ट्रोलर्स आपल्याला 'पप्पू' म्हणतात हे राहुल गांधी यांना माहिती आहे  - मिलिंद देवरा  - Rahul Gandhi knows that trollers call him Pappu - Milind Devra | Politics Marathi News - Sarkarnama

ट्रोलर्स आपल्याला 'पप्पू' म्हणतात हे राहुल गांधी यांना माहिती आहे  - मिलिंद देवरा 

मृणालिनी नानिवडेकर  : सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 14 डिसेंबर 2017

' एके दिवशी कुणी तरी भीत भीत हा विषय काढण्याचा प्रयत्न करत होता. ते लक्षात येताच राहुल म्हणाले, मला माहीत आहे, की मला तसे चिडवले जाते, पण देशातील जनता तसे म्हणत नसून काही राजकारण्यांनी पगारावर नेमलेले 'ट्रोलर्स' तसे करत आहेत. देशातील जनतेला केवळ विकास हवा आहे हे लक्षात घ्या. "

मुंबई : सोशल मीडियावर आपली ' पप्पू' अशी हेटाळणी केली जाते हे राहुल यांच्या लक्षात आल्यावर त्यांची प्रतिक्रिया काय होती, असा  प्रश्‍न गांधी यांचे निकटवर्तीय समजले जाणारे कॉंग्रेसचे माजी खासदार  मिलिंद देवरा यांना विचारला.

त्यावर देवरा म्हणाले, ''एके दिवशी कुणी तरी भीत भीत हा विषय काढण्याचा प्रयत्न करत होता. ते लक्षात येताच राहुल म्हणाले, मला माहीत आहे, की मला तसे चिडवले जाते, पण देशातील जनता तसे म्हणत नसून काही राजकारण्यांनी पगारावर नेमलेले 'ट्रोलर्स' तसे करत आहेत. देशातील जनतेला केवळ विकास हवा आहे हे लक्षात घ्या. "

मिलिंद देवरा राहुल गांधी यांच्याविषयी बोलताना पुढे म्हणाले , "कॉंग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी नेहमी विचारपूर्वक निर्णय घेतात. आम्ही किमान दहाएक कल्पना त्यांच्यासमोर मांडत असतो. त्यापैकी जेमतेम एखादी ते चर्चायोग्य समजतात. कल्पना आवडली तरच ती स्वीकारतात. प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करतात. "

" पक्षाची सूत्रे हाती घेण्याची विनंती त्यांना अनेकदा केली गेली, पण त्यासाठी योग्य वेळ ठरवण्यासाठीही त्यांनी अनेक महिने घेतले. ती वेळ आल्याचे वाटल्यावरच पक्षाध्यक्षपदासाठी अर्ज केला," असे  मिलिंद देवरा यांनी सांगितले . 

" कोणतीही गोष्ट मनापासून करणे हा राहुल गांधी यांचा स्वभाव आहे. दलितांशी संवाद असो, युवकांशी बातचीत असो वा अगदी सध्या सुरू असलेला गुजरातमधील प्रचार, प्रत्येक गोष्ट करताना ते स्वतःला वाहून घेतात. या गोष्टींच्या बातम्या व्हाव्यात, त्याद्वारे स्वतःची सकारात्मक प्रतिमा निर्माण व्हावी, असा उद्देश त्यामागे नसतो. "

" शेतकऱ्यांचे अनेक प्रश्‍न समजून घेण्यासाठी ते प्रथम त्यासंदर्भातील सर्व माहिती मिळवतात. शेतकरी आत्महत्याग्रस्त भागांचा दौरा केला तेव्हाही त्यांनी अभ्यास केला. नंतरच संबंधितांशी संवाद साधला. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी ते प्रचंड मेहनत घेत आहेत.''

"देशातील जनतेच्या प्रश्‍नांना त्यांना वाचा फोडायची आहे. ते सोडवायचे आहेत. देशाला दिशा देण्याची क्षमता केवळ कॉंग्रेसमध्ये आहे, हे त्यांना जनतेला समजावून सांगायचे आहे ",असे देवरा म्हणाले.

राहुल यांची पक्षाध्यक्षपदी झालेली निवड म्हणजे घराणेशाही आहे. केवळ गांधी घराण्यातील व्यक्ती कॉंग्रेसचे अध्यक्ष होऊ शकते असे बोलले जाते.

त्याकडे लक्ष वेधले असता देवरा म्हणाले, "भाजपमध्ये अध्यक्ष नेमला जातो, आमच्याकडे तो निवडतात. कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी केवळ राहुल यांचा अर्ज आला म्हणून ते बिनविरोध अध्यक्ष झाले.

कोणालाही या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची मुभा होती. राहुल अध्यक्ष व्हावेत असे आमच्या पक्षातील प्रत्येकालाच वाटले. त्यामुळे या पदासाठी एकही अर्ज आला नाही." 
 
कॉंग्रेसमध्ये प्राण फुंकण्याचे आव्हान राहुल गांधींना झेपेल का, यावर देवरा म्हणाले, आगे आगे देखिए होता है क्‍या!

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख