R R Patil's opponents also miss him | Sarkarnama

त्यांच्यासाठी विरोधकही अस्वस्थ होतात, इतकी आर आर आबांची उंची होती!

संपत मोरे
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018


दिवंगत नेते आणि माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांची आज जयंती. त्यानिमित्त...

"आर आर आबा आभाळाएवढा मोठा माणूस. माझे आणि त्यांचे राजकीय मतभेद होते. मी त्यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्यांच्या विरोधात भाषणेही केली, पण आबांनी कधीही मला त्याबद्दल विचारलं नाही. उलट ते मला कुठंही सार्वजनिक कार्यक्रमात भेटले तर आस्थेने बोलायचे. मलाही एका गोष्टीचा अभिमान वाटत राहिला की मी ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली तो माणूस आभाळाएवढ्या उंचीचा होता'... आर आर पाटील यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे सांगत होते.

"मी पूर्वी पत्रकार होतो तेव्हा आबांना पत्रकार म्हणून प्रश्न विचारायचो. नंतर शेतकरी चळवळीत गेल्यावर थेट स्टेजवरून आबांच्या धोरणाच्या विरोधात टीका करायचो. पण आबांना माझं कौतुक वाटायचं. आमची भेट झाली की ते आवर्जून माझ्याशी बोलायचे. "

"माझ्या मांजर्डे गावात एका शिक्षकाचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात आबा प्रमुख पाहुणे होते. कार्यक्रम सुरु झाल्यावर आबांनी मला हाताने खुणावत बोलावले. त्यांच्या मोबाईलवर केंद्र सरकारने एफआरपी बाबतचा घेतलेल्या निर्णयाचा एक मेसेज आला होता. ते मला म्हणाले,"महेश, हे वाच आणि मला जरा समजून सांग. यातून शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल की नाही? "

मग मी आबांच्या शेजारील खुर्चीवर बसून त्यांना त्याबद्दल सांगितलं. मी बोलत होतो आणि आबा ऐकत होते. उपस्थित लोक आमच्याकडे बघत होते. एखादी गोष्ट समजावून घेणे ही आबांची शैली होती. तेव्हा ते कसलाही कमीपणा वाटून घेत नव्हते. आता आबा नाहीत त्यांचे आमच्यात नसणे माझ्यासारख्या त्यांच्या विरोधकालाही अस्वस्थ करते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख