तुम्हाला माहित आहे का पुण्याचा हा दुसरा लाॅकडाऊन आहे, पहिला १९७६ मध्ये झाला का ते वाचा....

आताच्या कोरोनामुळे झालेल्या 'लाॅकडाऊन'मध्ये लोकांना बाहेर फिरु नका असे साम, दाम, दंड, भेद असे चारही मार्ग वापरुन सांगायला लागतंय. पण पुण्यात एक वेळ अशी होती की नागरिक कुणी न सांगताच सातच्या आत घराच जायचे......
Pune Witnessed Its First Lock Down in 1976
Pune Witnessed Its First Lock Down in 1976Sarkarnama

पुणे : आज जगभरात 'कोरोना' विषाणू थैमान घालतो आहे. भारतालाही याची मोठ्या प्रमाणावर याची झळ पोहोचली आहे. मात्र, भारताने आणि महाराष्ट्राने वेळीच काळजी घेतल्याने कोरोनाला काही प्रमाणात तरी थोपवण्यात यश आलं आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यातला एक महत्त्वाचा उपाय म्हणजे. 'लाॅकडाऊन' देशाच्या पंतप्रधानांनी सुरुवातीला २४ एप्रीलपर्यंत लाॅकडाऊन जाहीर केला. त्यानंतर तो तीन मे पर्यंत वाढवला. काही नतद्रष्ट अपवाद वगळता बहुसंख्य नागरिक हा लाॅकडाऊन पाळत आहेत.

आपल्या पुण्यात एक वेळ अशी आली होती की सायंकाळनंतर आपोआपच 'लाॅकडाऊ' व्हायचा. रस्त्यावर चिटपाखरूही दिसायचं नाही. एवढंच काय घराची दारं खिडक्याही बंद व्हायच्या. रस्त्यावर दिसायचे ते नाकाबंदी करणारे पोलिस. घरातली लहान मुलेही 'सातच्या आत घरात'चा नियम न चुकता पाळायची. कारण त्यांच्या कानावरही घरात सुरु असलेल्या चर्चा यायच्या. आताच्या 'लाॅकडाऊन'मध्ये लोकांना बाहेर फिरु नका असे साम, दाम, दंड, भेद असे चारही मार्ग वापरुन सांगायला लागतंय. पण त्यावेळी लोक स्वतःहूनच संध्याकाळी 'लाॅकडाऊन' व्हायचे....काय होते कारण...

काही आठवणी नकोशा वाटतात...पण त्या येतातच...जेव्हा तुमच्या गावाचं शहराचं किंवा परिसराचं नाव एखाद्या घटनेशी जोडलेलं असतं तेव्हा तर अशा आठवणी हमखास येतात. पुण्याचा भांडारकर रस्ता हा रोजच्या वहिवाटीचा. पण परवा मात्र हा रस्ता जुन्या आठवणीत घेऊन गेला. कोरोनाच्या निमित्तानं झालेल्या लाॅकडाऊनमुळं या रस्त्यावर शब्दशः कुत्रं नव्हतं. रस्ता संपतो तिथंच डावीकडं आहे 'स्मृती' बंगला. या बंगल्याकडं पाहताना जुन्या स्मृती जाग्या झाल्या. मनात आलं अरेSSS त्यावेळीही होता की लाॅकडाऊन. पण स्वयंघोषित.

१९७६ चे वर्ष पुण्यासाठी ठरले धक्कादायक

याला सुरुवात झाली ती १९७६ मध्ये १५ जानेवारी १९७६ ला स्वारगेट प्रसिद्ध 'हॉटेल विश्व'चे मालक हेगडे यांचा मुलगा प्रकाश घरातून नाहीसा झाला होता. पुण्याची लोकसंख्या त्यावेळी अवघी सात-साडेसात लाख. 'विश्व'च्या मालकांना त्यावेळी अनेक जण ओळखत. त्यामुळं या प्रकाराची शहरात चर्चा झाली. पुणे सहा महिने शांत होते. त्यानंतर अचानक ३१ ऑक्टोबर १९७६ला सदाशिव पेठेतल्या विजयानगर कॉलनीमध्ये राहणारे अच्युत जोशी आणि त्यांच्या पत्नी उषा आणि मुलगा आनंद यांचा त्यांच्या राहत्या घरी गळा आवळून खून झाला. अवघं पुणं हादरलं. त्यानंतर तीन आठवड्यांनी शंकरशेठ रस्त्यावर असलेल्या बाफना यांच्या 'त्रिशला' बंगल्यात दरोड्याचा प्रयत्न झाला.

