पुरूषोत्तम खेडेकरांचे देवेंद्र फडणविसांना काही प्रश्न..

पुरूषोत्तम खेडेकरांचे देवेंद्र फडणविसांना काही प्रश्न..

पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा गौरव करण्याचा मुद्दा भाजपने विधानसभेत लावून धरला. तसेच सावरकरांची बदनाम करणाऱ्या काॅंग्रेसच्या शिदोरी या मासिकावर बंदी घालण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यांच्या या मागणीवर मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरूषोत्तम खेडेकर यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

खेडेकर यांच्या म्हणण्यानुसार सावरकरांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे, यासाठी फडणवीस आग्रही आहेत. सावरकर अथवा इतर कोणालाही पद्म पुरस्कार देऊन गौरविण्याचे सर्वाधिकार भारत सरकारकडेच आहेत. २०१४ पासून केंद्रात सावरकरप्रेमी लोकांचे सरकार आहे. तर महाराष्ट्रात २०१४ ते २०१९ स्वत: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. त्यांनी भारत सरकारच्या गृह विभागाकडे सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी लेखी व तोंडी मागणी अनेक वेळा केली होती. याशिवाय शिवसेना मित्रपक्ष म्हणून भाजप सोबत होता. तरी सावरकरप्रेमींच्या पदरी निराशाच आली.

शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडी सरकारला सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याचे कोणतेही अधिकार नाहीत, हे फडणवीस यांना माहीत आहे. असे असतानाही आघाडी सरकारला वा शिवसेना नेत्यांना दोष देत बोंबाबोंब करणे देवेंद्र फडणवीस वा सुधर मुनगंटीवार यांच्या प्रतिमांना कमीपणा आणणारी बाब आहे, असा सल्ला खेडेकरांनी दिला आहे.

सावरकरांची खालच्या पातळीवर बदनामी करणारे काही लिखाण कॉंग्रेस पक्षाने शिदोरी नावाच्या मुखपत्रातून केली आहे , असे फडणवीस यांचे म्हणणे आहे. शिदोरी मासिक हे नाव आम्ही तरी प्रथमच फडणवीस यांच्याकडून ऐकले. फडणवीस संस्कृतीनुसार विचारांचा मुकाबला विचारानेच केला पाहिजेत . तसेच एखाद्या काना कोपऱ्यातून प्रकाशित करण्यात आलेल्या शिदोरी नावाच्या मासिकाची दखल घेऊन भाष्य करण्याचीही गरज नाही. तसे झाले असते तर कोणालाही शिदोरी मासिक माहीत झाले नसते. सावरकर बदनामी लपून राहिली असती. उलट सावरकरप्रेमी देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: पुढाकार घेऊन सावरकरांची जगजाहीर बदनामी केली आहे. यामुळे शिदोरी मासिकाची दखल घेत वाचक वाढले. `शिदोरी`च्या झेरॉक्स प्रती विकल्या जात आहेत. २००४ साली छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी झाली होती. तेंव्हा फडणवीस संस्कृती वरिलप्रमाणे मांडणी करत होती. तरी फडणवीस यांनी विचार करावा.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप व देवेंद्र फडणवीस हे अस्सल शिवप्रेमी , शिवभक्त व शिवाभिमानी आहेत असा त्यांचा दावा आहे. असे असेल तर सावरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत लिहून ठेवलेले वाचायला आवडेल कां  ? ते लिखाण आजही उपलब्ध आहे, असे खेडेकर यांनी विचारले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणारे सावरकर हे भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी असे अपात्र ठरतात, असेही मत त्यांनी नोंदविले आहे.

सावरकरांचे सर्व माफीनामे अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असतानाच शासनाच्या माध्यमातून प्रकाशित केले आहेत. माफीनामे ही सावरकर यांची राजकीय खेळी होती असे मानले तरी हरकत नाही. परंतू दुर्दैवाने पुढे सुटका झाल्यावर सावरकर मृत्यूपर्यंत तसे वागले नाहीत. शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आजोबा केशव सीताराम ठाकरे यांचे सावरकराबाबतचे मत फडणवीस यांना माहीत असावे असे वाटते. देवेंद्र फडणवीस यांना कोणते सावरकर मान्य आहेत ? एवढेच त्यांनी स्पष्ट करावे ही विनंती आहे. जर सुधारणावादी, पुरोगामी सावरकर मान्य केले तर प्रथम सावरकरांचे आक्षेपार्ह लिखाणावर बंदी घातली पाहिजेत, हीच फडणवीस यांनी मागणी केली पाहिजे. सर्व बहुजन शिवप्रेमी सोबत असतील. सुधीर मुनगंटिवार किंवा चंद्रकांतदादा यांना बहुजन समाज गंभीरपणे घेत नाही, असाही टोला त्यांनी लगावला आहे. मराठी भाषा दिवस लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त करावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com