राहुल गांधी यांची नाहक बदनामी : अशोक चव्हाण 

 राहुल गांधी यांची नाहक बदनामी : अशोक चव्हाण 

नागपूर : भाजपशासित राज्यांमध्ये महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. विशेष म्हणजे महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये भाजप नेते गुंतलेले असून, त्यांच्यावर कुठलीच कारवाई होताना दिसत नाही. याविरोधात कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी मोहीम उघडल्याने त्यांची नाहक बदनामी करून देशाचे लक्ष इतरत्र वळविण्याचा प्रयत्न भाजपकडून चालविण्यात येत असल्याची प्रतिक्रिया राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. 

विधानसभेमध्ये आज झालेल्या गोंधळाच्या अनुषंगाने भाजपवर सडकून टीका करताना ते म्हणाले, की 1971 च्या युद्धात आजच्याच दिवशी म्हणजे 16 डिसेंबरला भारताने पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगलादेशची निर्मिती केली. या ऐतिहासिक दिवशी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कणखर नेतृत्वाचे आणि भारतीय लष्कराने गाजवलेल्या अतुलनीय शौर्याचे स्मरण करण्याऐवजी भारतीय जनता पक्षाने आज निरर्थक घोषणाबाजी करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला. 

महापुरुषांच्या नावावर केवळ राजकारण करण्याची भाजपची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही भाजपने आपल्या सोयीसाठी अशा मुद्द्यांचा राजकीय वापर केला आहे. काही महापुरुषांमध्ये वाद होते, असे खोटे चित्र उभे करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत आहे. महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू व सरदार पटेल, महात्मा गांधी आणि शहीद भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस या महापुरुषांमध्ये वाद असल्याचा अपप्रचार केला आहे. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणूनच आज भाजपने विधानसभेत गोंधळ घातला, असे ते म्हणाले. 

राहुल गांधी यांनी झारखंडमधील एका जाहीर सभेत केलेला सावरकरांचा उल्लेख वेगळ्या संदर्भात होता. महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या अनुषंगाने उचललेल्या मुद्द्यांना उत्तर देता येत नसल्याने भाजपकडून जाणीपूर्वक नवा वाद उभा करण्याचा प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com