Prakash Abitkar - KP Patil Radhanagari
Prakash Abitkar - KP Patil Radhanagari

राधानगरी विधानसभा : प्रकाश आबीटकरांच्या विरोधात इच्छुकांची गर्दी

राधानगरी, भुदरगड या दोन तालुक्‍यासह आजरा या एका जिल्हा परिषदेचा मिळून राधानगरी विधानसभा मतदार संघ. व्याप्ती मोठी असल्याने सातत्याने राजकीय समिकरणे बदलतात. येथे कोणत्याही पक्षाचे खंबीर नेतृत्व नसल्याने एकसंधपणा नाही. यामुळे विस्कटलेली घडी आणि मतांची विभागणी याचे पडसाद दिसतात. यातून जो मुसुंडी मारेल तोच तरेल असे चित्र. आमदार प्रकाश आबीटकर यांचा वचपा काढण्यासाठी के. पी. पाटील यांनी चंग बांधलेला असला तरीही येथे इच्छुकांची मांदियाळी आहे. खुद्द आघाडी आणि युतीतही भरमसाठ इच्छूक सध्या दिसत आहे. आबीटकर यांच्या विरोधात कोण असेल यातून रंगत येणार आहे.

विस्ताराने भव्य आणि छोट्या छोट्या खेड्यांनी व्यापलेल्या राधानगरी विधानसभा मतदार संघात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचाच वरचष्मा आहे. तरीही गेल्यावेळी के. पी. पाटील यांचा मोठ्या फरकाने पराभव करून शिवसेनेचे प्रकाश आबीटकर आमदार झाले. नव्या मतदारांचा कौल, के. पी. यांच्यावरील नाराजी आणि कॉंग्रेसचा छुपा पाठींबा हे त्यांच्या यशाचे गमक होते. आता तो पराभवाचा वचपा काढण्यासाठी के. पी. पाटील यांनी विडा उचलला आहे. 

परंतु, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षच ए. वाय. पाटील खांब ठोकून आहेत. त्यांच्या मंथनातून काय निघणार शिवाय आणखी कितीजण शड्डू ठोकून असणार याचा अजून अंदाज नाही. येथे सर्वाधिक उमेदवार इच्छुकांच्या यादीत आहेत. अशात आता भुदरगडकरांनी थांबावं यशाचं माप राधानगरीकरांच्या झोळीत टाकावं असा नवा सुर आळवला जात आहे.

आमदार आबीटकर यांनी के. पीं. चा पराभव करून केवळ सत्ता घेतली नाही तर गतीमान विकास काय असतो हे पुढे आणले. या मतदार संघामध्ये जितकी म्हणून काम ओढून आणता येतील तितकी आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. गाव तिथे काम देऊन त्यांनी प्रत्येक गावात आपल्या कामातून ठसा उमठवलेला आहे. 

आजवर खाच खळग्यांनी भरलेल्या रस्त्यांचा मतदार संघ हा कलंक त्यांनी पुसुन टाकला. प्रत्येक गाव, वाडीवर पक्का रस्ता नेला. मागेल ते काम देण्याचा त्यांनी प्रयत्न केल्याचे दिसून येते. केवळ कामं केली नाहीत तर त्यांचे मार्केटींग करण्याची संधीही त्यांनी सोडलेली नाही. मतदार संघात विविध विकास कामांची उद्घाटने करताना त्याची जाहीरात करून, घराघरात पत्रिका देऊन मतदारांना कामाची ओळख देण्याची संधी त्यांनी सोडलेली नाही. प्रत्येक दहा गावांसाठी एक समन्वयक नेमून लोकांशी सातत्याने संपर्कात राहण्यात त्यांचा हातखंडा आहे. यातून त्यांनी मी कोणत्या पक्षाचा यापेक्षा 'मी लोकांचा" ही नवी ओळख तयार केली आहे. अनेकांना कामं देऊन त्यांची एक स्वतंत्र यंत्रणा तयार केलेली आहे. हेच त्यांचे आव्हान त्यांच्या विरोधकांना राहणार आहे.

के. पी. पाटील यांनी आबीटकरांच्या पाडावाचा विडा उचलला आहे. गेल्यावेळी आघाडी असूनही विरोधात गेलेली मते याचा अंदाज घेत त्यांनी कांहीही करून आबीटकरांना आपण पराभूत करू शकतो असा त्यांचा अंदाज आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि बिद्री साखर कारखान्याचा कारभार ही त्यांची बलस्थाने आहेत. परंतू या घोडदौडीत ए. वाय. हे त्यांच्या समोरचे आव्हान आहे. ए. वाय. पाटील यांनी कांहीही झाले तरी राष्ट्रवादीची उमेदवारी आपल्यालाच आहे या दृष्टीने चाल सुरु केली आहे. तेच जिल्हाध्यक्ष असल्याने त्यांना तो आत्मविश्‍वास आहे. त्यांचे राधानगरी तालुक्‍यासह बिद्री साखर कारखान्याच्या माध्यमातून चांगले जाळे आहे. परंतु, पक्षीय पातळीवर वाद हाच मोठा अडसर आहे.

गेली अनेक वर्षे आमदार होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेले गोकुळचे संचालक अरूण डोंगळे यावेळी काहीही होवो निवडणूक लढवणारच अशा पवित्र्यात आहेत. ते स्वतः, त्यांचा मुलगा आणि पत्नी अनिता हे या ना त्या कारणाने या मतदार संघात मतदारांच्या संपर्कात असतात. प्रत्येक गावातील दूध संस्था हे त्यांच्या संपर्काचे जाळे आहे. यासह राहूल देसाई, जिवन पाटील, सत्यजित जाधव यांनीही या निवडणूकीच्या दृष्टीने मेळाव्यातून संपर्क वाढवला आहे. या सगळ्यांना पक्षीय लेबल आहे. परंतू या मतदार संघात एकच नाव चर्चेत आहे ज्यांच्या हाती कोणताही झेंडा नाही की सत्ता नाही तरीही एक स्वतंत्र वलय निर्माण केललं आहे. ते म्हणजे चंद्रकांत पाटील- कौलवकर. अडलेल्याला मदत, स्पर्धांना सढळ निधी, गणेशोत्सवाचे हिरो, गरीब रुग्नांचा हक्काचा आधार म्हणून हे नाव चर्चेत आहे. 

गेल्या दीड वर्षात त्यांनी सढळ हातांनी केलेली मदत हाच गावागावात चर्चेचा आणि स्पर्धेतल्या उमेदवारांनाही गुंतागुंतीचा विषय ठरलेला आहे. गावागावातील युवकांचे ताफे हे त्यांचे बलस्थान ठरत आहे. विधानसभेच्या दिशेने त्यांनी घोडदौड सुरु केलेली आहे. राधानगरीचे उपसभापती रविश पाटील हेही या स्पर्धेत आहेत. आता राधानगरीचा आमदार हा नवा ट्रेंड पुढे येत आहे.

या मतदार संघातून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी निवडणूक लढवावी हा भाजप कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. एकीकडे शिवसेनेचे आमदार सत्तेवर असताना ही गुगली काय आहे ? याचा अर्थ अनेकांना समजलेला नाही. एकंदरीत या मतदार संघात आबीटकर यांच्या विरोधात इच्छुकांची गर्दी आहे.
.
2014 ची मते
प्रकाश आबीटकर-132485
के. पी. पाटील- 93077
जालंदर पाटील-5942
सातापा कांबळे- 1395
विजयमाला देसाई- 613
उमेश कांबळे- 620
अशोकराव खोत- 491
अशोक सुतार - 891

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com