शिर्डीत  काॅंग्रेस-राष्ट्रवादीकडे पदे मोठी पण पक्षाला फायदा काय ? 

राज्यभर व देशभर पक्षाचे नेतृत्त्व करण्याची संधी, पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची जवळीक आदींमुळे विखे पाटील व थोरात यांची प्रतिष्ठा महत्त्वाची मानली जाते. दोघेही दिग्गजांचे नेतृत्त्व असताना आघाडीची लोकसभेची जागा हरल्यास हा दोघांच्याही प्रतिष्ठेचा प्रश्न होईल.
Thorat_Tambe_Vikhe
Thorat_Tambe_Vikhe

नगर  :  काॅंग्रेसचे युवा नेते डाॅ. सुजय विखे पाटील यांना नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे नियोजन असल्याने ही जागा राष्ट्रवादीकडून काॅंग्रेसला मिळण्यासाठी विधानसभेतील विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील जीवाचे रान करतील. ते यशस्वी झाले, तर शिर्डी मतदारसंघातील जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला येईल. 

असे झाले तर ही जागा निवडून आणण्याची जबाबदारी विखे पाटील घेतील का, तसेच काॅंग्रेस व राष्ट्रवादीचे मोठी पदे या मतदारसंघात आहेत. पण त्याच्या या पदांचा आघाडीला फायदा काय असा प्रश्न आहे . आपापल्या  प्रतिष्ठेसाठी सर्वच नेते ताकद लावतील का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

उत्तर नगर जिल्ह्यात शिर्डी मतदारसंघ येतो. उत्तरेत काॅंग्रेसचे दिग्ग्ज नेते आहेत. काॅंग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवरील समितीत माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना स्थान देवून त्यांच्यावर पक्षाने आगामी निवडणुकांची मोठी जबाबदारी टाकली आहे. शिवाय विधानसभेतील विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडेही महत्त्वाचे पद आहे. 

थोरात यांचे भाचे सत्यजीत तांबे यांची नुकतीच युवक काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडीसाठी थोरात व विखे यांनी एकमेकांमधील वैमनस्य विसरून प्रयत्न केले. युवक काॅंग्रेसचे सरचिटणीसपदही करण ससाणे यांना संधी मिळाली आहे. ही सर्व महत्त्वाचे पदे उत्तर जिल्ह्यात असल्याने काॅंग्रेसच्या दृष्टीने आगामी निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची होणार आहे.

 राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अकोल्याचे माजी मंत्री मधुकरराव पिचड या  दिग्गज नेत्याचे वर्चस्व पक्ष पातळीवर  आहे. तसेच युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते याच मतदारसंघातले  आहेत. नव्याने प्रदेश सरचिटणीसपद अविनाश आदिक यांना देण्यात आले आहे. त्यामुळे सर्व नेत्यांचा मोठा संपर्क या निवडणुकीत कामे येणार आहे. साहजिकच लोकसभेची जागा कोणत्याही परिस्थितीत आघाडीला जिंकावी लागणार, यासाठी सर्व नेत्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केल्यास हे शक्य आहे.

शिवसेनेचेच आव्हान मोठे

शिर्डी लोकसभा मतदारसंघात मागील दोन्ही पंचवार्षिकमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराने बाजी मारली. २००९ मध्ये शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचाैरे विजयी झाले होते. २०१४ च्या निवडणुकीत मात्र वाकचाैरे काॅंग्रेसकडून उभे राहिले. या वेळी शिवसेनेचेच सदाशिव लोखंडे विजयी झाले. या वर्षी वाकचाैरे दंड थोपटून रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. ते भाजपकडून उमेदवारी करतील.

काॅंग्रेस-राष्ट्रवादी मात्र भक्कम उमेदवाराच्या शोधात आहे. विखे यांचे समर्थक हेमंत ओगले उमेदवारी करू शकतील, अशी शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. शिवसेना व भाजपची युती झाल्यास शिवसेनेच्या सदाशिव लोखंडे यांचे  आव्हान पेलण्यासारखा उमेदवार देण्यासाठी राष्ट्रवादी व काॅंग्रेसच्या आघाडीची कसरत होणार आहे. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com