अफवांना आलं होतं उधाण

१ डिसेंबर १९७६ चा दिवस मात्र पुणेकरांसाठी वेगळा ठरला. वर उल्लेखलेल्या 'स्मृती' बंगल्यात वास्तव्याला असणारे संस्कृत पंडित काशिनाथशास्त्री अभ्यंकर, त्यांच्या पत्नी इंदिराबाई, नातू धनंजय, नात जाई आणि त्या घरात घरकाम करणाऱ्या सखुबाई वाघ या पाच जणांचे दोरीने आवळून खून करण्यात आले. हा पुण्याला जबरदस्त धक्का होता. जोशी आणि अभ्यंकर कुटुंबियांच्या खुनात साम्य होतं. दोन्ही कडे विशिष्ट पद्धतीचे दोरखंड वापरले होते. दोन्ही घरांत एकाच वेळी हवासा आणि नकोसा वाटणाऱ्या द्रव्याचा सुगंध येत होता. हत्येचे दोन्ही दिवस दशमीचे होते. साहजिकच पुण्यात अफवांना उधाण आलं.

त्यानंतर २४ मार्च, १९७७ ला अनिल गोखले या युवकाचा मृतदेह एका शिडीला बांधलेल्या पोत्यात पुण्यात बंडगार्डनजवळ नदीपात्रात सापडला. तोपर्यंत पुण्यातल्या खून सत्राची चर्चा देशभर सुरु झाली होती. त्याच सुमारास चार युवक सातत्यानं बंडगार्डन पोलिस स्टेशनला जाऊन अनिल गोखलेबद्दल चौकशी करत होते. तेव्हाचे सहाय्यक आयुक्त मधुसूदन हुल्याळकर आणि इन्स्पेक्टर माणिकराव दमामे यांना या चौघांचा संशय आला आणि पुण्यात झालेल्या खुनांचं रहस्यच उलगडलं.

चर्चा तरुणांच्या क्रौर्याची

राजेंद्र जक्कल, दिलीप सुतार, शांताराम जगताप, मुनव्वर शहा, सुहास चांडक या सर्वांना पोलिसांनी अटक केली. या सर्वांनी खुनाची कबुली दिली. पुणेकरांच्या डोक्यावरचा एक भार उतरला. यापैकी चांडक पुढे माफीचा साक्षीदार झाला. सुमारे सहा वर्षे हा खटला सुरु होता. त्यात जक्कल, सुतार, जगताप व शहा या चौघांनाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय या दोन्ही वरिष्ठ न्यायालयांनी ही शिक्षा कायम केल्यानंतर २७ नोव्हेंबर, १९८३ ला पुण्याच्या येरवडा कारागृहात फाशी देण्यात आलं.

कोण होते जोशी कुटुंबीय

या खुनात मरण पावलेले अच्युतराव जोशी यांचे मुंबई व ठाण्याला दोन प्रिंटिंग प्रेस होते. खुनाच्या आधी दहा वर्षे त्यांनी तो व्यवसाय विकून टाकला होता. तंबाखू व नारळाचाही त्यांचा मुंबईत व्यवसाय होता. तो व्यवसायही त्यांनी आपल्या भावाला देऊन टाकला होता व गेली दहा वर्षे ते निवृत्त जीवन जगत होते. उषाताई गृहिणी होत्या तर आनंद माॅडर्न काॅलेजला बारावीच्या वर्षात शिकत होता.

