rahul kul agree to ajitdada`s statement | Sarkarnama

अजितदादांच्या `या विधानाशी` राहुल कुलही सहमत!

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 16 मे 2019

पुणे : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानाशी रासपचे आमदार राहुल कुल हे सहमत आहे. या दोघांत फारसे सख्य नसताना कुल यांना अजित पवार यांचे हे विधान आवडून गेले आहे.

पुणे : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानाशी रासपचे आमदार राहुल कुल हे सहमत आहे. या दोघांत फारसे सख्य नसताना कुल यांना अजित पवार यांचे हे विधान आवडून गेले आहे.

हे विधान आहे  इव्हीएमबद्दलच्या शंकेचे! बारामतीत राष्ट्रवादीचा पराभव झाल्यास इव्हीएमबद्दल शंका घेण्यास वाव होईल, अशा आशयाचे विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. त्या विधानावर अजित पवार यांना प्रतिक्रिया पत्रकारांनी विचारली असता त्यांनी इव्हीएमच्या आधारे निवडणुका जिंकता येत असत्या तर मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीन राज्यांत भाजपचा पराभव झालाच नसता, असे उत्तर दिले होते. इव्हीएमबद्दलची शंका अजित पवारांनी व्यर्थ ठरवली होती.

अजित पवार यांच्या विधानाशी माझी सहमती असल्याचे कुल यांनी सांगितले. बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काॅंग्रेसचा अपेक्षाभंग होणार असून, येथील जनतेने भाजपला प्रचारादरम्यान प्रचंड प्रतिसाद दिला. येथील जनता राष्ट्रवादीच्या नेत्यांची `गंमत` करणार असून कमळाचा विजय निश्चित वाटतो आहे, असा विश्वास दौंडचे आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केला.

या मतदारसंघात धक्कादायक निकाल लागू शकतो, याची जाणीव झाल्यामुळेच इव्हीएमबद्दलची शंका व्यक्त होत असावी, असे मत कुल यांनी व्यक्त केले.

आम्ही या मतदारसंघात चांगली लढत दिली, याचे समाधान महत्त्वाचे आहे. भाजप आणि शिवसेनेचे सर्व नेते एकदिलाने काम करत होते. भाजपचे अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. माझी पत्नी ही थेट पहिल्यांदाच लोकसभेच्या निवडणुकीला उभी होती. कुल कुटुंबियाबद्दल असलेली आस्था आम्हाला या निवडणुकीत दिसून आली, असे कुल यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या विजयाचे गणित हे केवळ बारामती विधानसभा मतदारसंघात मिळणाऱ्या लिडवर अवलंबून आहे. मात्र बारामती तालुक्यातच राष्ट्रवादीचा अपेक्षाभंग होणार आहे. इतर पाचही विधानसभा मतदारसंघात आम्ही ताकदीने उतरलो होतो. त्यामुळे तेथेही भाजपलाच मताधिक्य मिळणार आहे. माझ्या दौंड तालुक्यात तर आम्ही चांगले मताधिक्य घेऊ. येथील राष्ट्रवादीचे स्थानिक नेते हे दौंडमध्ये राष्ट्रवादीलाच लीड मिळणार असल्याची भाषा करतात. पण मतमोजणीच्या दिवशी भाजपलाच दौंडमधून राष्ट्रवादीपेक्षा अधिक मते मिळतील, याबाबत खात्री आहे, असे कुल यांनी सांगितले.

पुरंदरमध्ये राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी चांगली साथ दिली. खडकवासल्यात आम्ही सर्वाधिक आघाडी घेऊन राष्ट्रवादीला त्याआधारे चितपट करू. भोर आणि इंदापूरमध्येही राष्ट्रवादीवर नाराज असलेल्या जनतेने भाजपला साथ दिली आहे, असा दावा कुल यांनी केला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख