Rahul Gandhi's false allegations about Rafael deal makes security threat to country: Keshav Upadhye | Sarkarnama

राफेलबाबत खोटे आरोप करून राहुल गांधींकडून देशाच्या सुरक्षिततेला धोका : केशव उपाध्ये

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 19 डिसेंबर 2018

बुलडाणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ आणि पारदर्शी राजवट दिली असून काहीही करून त्यांना भ्रष्टाचाराचा डाग लावण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल विमान खरेदीबाबत बेछूट खोटे आरोप केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे राहुल गांधी यांचा खोटारडेपणा उघड झाला असून राजकीय फायद्यासाठी देशाची सुरक्षितता धोक्यात आणल्याबद्दल त्यांनी देशाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भाजपा प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली.

बुलडाणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ आणि पारदर्शी राजवट दिली असून काहीही करून त्यांना भ्रष्टाचाराचा डाग लावण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल विमान खरेदीबाबत बेछूट खोटे आरोप केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे राहुल गांधी यांचा खोटारडेपणा उघड झाला असून राजकीय फायद्यासाठी देशाची सुरक्षितता धोक्यात आणल्याबद्दल त्यांनी देशाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भाजपा प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली.

पत्रकार परिषदेत केशव उपाध्ये म्हणाले की, राफेल विमानांच्या खरेदी व्यवहारातील निर्णय प्रक्रिया, किंमत आणि भारतीय ऑफसेट पार्टनर या तीनही मुद्द्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने गैरव्यवहार नसल्याचा निर्वाळा दिला आहे. या मुद्द्यांवरून जाणीवपूर्वक चिखलफेक करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न हाणून पाडला गेला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सुद्धा मान्य न करता पंतप्रधानांवर टीका करणे हा काँग्रेसला निर्ढावलेपणा आहे.

त्यांनी सांगितले की, राहुल गांधी यांच्याकडे राफेलबाबत पुरावे होते तर त्यांनी ते सर्वोच्च न्यायालयात मांडायला हवे होते. पण त्यांनी तसे केले नाही. कारण त्यांच्याकडे काही पुरावेच नव्हते. केवळ सत्ताधारी पक्षाला बदनाम करण्यासाठी खोटेनाटे आरोप केले. असे आरोप करताना आपण देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करतो आहोत आणि सैनिकांचे मनोधैर्य खच्ची करत आहोत, याचेही भान राहुल गांधी यांनी ठेवले नाही.

ते म्हणाले की, राफेल विमानांची किंमत आणि त्याचा तपशील जाहीर करण्यास हवाई दलाने विरोध केला होता. न्यायालयाच्या निकालातही त्याची नोंद घेण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून किंमतीबाबत सर्व तपशील मागून घेतला व आपल्या समाधानासाठी त्याचा अभ्यास केला.

किंमतीचा तपशील जाहीर केला तर विमानांवर कोणती शस्त्रास्त्रे लावली आहेत याची माहिती उघड होईल व त्याचा शत्रूला लाभ होईल, यामुळे संरक्षण दलाचे अधिकारी ही माहिती उघड करण्यास विरोध करत होते, याची नोंद घ्यायला हवी.

सर्वोच्च न्यायालयाने या विषयात निकाल दिल्यानंतरही संयुक्त संसदीय समिती नेमण्याचे कारण काय, असा सवाल त्यांनी केला. भाजपा या विषयावर संसदेत चर्चा करण्यास तयार असल्याचे ते म्हणाले.

त्यांनी सांगितले की, आपली शेजारी राष्ट्रे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे मिळवत असताना काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात दहा वर्षे शस्त्रांस्त्रांच्या बाबतीत चालढकल करण्यात आली. हवाई दलाला हव्या असलेल्या लढाऊ विमानांची खरेदी काँग्रेस सरकारने केली नाही. मोदी सरकारने संरक्षण दलांसाठी आवश्यक असलेल्या शस्त्रांस्त्रांची व साहित्याची खरेदी केली. त्यामध्ये भ्रष्टाचार नाही. सर्व निर्णय दलालांशिवाय झाले, यामुळे काँग्रेस पक्ष अस्वस्थ झाला आहे. राफेलबाबत सर्वोच्च न्यायालयानेच गैरव्यवहार नसल्याचा निकाल दिल्यामुळे 2019 च्या निवडणुकीत कोणता मुद्दा वापरायचा याचा काँग्रेसला प्रश्न पडला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख