Why Nationalist Congress Party NCPs clock has been on 10.10 time | Sarkarnama

राष्ट्रवादीच्या घड्याळातील काटा हा दहा वाजून दहा मिनिटांवरच का?

राष्ट्रवादीच्या घड्याळातील काटा हा दहा वाजून दहा मिनिटांवरच का?

सरकारनामा
बुधवार, 9 जून 2021

शरद पवार यांनी आपल्या वैयक्तिक हिमतीवर हा पक्ष स्थापन केला. दिल्लीच्या तख्ताशी झुंज दिली. 1999 च्या मे महिन्यापासून काँग्रेस पक्ष आणि शरद पवार यांच्यातील संघर्ष ठळकपणे लोकांच्यासमोर आलेला होता.

देशाच्या आणि विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी घडामोड 10 जून 1999 रोज घडली. याच दिवशी रोजी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची औपचारिक स्थापना केली. आता या पक्षाला 21 वर्षे पूर्ण झाली आहेत. महाराष्ट्राच्या सत्तेत 2014 ते 2019 या पाच वर्षांचा कालावधी सोडला तर राष्ट्रवादी काॅंग्रेस गेली 16 वर्षे सत्तेतच आहे. पश्चिम महाराष्ट्र हा आपला बालेकिल्ला कायम राखला आहे. 

या पक्षाच्या स्थापनेआधी अनेक घडामोडी घडल्या. या पक्षाच्या स्थानपेचे पडसाद राज्यात अगदी गाव पातळीवर पडले. काॅंग्रेस पक्ष फुटला. गावागावात दोन गट निर्माण झाले. 2014 ते 2019 या पाच वर्षांपुरता हा पक्ष सत्तेपासून दूर गेला होता. आता पुन्हा सत्तेत स्थान मिळाले आहे.

शरद पवार यांनी आपल्या वैयक्तिक हिमतीवर हा पक्ष स्थापन केला. दिल्लीच्या तख्ताशी झुंज दिली. यासाठीच्या सर्व घडामोडी त्यांनी आपल्या आत्मचरित्रात दिल्या आहेत. 1999 च्या मे महिन्यापासून काँग्रेस पक्ष आणि शरद पवार यांच्यातील संघर्ष ठळकपणे लोकांच्यासमोर आलेला होता.

`लोक माझे सांगाती`मध्ये पवार काय म्हणतात?

शरद पवार यांनी लिहिलेल्या "लोक माझे सांगाती"या राजकीय आत्मकथनात त्यांनी काँग्रेसमधली परिस्थिती आणि त्यांना डावलले गेलेले काही प्रसंग, सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाच्या मुद्द्यावर पक्षाच्या कार्यकारिणीत झालेली चर्चा आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना याबद्दल सविस्तरपणे लिहिले आहे.
 
डिसेंबर 2015 मध्ये प्रकाशित झालेल्या "लोक माझे सांगाती" पुस्तकात शरद पवार यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग मांडले आहेत.

पवार यांनी "मुक्काम नवी दिल्ली" या प्रकरणात याचा उहापोह केला आहे. या प्रकरणात पवार यांनी एके ठिकाणी, 'सोनिया गांधी यांनी काँग्रेसच नेतृत्व स्वीकारावं, याबाबतीत माझा पुढाकार होता. पण एकदा पक्षाची धुरा खांद्यावर घेतल्यावर आमच्यातल्या नात्यात अंतर पडायला सुरुवात झाली. काँग्रेसमधून मला निलंबित करण्यात येइपर्यंत असं काय घडलं, हे नमूद करायलाच हवं.'अस म्हणून पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापने पर्यंतचा प्रवास सांगितला आहे.

सोनिया गांधींचे कान कोण भरायचे?

"सोनिया गांधी अध्यक्ष असताना त्यांच्याबरोबर माझं व्यक्तीगत नातं स्नेहाचं होतं. नेतृत्व स्वीकारल्यावर त्या त्यांचा कारभार दोन टीम मंडळीच्या सल्ल्यानुसार चालवायच्या. ही मंडळी गांधी घराण्याची परंपरागत निष्ठावान होती.त्यांचे आणि माझे सूर कधीच जुळले नव्हते. १९९९ च्या निवडणुकीत महाराष्ट्रातून काँग्रेसचे सर्वाधिक खासदार निवडून आले होते. त्याबद्दलची एक असूया काँग्रेसच्या त्यांच्या या वर्तुळात होतीच. यातून त्यांनी सोनिया गांधींचे कान भरायला मोठ्या प्रमाणात सुरुवात केली.इंदिरा गांधी यांचं मत डावलून शरद पवार यांनी महाराष्ट्रात पुलोद च सरकार स्थापन केले होते. राजीव गांधी पवारांवर नाराज असल्यामुळेच पवारांविरुद्ध बंड करण्यास पक्षातल्या आमदारांना राजीवजींनीच सांगितलं होतं. याचाच अर्थ, राजीव गांधी यांचंही पवार यांच्याबद्दल प्रतिकूलच मत होतं,`` असं सातत्याने  सोनियांच्या कानी घातलं जातं होतं. त्यातूनच आमच्या दोघात अंतर निर्माण व्हायला सुरुवात झाली.

