्या उमेदवाराच्या विरोधात. त्यानंतर मात्र पवार यांनी कुल यांना सोबत घेतले. 1995 ची विधानसभा निवडणूक त्यानंतर 1999 च्या निवडणुकीत कुल यांनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आमदारकी कायम राखली. सुभाष कुल यांच्या आकस्मिक निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी रंजना कुल यांना उमेदवारी देण्यात आली. यानंतर 2004 च्या निवडणुकीतदेखील रंजना कुल यांनाच पुन्हा संधी देण्यात आली. 2009 च्या निवडणुकीत राहुल यांनाच पक्षाने संधी दिली. त्यावेळी बंडखोरी केलेले रमेश थोरात आमदार झाले. राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या विरोधात लढले तरी थोरातांना नेत्यांनी सोडले नाही.

या मतदारसंघात कुल यांच्याइतकेच थोरात यांना सांभाळण्याचे पवार यांचे सुरवातीपासूनचे धोरण राहिल्याने 2014 च्या विधानसभा निवडणुकीत कुल यांनी भाजपाची वाट धरत राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकिटावर दौंडमधून उमेदवारी मिळविली. राष्ट्रवादीकडून उभ्या असलेल्या रमेश थोरात यांचा पराभव करून त्यांनी आमदारकी खेचून आणली. या निवडणुकीच्या निमित्ताने कुल यांनी पवार यांना सोडून प्रथमच विरोधकांमध्ये सामील झाले.1999 मध्ये सुभाष कुल यांचे बंड, 2014 मध्ये राहुल यांची बंडखोरी आणि आता तिसऱ्यांदा कुल हे पवार विरोधात लढत आहेत. विरोधात लढले तरी पवारांशी जुळवून घेण्याचा त्यांचा कल होता. आता तशी स्थिती राहिलेली नाही.

"रासप'च्या कोट्यातून आमदार झाले तरी गेल्या पाच वर्षात कुल यांची भाजपाशी असलेली जवळीक लोकसभेच्या या उमेदवारीने अधिक घट्ट झाली आहे. कुल यांच्या सहकारी साखर कारखान्याला राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी तब्बल 34 कोटी रूपयांची मदत दिल्याने त्यांनी भाजपाची उमेदवारी स्वीकारली असावी. मात्र, खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवारी स्वीकारून कुल यांनी थेट पवार यांनाच आव्हान दिल्याचे मानले जात आहे.

जिल्ह्याच्या राजकारणात पवार यांना थेट विरोध करण्याचे धाडस  आतापर्यंत त्यांच्या निकटवर्तीयाने केेले नव्हते. रमेश थोरात हे अजित पवारांचे लाडके आणि राहुल कुल हे शरद पवार यांचे आवडते, असे सूत्र बोलले जात होते. हेच आवडते राहुल कुल आता आपल्या पत्नी कांचन यांना शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढविण्यासाठी उतरवत आहेत. त्यामुळे कुल यांच्या या विरोधाचे पुणे जिल्ह्याच्या राजकारणात काय पडसाद उमटणार, हे पाहायला हवे.

कांचन कुल या मूळच्या बारामतीच्या निंबाळकर घराण्यातील आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या भावकीतील त्या आहेत. कांचन व राहुल यांचे लग्न ठरविण्यात सुनेत्रा वहिनींचीही भूमिका होती. कुल कुटुंबियाच्या नावावर एक विक्रमही आहे. वडिल, आई आणि मुलगा असे तिघेही जण आमदार झाले आहेत. असा विक्रम कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव, त्यांच्या आई आणि वडील रायभान जाधव यांच्या कुटुंबियांचा आहे. आता कुल घराण्याची सून लोकसभा निवडणुकीसाठी उतरली आहे. हे यातील नवी घडामोड आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com