rahul gandhi pass a test | Sarkarnama

पप्पू पास हो गया!

योगेश कुटे
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

भाजपचे समर्थक आणि मोदी भक्त हे राहुल गांधी यांची पप्पू म्हणून हेटाळणी करत होते. मात्र हिंदी पट्ट्यातील तीन राज्यांतील निवडणुकांच्या निकालानंतर राहुल यांना आता गंभीरपणे घेतले पाहिजे, याची जाणीव भाजपच्या मंडळींना झाली असेल. या निवडणुकीत काॅंग्रेसला विजय मिळाला आणि राहुल यांचे `पप्पूपण` सरले हे मान्य करावे लागेल. 

काॅंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे काॅंग्रेसचे अध्यक्ष झाल्यापासून वर्षभरात परीक्षेत पास झाले आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच गुजरात निवडणुकीचे वारे सुरू असताना राहुल यांच्याकडे या पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आली होती. गुजरातमधील निवडणुकीत राहुल यांनी चांगली लढत दिली. सौम्य हिंदुत्वाचा पुकारा करत त्यांनी अनेक मंदिरांना भेटी दिल्या. मुस्लिमधार्जिणा काॅंग्रेस पक्ष, ही ओळख पुसण्याचे काम राहुल यांच्या या भेटींमुळे झाले.

राहुल यांची दुसरी परीक्षा कर्नाटकात झाली. कर्नाटकात भाजपने राज्यरोहणाची जोरदार तयारी केली होती. त्यांनी राजभवनला हाताशी धरून येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदाची शपथही दिली. मात्र तेथेही राहुल यांनी राजकीय सिक्सर मारत काॅंग्रेसपेक्षा कमी जागा असलेल्या जनता दलाला (धर्मनिरपेक्ष) मुख्यमंत्रिपदाची आॅफर झटकन दिली. त्यामुळे येथे काॅंग्रेसला सत्तेत वाटा मिळाला. भाजपसाठी हा जोरदार तडाखा होता. त्यानंतर विरोधी पक्षांच्या एकजुटीची हवा कर्नाटकातील या घडामोडींनी झाली.

राहुल यांच्यासाठी हिंदी पट्ट्यातील राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड ही तीन राज्य महत्त्वाची होती. ही तीन राज्ये आणि गुजरात हे चौथे राज्य आहे की जिथे काॅंग्रेस आणि भाजप यांचा थेट दुरंगी सामना असतो. या चार राज्यांशिवाय या दोन पक्षांत कोठेही थेट सामना नसतो. त्या त्या राज्यातील प्रादेशिक पक्ष हे दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या जोडीने निवडणुकांत उतरलेले असतात. त्यामुळे  ही चार राज्ये वगळता सर्वत्र तिरंगीहून अधिक लढती होतात.

या तीन राज्यांतील निवडणुकांत राहुल यांनी भाजपला क्षमतेने लढा दिला. या राज्यांतील काॅंग्रेस सुभेदारांमधील अंतर्गत लढाईला आवर घालत सर्वांना एकत्रित ठेवण्यात राहुल यशस्वी झाले आहेत. त्यामुळेच पक्षाला चांगले यश मिळाले. छत्तीसगडमध्ये अजित जोगी यांच्यासारखा मूळच्या काॅंग्रेस नेत्याचा पक्ष भाजपविरोधी मतांमध्ये फूट पाडण्यासाठी समोर असताना येथे काॅंग्रेसने मिळवलेला मोठा विजय पक्षाचा हुरूप वाढविणारा आहे. राजस्थानमध्येही पक्षाने स्वबळावर सत्ता स्थापन करण्याइतपत बहुमत मिळवले आहे. मध्य प्रदेशमध्ये मात्र पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. येथे काॅंग्रेस नेत्यांच्या दुभंगलेल्या मनाचा पक्षाला फटका बसल्याची चर्चा आहे. तसेच बसपने उमेदवार उभे केल्यानेही काॅंग्रेसला एकहाती यश मिळू शकले नाही.

राहुल यांनी या निवडणुकीत आपले गोत्र सांगून आपण हिंदू ब्राह्मण असल्याची ग्वाही दिली. गायीसंदर्भात आपण संवेदनशील असल्याचेही सांगितेल. मंदिरात जाऊन पूजा केली. राफेलचा मुद्दा प्रत्येक सभेत मांडला. मोदींच्या टिकेला तोडीस तोड उत्तर दिले. गेल्या वीस वर्षांतील ही पहिली निवडणूक होती की ज्यात सोनिया गांधी अजिबात प्रचारात सहभागी नव्हत्या. राहुल यांनी संघटनेचे सर्व अर्थाने नेतृत्त्व केले.

आपण भाजप विरोधकांची एकजूट करताना लवचिक असल्याचे राहुल यांनी दाखवून दिले आहे. आता आपली मते जनता गंभीरपणे घेत असल्याचे सिद्ध केले आहे. मोदींच्या आणि अमित शहांच्या प्रचारशैलीला चोख उत्तर दिले जाऊ शकते, याचा धडा त्यांनी भाजपला दिला आहे. सगळ्यात महत्त्वाचे पप्पू म्हणून भाजपवाले त्यांची हेटाळणी करत होते. राहुल आता तसे राहिले नाहीत, हे देखील या तीन राज्यांतील निवडणुकांनंतर मान्य करावे लागणार आहे. त्यांची खरी परीक्षा २०१९ मध्ये असली तरी सराव परीक्षेत त्यांनी चांगले गुण मिळवले आहेत. 

 

  

  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख