Quadrangular Fight Possible in Ambegaon Shirur | Sarkarnama

बाणखेलेंचा शड्डू आंबेगाव-शिरुरमध्ये 'चौरंगी लढती'कडे नेणारा....

भरत पचंगे
गुरुवार, 11 जुलै 2019

आधीच वंचित विकास आघाडीने आपले लक्ष आंबेगाव-शिरुरकडे वळवून नाथा शेवाळे यांच्या उमेदवारीला थेट माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांचाच होकार करुन आणल्याने बाणखेलेंचा 'शड्डू' प्रस्थापित दोन्ही पाटलांसाठी धोक्याची घंटा आणि आंबेगाव-शिरुरमध्ये पहिल्यांदाच तुल्यबळ चौरंगी लढत होण्याचे रणशिंग फुंकणारा ठरणारा आहे.   

शिक्रापूर : आंबेगावमध्ये सध्याच्या प्रस्थापित वळसे-आढळराव या दोन्ही पाटलांना घरी पाठवून स्व. किसनराव बाणखेलेंच्या भावकीचा राजकीय वारसा पुढे चालविण्याचा चंग बांधत राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख प्रा. राजाराम बाणखेले यांनी आगामी विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे.

आधीच वंचित विकास आघाडीने आपले लक्ष आंबेगाव-शिरुरकडे वळवून नाथा शेवाळे यांच्या उमेदवारीला थेट माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांचाच होकार करुन आणल्याने बाणखेलेंचा 'शड्डू' प्रस्थापित दोन्ही पाटलांसाठी धोक्याची घंटा आणि आंबेगाव-शिरुरमध्ये पहिल्यांदाच तुल्यबळ चौरंगी लढत होण्याचे रणशिंग फुंकणारा ठरणारा आहे.   

वळसे-पाटील, आढळराव-पाटील, काळे-पाटील आणि आवटे-पाटील अशा पाटील घराण्यांकडेच सत्तेच्या चाव्या देण्याचा इतिहास असणा-या आंबेगावमधून यावेळी सध्या आंबेगाव-शिरुरमध्ये सुस्थापित झालेल्या दोन पाटलांना घरी बसवून पुन्हा एकदा बाणखेलेंकडे 'विधानसभेची जहागिरी' आणण्याची भिमगर्जना करीत प्रा.राजाराम बाणखेले सध्या संपूर्ण मतदार संघात फिरत आहेत. दोन महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागताच त्यांनी मतदार संघातील प्रत्येक गाव पिंजून काढायला सुरवात केली आहे. 

राष्ट्रवादी आणि शिवसेना या प्रस्थापित पक्षांच्या तालुकाध्यक्षपदाचा पूर्वानुनुभव असलेल्या या बाणखेलेंनी सध्या तरी शिवसेनेकडून आपली उमेदवारी मागण्याचा राजकीय डाव टाकत शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण करायला सुरवात केली आहे. मात्र, कधी काळी राष्ट्रवादीचेही तालुकाध्यक्षपद भूषविलेल्या या नव्या दमाच्या बाणखेलेंचा धोका दोन्ही पक्षांना असल्याने निवडणुकीआधीच आंबेगाव-शिरुरच्या प्रत्येक गावातील चौक हे राजकीय चर्चेचे आखाडा झाले आहेत. 

सन १९७२, १९८० व १९८५ अशा तीन वेळा आमदारकी आणि १९८९ मध्ये थेट संसदेत पोहचलेले लोकनेते स्वर्गीय किसनराव बाणखेले यांचा पूर्व इतिहास म्हणजे त्यांनी माजी आमदार स्व. दत्तात्रय वळसे-पाटील व माजी आमदार बी. डी. काळे-पाटील यांना हरविलेले आहे. हाच इतिहास सांगत 'बाणखेले कुणालाही हरवू शकतात..' असा विश्वास व्यक्त करीत प्रा.राजाराम बाणखेले यांनी शिवसेनेतील पक्षीय गळचेपी आणि राष्ट्रवादीची एकाधिकारशाही यावर बोट ठेवून आपला प्रचार प्रारंभ केला आहे. तीनच वर्षांपूर्वी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष असताना त्यांना पंचायत समितीच्या उमेदवारीसाठी डावलण्यात आले होते. त्याचाच राग व त्याचे उट्टे त्यांनी त्याच निवडणुकीत पंचायत समितीला थेट मंचरमधूनच अपक्ष निवडून येत भरुन काढले. 

अर्थात आढळराव पाटील १५ वर्षे खासदार राहिल्याने त्यांना मतदारांनी नाकारले आहे आणि आता वळसे पाटील यांना ३० वर्षे झाल्याने आणि राष्ट्रवादीला आता काही पुन्हा सत्ता मिळणार नसल्याने त्यांनाही लोक हमखास पाडतील आणि आपल्याला निवडतील असा बाणखेलेंचा दावा मात्र मतदार संघातील प्रत्येक चौकात चांगलाच चर्चेत आला आहे. 

दरम्यान माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांना लोकसभेत पराभव पत्करायला लागल्याने पुन्हा आढळराव हे वळसेंच्या विरोधात उभे राहतील आणि पुन्हा-पुन्हा या दोन्ही पाटलांचेच आंबेगाववर वर्चस्व राहील असे म्हणत याच दोन कुटुंबाकडेच सत्ता का असावी? असा सवाल उपस्थित करीत त्यांनी स्वत:ला सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयन्त सुरू केला आहे. पर्यायाने वळसे-आढळरावांवर अत्यंत तिखट भाषेत बोलून स्वत:ला सहानुभूती मिळवून शिवसेनेच्या तिकीटासाठी त्यांनी चालविलेले प्रयत्न किती यशस्वी होतील हे आताच सांगता येणे अवघड आहे. 

मात्र काहीही झाले तरी अपक्ष उभे राहण्याचा त्यांचा चंग आणि आधीच वंचित विकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर होण्याच्या अंतीम टप्प्यात असलेले जनता दल (सेक्यूलर) चे युवा प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे यांच्यामुळे आंबेगाव-शिरुरमध्ये आता चौरंगी लढतीची केवळ औपचारीकता असणार हे नक्की. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख