rahul blog | Sarkarnama

राहुलबाबाने धो डाला !

प्रकाश पाटील 
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची "पप्पू' म्हणून आजही हेटाळणी करणाऱ्यांना मोदी भक्तांना बिमारू राज्यातील निकालाने मोठा झटका दिला आहे. पाच राज्यातील निकाल लक्षात घेतले तर "पप्पू' ने धो डाला असेच म्हणावे लागेल. 

राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यातील संपूर्ण निकाल अद्याप हाती यायचे आहेत. मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये तर कॉंग्रेस आणि भाजपची घासाघास सुरू आहे. मध्यप्रदेशात कोण येईल ? हे आताच सांगता येत नसले तरी राहुल गांधींनी काही का असेना भाजपला जोरदार तडाखा दिला आहे. कॉंग्रेसला चारीमुंड्याचित करण्यात गेल्या चार वर्षात भाजपला विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काहीप्रमाणात यश आले हे खरे असले तरी पाचही राज्यातील निकालाकाडे पाहिले तर मतदार किंवा लोक आजही कॉंग्रेसवर विश्वास व्यक्त करताना दिसून येत आहे. 

मिझोरम आणि तेलंगणात भाजपची मुळातच ताकद नाही हे मान्य असले तरी छत्तीसगडमधील पराभव भाजपच्या जिव्हारी लागलेला दिसतो. भाजपची मंडळी मोदींच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करताना मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानात भाजपच येणार असल्याचा दावा केला जात होता पण, तसे काही झाले नाही. भाजपच्या बरोबरीने कॉंग्रेसचे आमदार निवडून आल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. देशाचा विचार करता लोक भाजप आणि कॉंग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षावर विश्वास व्यक्त करताना दिसतात. 

कॉंग्रेसला राजस्थान आणि मध्यप्रदेशात जे यश मिळाले त्याचे श्रेय राहुल गांधी यांना द्यावे लागणार आहे.यामधील सर्वात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहुल ब्रिगेडमधील जे सचिन पायलट, ज्योतिरादत्त शिंदे यांच्यासारख्या तरूण नेत्यांना राजस्थान, मध्यप्रदेशच्या मैदानात उतरविले. गेल्यावेळी राजस्थानात सत्ता गेल्यानंतर राहुल यांनी सचिन पायलटाना प्रदेशाध्यक्ष केले तर दुसरीकडे ज्योतिरादत्ताना मध्यप्रदेशात बसविले आणि कमलनाथांसारखा बुर्जर्ग नेता जोडीला दिला. दोन्ही राज्यात लढय्या पोरांनी गेल्या चार वर्षात भाजपच्या नाकात दम आणला. 

मध्यपदेशचे मुख्यंमत्री शिवराजसिंह चौहान यांच्या प्रतिमेला धक्का बसला होता. शेतकऱ्यांवरील गोळीबार, व्यापम गैरव्यवहार तसे ऍन्टीइन्कूबन्सीचाही फटका बसला आहे. तरीही ज्योतिरादित्यांनी सातत्याने चौहान यांच्यावर चौफेर टोलेबाजी केली. येथे भाजप येणारच हा जो दावा केला जात होता तो खोटा ठरला. आज तेथे भाजप जरी सत्तेवर आली तरी भाजपचा नैतिक पराभव झाला आहे. 

राजस्थानात ज्या पद्धतीने कॉंग्रेसवाले दावा करीत होते तसे झाले नाही. येथेही भाजपशी टक्कर देताना पक्षाला प्रयत्न करावे लागले आहेत. तरीही सचिन पायलटांमुळे कॉंग्रेसने भाजपच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षाही अधिक यश खेचून आणले आहे. एकून पाच राज्यांच्या निकाल पाहता जर मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये जर भाजप विजयी झाला असता तर पुढची आठनऊ महिने भाजप देशभर सेमीफायनलचा जल्लोष केला असता. काही झाले तरी मतदारांनी भाजपला या निवडणुकीने इशारा दिला आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी या दोघांमध्येच खरा सामना रंगणार हे स्पष्टपणे दिसून येत आहे. या निवडणुकीकडे पाहता प्रादेशिक किंवा छोट्या पक्षांनाही महत्त्व राहणार आहे. मध्यप्रदेशमध्ये कॉंग्रेस आणि भाजपमध्ये ज्या प्रकारे चढाओढ सुरू आहे. तेथे अपक्षांना किंवा मायावतींना महत्त्व प्राप्त झाले आहे. काही असले तरी राहुल गांधींनी बाजी मारली आहे. त्यांनी ही सुरवात मोदींच्या गुजरातमध्ये केली होती. आज पाच राज्यांचे निकाल लक्षात घेता जरी मध्यप्रदेश गेले तरी कॉंग्रेसने दोन राज्यात निवडणुका जिंकताना मध्यप्रदेशात भाजपला घाम फोडला हे मान्य करावे लागेल. ज्या राहुल गांधींना आजही पप्पू म्हणून हिणविले जाते त्याच पप्पूंने धो डाला असे म्हणावे लागेल. 

भाजपकडे कसे बसे मध्यप्रदेश राहिल असे बोलले जात आहे. येथे भाजप आकाशपाताळ एक करून सत्ता राखण्याचा प्रयत्न करेल असे दिसत असले तरी मायावतींच तेथे किंगमेकर ठरतील असे दिसते. राहुल गांधी हे मायावतींशी कशा पद्धतीने हात मिळविणी करतात यावर तेथील खेळ अवलंबून आहे. कोणी जिंको कोणी पराभूत होवा पण, कॉंग्रेसची कामगिरी उत्तम राहिली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख