कॉंग्रेस व भाजपला पर्याय उभा करणार : रघुनाथदादा पाटील

सुकाणू समिती सदस्यांनी शुक्रवारी जिल्ह्यात भेट देऊन बोंडअळी व वन्यप्राण्यांनी उद्‌वस्त केलेल्या कपाशी व तूर पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. येथील विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यात भाजप सरकारचा कारभार दिशाहीन झाला आहे. सक्षम विरोधक नसल्याने सत्ताधाऱ्यांचे फावत असल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केली.
कॉंग्रेस व भाजपला पर्याय उभा करणार : रघुनाथदादा पाटील

यवतमाळ : शेतकरी आत्महत्यांचा आकडा कमी होण्याऐवजी वाढत आहे. बोंडअळी, फवारणी, फसवी कर्जमुक्ती आदींमुळे शेतकरी अस्वस्थ आहेत. पोशिंद्याच्या बाजूने लढण्यासाठी कुणीही तयार नाही त्यामुळे आता कॉंग्रेस व भाजपला शेतकरी नेतृत्वचाच पर्याय आहे, असे मत शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी व्यक्त करीत आगामी राजकीय वाटचालीचे संकेत दिले. 

सुकाणू समिती सदस्यांनी शुक्रवारी जिल्ह्यात भेट देऊन बोंडअळी व वन्यप्राण्यांनी उद्‌वस्त केलेल्या कपाशी व तूर पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. येथील विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यात भाजप सरकारचा कारभार दिशाहीन झाला आहे. सक्षम विरोधक नसल्याने सत्ताधाऱ्यांचे फावत असल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केली. 

कर्जमाफीच्या घोषणेनंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतांना दिसत नाही. जीवन संपविल्याने कोणतेही प्रश्‍न संपत नाही. उलट कुटुंबाची वाताहत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी अकाली जीवन संपविण्याचे कटू पाऊल उचलू नये. आत्महत्या न करता शेतकऱ्यांनी लढाईचा मार्ग अवलंबिला पाहिजे. वीज बिलाचा भरणा न करणाऱ्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. भारतीय संविधानाने कर्जमुक्तीचे संरक्षण दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वीजबिलाचा भरणा करू नये, असे आवाहन त्यांनी केले. 

मनमोहन सिंग पंतप्रधान असताना 2004 मध्ये स्वामीनाथन आयोगाची स्थापना करण्यात आली. या आयोगाने कारणे व उपाय सुचवून 2006 ला अहवाल सादर केला. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने शेतकऱ्यांच्या समस्यांवर अहवाल सादर केला. उत्पादन खर्च अधिक 50 टक्के नफा, असे त्यात नमूद आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने जाहीरनाम्यात उत्पादन खर्च अधिक 50 टक्के नफा देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी आश्‍वासन पाळले नाही. त्यामुळे उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सरकारने ऍफेडेव्हिट दिले. त्यात भाववाढ देणे शक्‍य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. आश्‍वासनांचा पाऊस पाडून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली. मात्र, जनताच सर्वोच्च न्यायालय आहे. सत्तेसाठी शेतकऱ्यांचा वापर सर्वांनीच शिडीसारखा केला. आता आम्हीच कॉंग्रेस व भाजपला राजकीय पर्याय देणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रा. सुशीलाताई मोराळे, किशोर ढमाले, गणेश जगताप, शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार, ऍड. विजया धोटे, मिलिंद धुर्वे, राजेंद्र हेंडवे, अशोक भुतडा, यशवंत इंगोले आदी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com