राहुल कुल व नामदेव ताकवणे यांच्यात दिलजमाई

राहुल कुल व नामदेव ताकवणे यांच्यात दिलजमाई

केडगाव : दौंड तालुक्यातील महायुतीचे उमेदवार आमदार राहुल कुल व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे यांच्यात दिलजमाई झाली असून दोघे एकत्र प्रचार करीत आहे. तब्बल १५ वर्षानंतर कुल व ताकवणे पुन्हा एकत्र आल्याने भाजपचे उमेदवार कुल यांना एेन निवडणुकीत दिलासा मिळाला आहे.

दौंडचे दिवंगत माजी आमदार राजाराम ताकवणे ( जनता पक्ष )  यांचे नामदेव ताकवणे हे पुत्र आहेत. दिवंगत आमदार सुभाष कुल हे सुरवातीच्याकाळात राजाराम ताकवणे यांचे कार्यकर्ते होते. सुभाष कुल यांच्या निधनानंतर २००२ मध्ये राहुल कुल व नामदेव ताकवणे यांनी भीमा पाटस कारखान्याला एकत्रितपणे निवडणूक लढवली होती. मात्र नंतरच्या काही वर्षातच कुल व ताकवणे यांच्यात सख्य राहिले नाही.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ताकवणे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत ते तटस्थ राहिले होते. २०१९ च्या निवडणुकीत कुल यांनी कमळ हाती घेतल्याने ताकवणे यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे.

याबाबत ताकवणे व कुल म्हणाले, आम्ही वेगळ्या पक्षात असल्यामुळे वैचारिक मतभेद होते. आता विकासासाठी आम्ही व कार्यकर्ते एकत्र आहोत. कुल हे सक्षम नेतृत्व आहे मात्र वेगळ्या पक्षात असल्यामुळे आम्ही दूर होतो.
कुल व ताकवणे यांच्यात दिलजमाई झाल्यानंतर दोघांनी विविध गावात आज एकत्रित प्रचार सभा घेतल्या. 

``मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला मंत्रिपद किंवा मुळशीचे पाणी असे दोन पर्याय दिले तर मी मंत्रीपदावर पाणी सोडेल. मुळशीच्या पाण्यासाठी मी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे. मंत्रिपदापेक्षा विकास महत्त्वाचा आहे. मुळशीच्या पाण्यामुळे पुढील दहा पिढ्यांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे, असे मत दौंड विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केले. 

राहुल कुल यांची लडकतवाडी, नाथाचीवाडी, आणि पिंपळगाव, एकेरीवाडी, देलवडी, नानगाव येथे जाहीर सभा झाली. त्यावेळी कुल बोलत होते. 

ताकवणे म्हणाले, दौंड तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने मुळशीचे पाणी, दौंड-पुणे लोकल आणि एमआयडीसी महत्वाचे असून या प्रकल्पांचा पाठपुरावा करण्यासाठी आमदार राहुल कुल यांच्यासारखे सक्षम नेतृत्व तालुक्याला गरजेचे आहे. दौंड तालुक्याचे भविष्य ठरवणारी ही निवडणूक आहे. मतदारांनो तुम्ही आमदार नाही तर मंत्री निवडून देणार आहात. विकासासाठी मतभेद बाजूला ठेवा आणि आमदार राहुल कुल यांना निवडणुकीत विजयी करा. खरे तर कुल हे माझे राजकीय स्पर्धक मात्र विकासासाठी आम्ही दोघे एकत्र आलो आहोत.  राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रमेश थोरात यांच्याकडे विकासाचा कोणताही अजेंडा नाही. त्यामुळे भावनिक होऊन तुम्ही तुमचे मत वाया घालवू नका. केंद्रात भाजपचे सरकार असून राज्यातही भाजपचेच सरकार येणार आहे. त्यामुळे दौंड तालुक्यात आमदार कुल निवडून येणे काळाची गरज आहे. दौंडपेक्षा अत्यंत मागास असलेले तालुकेसुद्धा आज प्रगतीपथावर आहेत. विकास हवा असेल तर भाजपला मत द्या. भीमा पाटस कारखान्याच्यामागे खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहे त्यामुळे तेथील प्रश्न भविष्यात सुटतील.  

राष्ट्रवादीची गळती थांबेना

राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेलचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर शेळके व दौंड खरेदी विक्री संघाचे संचालक पोपट काळे, पंचायत समिती सदस्या निशा शेंडगे यांचे पती नीलेश शेंडगे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे किरण यादव, राहू येथील सोनाली घाडगे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. भीमा पाटस साखर कारखान्याच्या कामगार संघाने आमदार राहुल कुल यांना पाठिंबा दिल्याचे संघाच्या अध्यक्ष अर्जुन दिवेकर यांनी कळविले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com