कोण होते अभ्यंकर कुटुंबीय

या हत्याकांडात बळी पडलेले महामहोपाध्याय काशिनाथशास्त्री अभ्यंकर संस्कृत पंडित होते. त्यांनी अनेक संस्कृत ग्रंथांचे लेखन केले होते. त्या काळी राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा संस्कृत पंडित म्हणून गौरव झाला होता. त्यांच्या पत्नीही विद्वान होत्या. हे ज्या बंगल्यात रहात तो त्यांचे ज्येष्ठ पूत्र ग. का. अभ्यंकर यांनी बांधला होता. गजाननराव अभ्यंकर भारताच्या संरक्षण खात्याचे अर्थ सल्लागार होते. खून होण्यापूर्वी दहा महिने आधीच त्यांनी 'स्मृती' हा बंगला बांधला होता. आज या बंगल्यात मूक-बधीर मुलांची शाळा चालवली जाते.

का केले हे सगळं

या प्रकरणातले चारही आरोपी हे पुण्याच्या प्रसिद्ध महाविद्यालयातले विद्यार्थी. त्यातल्या राजेंद्र जक्कलच्या वडलांचा बुधवार पेठेत फोटो स्टुटिओ होता. स्वतः जक्कल हा चांगला चित्रकार होता. बाकी तिन्ही आरोपीही सामान्य कुटुंबातलेच. महाविद्यालयात असल्यापासूनच जक्कल वाया गेलेला होता. मारामाऱ्या, चाकू बाळगणे, मोटारसायकली उडवणे असे त्याचे शौक. सुतारला व्यायामाची आवड होती. पण तोही जक्कलच्या संगतीत अडकला. या सगळ्यांनी हे का केलं हा खरंतर प्रश्नच आहे.

ज्या दोन्ही कुटुंबांची हत्या या टोळीने केली तिथे चोरी जरुर केली. पण चोरीला गेलेला ऐवज मात्र फार अगदीच किरकोळ होता. त्यामुळे चोरी हे केवळ वरवरचे कारण असावे. मुख्य कारण म्हणजे विकृती हेच म्हणावे लागेल. जक्कलला आपण डावलले जात असल्याची भावना होती, त्यातूनच त्याने हे कृत्य केले असावे, असे त्याच्या त्या वेळच्या काही समवयस्क मित्रांचे म्हणणे आहे. मारले गेलेले गोखले आणि चांडक हे तर या टोळीच्या मित्र परिवारातले. त्यांच्या हत्या करुन या लोकांना काय मिळालं असावं हा देखील प्रश्नच आहे.

या सर्व काळात तो स्वयंघोषित लाॅकडाऊन पुण्यात होत होता. आताचा लाॅकडाऊन हा न दिसणाऱ्या विषाणूच्या भयापोटी आहे. त्यावेळचा लाॅकडाऊन मानवरुपी विषाणूंच्या कृत्यांमुळं होत होता. सायंकाळी पुण्याचे रस्ते ओस पडत. स्वारगेट, मंडई, डेक्कन जिमखाना असा परिसर निर्मनुष्य होई. त्यावेळी रस्त्यांवरही मर्क्युरी लँप किंवा ट्युबलाईट होत्या. सोडियम व्हेपरच्या दिव्यांचा काळ युग यायचा होता. सायंकाळी सात वाजता घराची दारं बंद होत आणि आतमध्ये चर्चा घडत असे 'पुण्यात असं कसं घडलं..'याची

ही सर्व घटना पुण्याच्या इतिहासाला चिकटलेली आहे. अजूनही बाहेरगावचे लोक पुणेकरांना या घटनेबद्दल विचारतातच. ही घटना वर्तमानपत्रांतून वाचलेले आणि त्यावर चर्चा केलेले पुणेकरही ही घटना आयुष्याच्या अखेरपर्यंत विसरणार नाहीत. आजही जेव्हा काही कारणानं रस्ते सामसूम होतात तेव्हाही आठवण काढली जाते त्याच भयावह दिवसांची!  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com