महसूल मंत्र्यांच्या तालुक्यातच वाळू माफियांना संरक्षण : विखे पाटील यांचा आरोप

पाथर्डी तालुक्‍यातील मल्हारी बटुळे या शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून केलेली आत्महत्या हे महाविकास आघाडी सरकारचे पाप आहे. या आत्महत्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कर्जमाफीची फसवी घोषणाच कारणीभूत आहे असा आरोप माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला
Radhakrishna Vikhe Patil Criticizes Balasaheb Thorat about Sand Mafia
Radhakrishna Vikhe Patil Criticizes Balasaheb Thorat about Sand Mafia

लोणी : "पाथर्डी तालुक्‍यातील मल्हारी बटुळे या शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून केलेली आत्महत्या हे महाविकास आघाडी सरकारचे पाप आहे. या आत्महत्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कर्जमाफीची फसवी घोषणाच कारणीभूत आहे. ठाकरे सरकारला लोकांच्या प्रश्नांपेक्षा सत्ता टिकवण्याचीच अधिक चिंता आहे,'' अशी टीका आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज केली. महसूल मंत्र्यांच्या तालुक्यातच वाळू माफियांना संरक्षण दिले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

विखे पाटील यांनी एका कार्यक्रमानंतर येथे माध्यमांशी औपचारिक संवाद साधला. एकीकडे राज्य सरकार कर्जमाफीची घोषणा करत आहे, पण या कर्जमाफीतील कोणतीही स्पष्टता सरकार देऊ शकले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. सरकार असेच धीम्या गतीने निर्णय घेत राहिले, तर कर्जमाफीतील गोंधळामुळे गावपातळीवर उद्रेक होण्याची भीती विखे यांनी व्यक्त केली.

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकार 25 हजार रुपयांची मदत देणार होते, असे सांगून विखे पाटील म्हणाले, की शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करू, अशी ग्वाही खुद्द ठाकरे यांनीच सत्तेवर येण्यापूर्वी दिली होती; पण एकाही आश्वासनाची पूर्तता या सरकारकडून होत नसल्यामुळेच कर्जाला कंटाळून राज्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे.

'त्यांच्या' तालुक्‍यातच वाळूमाफियांना संरक्षण

"नगर जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात वाळूमाफियांनी उच्छाद मांडला असून, त्यांनी महसूल अधिकाऱ्यांनाच लक्ष्य केले आहे. अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ले सुरू आहेत, तरीही महसूलमंत्री दुर्लक्ष करीत आहेत. एक प्रकारे त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत आहे. महसूल मंत्र्यांच्या तालुक्‍यातच वाळूमाफियांना संरक्षण मिळत असेल, तर हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.'' प्रशासनातील अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ले करणाऱ्या वाळूमाफियांच्या विरोधात 'मोक्का' कायद्यान्वये कारवाई करावी,'' अशी मागणीही राधाकृष्ण विखे पाटील यांनी या वेळी केली  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com