कांदा निर्यातबंदीचे नुसतेच ट्‌विट, अधिसूचना जारी न करणे हा मूर्खपणा : रघुनाथदादा पाटील

रघुनाथदादा पाटील म्हणाले....0 उद्योगपतींचा पैसा घेऊन सगळे राजकीय पक्ष राजकारण करताहेत0 स्वातंत्र्यानंतर रुपयाचे अवमूल्यन वाढत गेल्याने महागाईचा कळस झालाय0 प्रजननाचा अभ्यास न करता शेतकऱ्यांचा छळ करण्यासाठी वन्यजीव संरक्षण कायदा आणला0 पाळीव प्राण्यांना निर्दयी वागणूक विरोधी कायद्यातून शेतकऱ्यांना दिला जातो त्रास0 सहनशीलतेचा अंत होत चाललेला असताना सरकारला लाज वाटत नसेल, तर लोक आमदार-खासदारांना घरात शिरुन मारतील
 कांदा निर्यातबंदीचे नुसतेच ट्‌विट, अधिसूचना जारी न करणे हा मूर्खपणा : रघुनाथदादा पाटील

नाशिक : केंद्रीय ग्राहक संरक्षणमंत्री रामविलास पासवान यांनी कांदा निर्यातबंदी उठवल्याचा ट्‌विट केला. याला काही अर्थ आहे काय ? असा प्रश्‍न उपस्थित करुन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी आज येथे कांदा निर्यातबंदीची अधिसूचना जारी न करणे हा मूर्खपणा आहे, अशा शब्दात टोला लगावला. तसेच ग्राहकांचे हित जोपासण्यासाठी नव्हे, तर उद्योगपतींच्या भल्यासाठी शेतकरीविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप त्यांनी केला. 

शेतकरी संघटनेचे इस्लामपूरमध्ये (जि. सांगली) राष्ट्रीय अधिवेशन 19 ते 23 मार्चला होत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी शेतीच्या प्रश्‍नांवर झोपेचे सोंग घेतले असल्याने कंबरड्यात लाथ घालण्यासाठी राजकीय पक्षांना सोडचिठ्ठी देऊन सर्व शेतकऱ्यांनी एक येण्याची हाक देण्यासाठी हे अधिवेशन होत असल्याचे सांगून श्री. पाटील म्हणाले, की जीवनावश्‍यक वस्तू कायद्यातंर्गत समाविष्ट असलेल्या भरडधान्य, डाळी, तेलबिया, कापूस, ऊसाचे भाव सरकारने बांधून दिले आहेत. कायद्यात समाविष्ट असलेल्या शेतमालाचे उत्पादन कमी होऊ नये म्हणून उत्पादकाला योग्य भाव द्यायचे याची तरतूद असतानाही कांद्याला अपवाद का केले हा खरा प्रश्‍न आहे. 

देशात खुली अर्थव्यवस्था स्वीकारली असताना कांद्यावर कोणत्या कायद्याने निर्यातबंदी घातली हे सरकार सांगत नाही. एवढेच नव्हे, तर सगळ्यात अधिक आत्महत्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी केल्या आहेत. देशातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची संख्या सहा लाख असून त्यात महाराष्ट्रातील 80 हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे. कृषीमूल्य आयोग शेतकऱ्यांना भाव मिळवून देत नाही. उत्पादन खर्चाच्या 40 टक्के भाव मिळतो असा अहवाल न्यायालयात सादर झाला आहे. अस्मानीपेक्षा सुलतानी संकटामुळे शेतकऱ्यांचे बळी जाताहेत. ही सारी परिस्थिती पाहता, शेतकरीविरोधी कायदे रद्द व्हायला हवेत. 

भेसळयुक्त अन्न-दुधामुळे रोगराई वाढली 
आमदार-खासदार दूधाच्या धंद्यात शिरल्याने भेसळ वाढली असून भेसळयुक्त अन्न-दुधामुळे रोगराई वाढल्याचा आरोप करुन श्री. पाटील म्हणाले, की देशात रोज 15 कोटी लिटर दुधाचे उत्पादन होते. 64 कोटी लिटर दूध खपते. त्यामुळे पाण्याची भेसळ समजण्यासारखी आहे. मात्र रसायनयुक्त दूध विकले जात आहे. त्यामुळे महिला आणि मुलांमधील कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. त्यास कारणीभूत असलेल्यांविरुद्ध कारवाई होत नाही. हे कमी काय म्हणून आमदार, खासदारांकडून होणारे कायदे मान्य नसतील, तर त्यावर न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार संपुष्टात आणला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जाच्या रोगावर इलाज काढला जात नाही. एकीकडे निर्यातबंदी आणि दुसरीकडे आयातीचे प्रमाण कमी होत नाही. इथेनॉल वापरण्यासाठी 21 वर्षांपासून चर्चेचे गुऱ्हाळ सुरु आहे. ब्राझीलमध्ये 80 वर्षांपासून इथेनॉल वापरले जात आहे. शिवाय महाराष्ट्रात शेतकऱ्यांकडून वीजबिलापोटी 30 हजार कोटी उकळल्याचा टाटा संस्थेचा अहवाल आहे. कालिकादेवी मंदिर भक्तनिवासात श्री. पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट, पश्‍चिम महाराष्ट्र प्रमुख बाळासाहेब पटारे, बळीराजा पार्टीचे अध्यक्ष शिवाजीराव नांदखिले, सांगलीचे पंकज माळी, केशवअण्णा पाटील आदी उपस्थित होते. 

लोककवी प्रा. विठ्ठल वाघ उद्‌घाटक 
राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्‌घाटन लोककवी प्रा. डॉ. विठ्ठल वाघ यांच्या हस्ते होईल. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. देवानंद शिंदे अध्यक्षस्थानी असतील. सायंकाळचे कवीसंमेलन प्रा. वाघ यांच्या उपस्थित होईल. चिलगव्हाण (जि. यवतमाळ) येथील शेतकरी साहेबराव करपे यांनी कुटुंबातील पाच सदस्यांसह 19 मार्च 1986 ला आत्महत्या केली होती. त्यावेळी प्रा. वाघ यांनी दीर्घकविता लिहिली होती. या कवितेची प्रत शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यात येणार असल्याची माहिती श्री. पाटील यांनी दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com