माझे निर्णय डावलले

त्या प्रत्यक्षात काही बोलायच्या नाहीत पण त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसायची. आमच्यात झालेल्या चर्चेतून आम्ही ठरवलेला निर्णय घेण्याऐवजी प्रत्यक्षात त्या बरोबर उलट निर्णय घायच्या. सभागृहातला नेता मी होतो; परंतु तिथल्या चर्चेत सहभागी सदस्यांची नाव मी निश्चित केली की या नावात हमखास बदल करून, आणखी तिसऱ्याच कुणा सदस्याला चर्चेत बोलण्यासाठी त्या सांगायच्या."अस सांगत पवार यांनी सोनिया गांधी आणि त्यांच्यातील अंतर वाढत चालले होते हे नमूद केले आहे. 
काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद समोर आला तो 15 मे1999 रोजीच्या बैठकीत.

सोनियांच्या परदेशी जन्माचा मुद्दा!

त्या दिवशी पक्षाच्या बैठकीत दोनच मुद्द्यावर चर्चा करण्यात येणार होती. गोवा विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांची यादी फायनल करणे, राष्ट्रीय जनता दल आणि अण्णा द्रमुक या पक्षाशी निवडणूक समझोता करणं. या बैठकीत सोनिया गांधी यांनी अचानक एक कागद काढून तो वाचायला सुरुवात केली. त्यांचा जन्म परदेशातील असून विरोधकांकडून तो प्रचाराचा मुद्दा झाला तर पक्षाच्या कामगिरीवर काय परिणाम होईल.याचा विचारविनिमय करण्यात यावा आणि भाजपने विदेशी जन्माचा मुद्दा प्रचाराचा बनवला आहे. त्यावर प्रत्येकाने आपले मत स्पष्टपणे मांडावे असे सोनिया गांधी यांनी म्हटल्यावर अर्जुनसिंग, ए. के. अँटनी, गुलाम नबी आझाद, अंबिका सोनी यांनी सोनिया गांधी यांनीच देशाचे आणि पक्षाचे नेतृत्व करावे, अशी भूमिका मांडली.

 त्यावेळी पी. ए. संगमा, तारिक अन्वर यांनी, "सोनिया गांधी यांच्या विदेशी जन्माचा मुद्दा प्रचारात आल्यावर त्याचा परिणाम होणार नाही, असे मानणे भाबडेपणा ठरेल. असे सांगून त्या टिकेला उत्तर कस द्यायच याची व्यूहरचना करायला हवी," अशा आशयाची भूमिका मांडली.

पवारांचे काॅंग्रेसमधून निलंबन

शरद पवार यांनीही संगमा यांच्या भूमिकेचे समर्थन करत मुंबई विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात एका विद्यार्थीनीने त्यांना याबाबत विचारलेला प्रश्न बैठकीत सांगून या विषय जनमानसात पोहोचला आहे, तो अग्रभागी राहील असे सांगून,त्याच्यातून समज गैरसमज निर्माण होतील;पण आपण निकरान या प्रश्नाचा सामना करू,' असे सांगितले. देशभर राजकीय वातावरण तापले. शरद पवार, संगमा आणि तारिक अन्वर यांच्या विरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. 

त्यानंतर शरद पवार आणि संगमा अन्वर यांनी सोनिया गांधी यांना एक पत्र पाठवून त्यांची भूमिका मांडली. काँग्रेसमधल्या घडामोडीनंतर देशात जो वाद  निर्माण झाला आहे. तो संपवण्यासाठी काही सूचना त्यांनी मांडल्या.

'देशाचे राष्ट्रपती,उपराष्ट्रपती, पंतप्रधान ही सर्वोच्च पदे केवळ भारतात नैसर्गिकरित्या जन्माला आलेल्या व्यक्तीलाच भूषवता यावीत, या दृष्टीने देशाच्या राज्यघटनेत बदल केला जाईल, असे आश्वासन काँग्रेसने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात द्यावे. अशी विनंती त्यांनी केली. या तीन नेत्यांचं पत्र पोहोचल्यानंतर काँग्रेसची बैठक झाली आणि तातडीने या तिघांना पक्षातून निलंबित करण्यात आले.

घड्याळात दहा वाजून दहा का वाजलेले?

शरद पवार यांना काँग्रेसमधून निलंबित केल्यानंतर काँग्रेस विचाराचा पर्याय निर्माण करण्याची मागणी होऊ लागली.पवार यांना देशभरातील अनेक नेते भेटायला येऊन पाठिंबा देऊ लागले. मग 17 जून 1999 रोजी मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये 10 वाजून 10 मिनिटांनी पक्ष स्थापन करण्याची मिटिंग झाली. त्याच दिवशी शिवाजी पार्कला खुले अधिवेशन घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. पवार यांच्यासोबत अन्वर आणि संगमा यांच्यावर राष्ट्रीय जबाबदारी दिली. छगन भुजबळ यांना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले.

 चिन्ह घड्याळ का?

राष्ट्रवादी काँग्रेसकडून चरखा हे निवडणूक चिन्ह मागितले गेले. पण ते चिन्ह मिळाले नाही मग घड्याळ या चिन्हांची मागणी केली. षण्मुखानंद हॉलमध्ये 10 वाजून 10 मिनिटांनी पक्ष स्थापनेची बैठक झाली होती ती वेळ दाखवणारे घड्याळ पक्षाचे चिन्ह झाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

टॅग्स

शरद पवार, Sharad Pawar, दिल्ली, काँग्रेस, Indian National Congress, महाराष्ट्र, Maharashtra, राजकारण, Politics