राहुल व सम्राट महाडिकांच्या विधानसभेसाठी जोर-बैठका! दुसऱ्यांना पाठिंबा बंद, आता स्वतःच लढणार! 

राहुल व सम्राट महाडिकांच्या विधानसभेसाठी जोर-बैठका! दुसऱ्यांना पाठिंबा बंद, आता स्वतःच लढणार! 

सांगली जिल्ह्यातील अनेक राजकीय नेत्यांनीही पेठ नाका येथील महाडिक कुटुंबियांना कामापुरते वापरुन लाभाच्या वेळी बाजूला केले आहे. हा इतिहास आहे. वाळवा, शिराळा तालुक्‍यात महाडिक कुटुंबियांनी मानसिंगराव नाईक, शिवाजीराव नाईक, जयंत पाटील व इतर सर्व विरोधकांना आळीपाळीने आपली राजकीय ताकद दिली आहे. प्रत्येक निवडणुकीत महाडिक गटाची निर्णायक ताकद या सर्वांना मिळाली आहे.

इस्लामपूर : अनेक राजकीय नेत्यांना आजपर्यंत तलवार भेट देऊन वाळवा, शिराळा तालुक्‍यात पाठिंबा दर्शवणाऱ्या महाडिक कुटुंबातील राहुल महाडिक व सम्राट महाडिक या दोघा बंधूंनी इस्लामपूर व शिराळा मतदारसंघात विधानसभेची तयारी सुरु केली आहे. 

या दोघा बंधूंनी भेट देण्याची तलवार आता लढविण्यासाठी उगारल्याने इस्लामपूर व शिराळा मतदारसंघातील राष्ट्रवादीला गुदगुल्या तर इतर विरोधकांची गोची झाली आहे. निवडणूकीपुर्वी वर्षभर महाडिक कुटुंबियांनी जोर बैठका काढायला सुरुवात केल्याने महाडिकांची मेहनत फळाला येणार का. या बाबत उत्सुकता आहे. 

सांगली, कोल्हापूर व सोलापूर या तीन जिल्ह्यातील राजकारणात महाडिक कुटुंबियांचा दबदबा आहे. महाडिक कुटुुंबात एक खासदार, एक आमदार, एक जिल्हा परिषद अध्यक्ष, एक माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक अशा अनेक पदांवर या कुटुंबातील सदस्य सध्या काम करत आहेत. 

यात महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शौमिका महाडिक, राहुल महाडिक, सम्राट महाडिक, मिनाक्षीताई महाडिक हे आघाडीवर आहेत. वनश्री नानासाहेब महाडिक हे सांगली जिल्ह्यातील राजकारण पाहतात. आजवर त्यांनी वाळवा, शिराळा तालुक्‍यासह जिल्ह्यातील अनेक राजकीय कुटुंबांना ऐनवेळी मदतीचा हात दिला आहे.

सांगली जिल्ह्यातील अनेक राजकीय नेत्यांनीही पेठ नाका येथील महाडिक कुटुंबियांना कामापुरते वापरुन लाभाच्या वेळी बाजूला केले आहे. हा इतिहास आहे. वाळवा, शिराळा तालुक्‍यात महाडिक कुटुंबियांनी मानसिंगराव नाईक, शिवाजीराव नाईक, जयंत पाटील व इतर सर्व विरोधकांना आळीपाळीने आपली राजकीय ताकद दिली आहे. प्रत्येक निवडणुकीत महाडिक गटाची निर्णायक ताकद या सर्वांना मिळाली आहे. निवडणूक झाल्यावर व निवडून आल्यावर संबंधीत उमेदवाराला आपण आपल्या ताकदीवर निवडून आल्याचा भास होतो व महाडिक कुटुंबियांचा हळूहळू विसर पडतो. हे महाडिकांच्याही अंगवळणी पडले आहे. 

पंचायत समिती सदस्य राहुल महाडिक व माजी जिल्हा परिषद सदस्य सम्राट महाडिक यांनी यावेळेला जुनी पायवाट बंद करुन स्वतःची वाट निर्माण करण्याचा मनसुबा आखला आहे. राहुल महाडिक यांनी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात गावोगाव नियोजनबद्ध दौरा आखून आपले काम सुरु केले आहे. तर सम्राट महाडिक यांनी यावेळेला शिराळा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी अगदी नियोजनबध्द हालचाली सुरु केल्या आहेत. त्यातूनच त्यांनी गावोगाव महाडिक युवा शक्तीची शाखा, गाव तेथे सक्षम कार्यकर्ता हे धोरण अवलंबले आहे.

या अनुषंगाने रविवारी महाडिक युवा शक्तीतर्फे शिराळा येथे नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाडिक बंधूंच्या निवडणूक लढवण्याच्या या पवित्र्याने वाळवा, शिराळा तालुक्‍यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. महाडिकांच्या या भूमिकेने राष्ट्रवादी म्हणजेच शिराळ्यात मानसिंगराव नाईक गट व इस्लामपुरात जयंत पाटील गट यांच्यात खुशीचे वातावरण आहे. तर दोन्ही तालुक्‍यातील भाजपला महाडिकांची भुमिका अडचणीची ठरेल. महाडिकांची ही भूमिका स्वतःचे मायलेज वाढवण्यासाठी असेल की महाडिकांच्या जीवावर सुसाट सुटणाऱ्या इतरांना गतीरोधक होईल हे येणारा काळच ठरवेल. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com