Tatyarao Pundlikrao Lahane
Tatyarao Pundlikrao LahaneSarkarnama

.. म्हणून डाॅ. लहाने यांच्या डोळ्यांना फडणवीस सरकार खुपले?

राज्याचे प्रभारी वैद्यकीय संचालक डाॅ. तात्याराव लहाने यांनी आपल्याला फडणवीस सरकारच्या काळात त्रास झाल्याचे सांगत खळबळ उडवून दिली. फडणवीस सरकार आणि लहाने यांच्यात कोठे संघर्ष उडाला? त्यामागची कारणे काय असू शकतील याचा घेतलेला शोध.

वरिष्ठ सरकारी अधिकारी हे शक्यतो राजकारण्यांना दुखवत नाहीत. सत्तेतील नेत्यांबद्दल आरती ओवाळण्याशिवाय पर्याय नसतो पण विरोधी पक्षातील नेतेही आपल्याबद्दल साॅफ्ट काॅर्नर ठेवून राहतील, असे या अधिकाऱ्यांचे धोरण असते. एकाच वेळी दोन्ही बाजू सांभाळत आपल्यावर कोणतीही आफत येणार नाही, याची दक्षता घेतली जाते. या नियमाला नुकताच एक अपवाद दिसला. हा अपवाद होता वैद्यकीय शिक्षण संचालक डाॅ. तात्याराव लहाने यांचा. त्यांनी थेट फडणवीस सरकारच्या काळात आपल्याला फार त्रास झाला, असे जाहीरपणे सांगितले. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा सत्कार समारंभाच्या वेळी लहानेंनी मुंडेंवर स्तुतीसुमने उधळली पण फडणवीस सरकारपबद्दलची नाराजी स्पष्टपणे सांगितली.

पद्मश्री फडणवीसांच्या काळात

प्रसिद्ध नेत्रतज्ञ म्हणून लहाने राज्यात परिचित आहेत. त्यांच्या नेत्रशिबिरांना भरभरून प्रतिसाद मिळतो. राज्य सरकारच्या वैद्यकीय सेवेत राहूनही ज्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली, अशा अधिकाऱ्यांत त्यांचा समावेश होतो. गरिबीतून झालेले शिक्षण, त्यासाठीचा संघर्ष आणि नंतर कामात वेगळा ठसा उमटवित लहानेंनी आपले नाव सर्वत्र झाले. राज्यात 2014 ते 2019 या कालावधीत सत्तेवर असलेल्या फडणवीस सरकारच्या कालावधीत त्यांना भारत सरकराने पद्मश्री सन्मान देवून त्यांचा गौरव केला. या पद्मश्रीसाठीची शिफारस ही फडणवीस सरकारने केली होती, अशी माहिती विधान परिषदेतील विरोधी पक्षऩेते प्रवीण दरेकर यांनी दिली. याचा अर्थ पद्मश्री मिळेपर्यंत तरी फडणवीस आणि लहाने यांचे संबंध चांगले असावेत, असा अर्थ निघतो.

भुजबळांना केलेली मदत चर्चेची

फडणवीस सरकारच्या काळात अशा काही घटना घडल्या की लहाने वेगळ्या अर्थाने चर्चेत राहिले. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे अटकेमध्ये होते. त्यांचा मुक्काम हा तुरुंगात होता. त्या वेळी लहाने हे जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता होते. मात्र भुजबळ यांना काही उपचारासाठी 40 दिवस बाॅम्बे हाॅस्पिटलमध्ये प्रायव्हेट खोल्यांत ठेवण्यात आले होते. त्यासाठी खालच्या न्यायालयाने लहाने यांना दोषी ठरविले होते. त्यामुळे फडणवीस विरुद्ध लहाने असा पहिला खटका तेथे उडाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर भुजबळ हे पुन्हा मंत्री झाले आणि 2020 चा महात्मा फुले समता परिषदेचा पुरस्कार लहाने यांना मिळाला.

एका मंत्र्याशी उडालेले खटके

जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता असताना लहानेंच्या विरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. तेव्हा त्यातून सुटण्यासाठी त्यांना बरीच धावपळ करावी लागली होती. त्याच काळात या खात्याशी संबंधित एका मंत्र्याशी लहाने यांचे फारसे पटत नव्हते, अशी तेव्हा चर्चा होती. तो गुन्हा आणि त्या मंत्र्याशी योग्य संपर्क नसणे यावरही काहीजण बोट दाखवतात.पाठीच्या मणक्यावरील उपचारासाठी लहाने हे 2018 मध्ये रुग्णालयात असताना त्यांनी आत्मचरित्र लिहिण्याचा संकल्प सोडला होता. त्यात एका मंत्र्यांचे कारनामे लिहिणार असल्याचे त्यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. वैद्यकीय शिक्षण खात्यातील चर्चेनुसार लहाने आणि एक मंत्री यांच्या टेलिफोन संभाषणाची क्लिप फडणवीस यांच्याकडे गेली होती. त्यानंतर या मंत्र्याची संबंधित खात्यातून बदली करण्यात आली आणि हे खाते दुसऱ्या मंत्र्याकडे देण्यात आले. त्यामुळे त्रास देणाऱ्या त्या मंत्र्यावर लहाने यांचा आता रोख नाही ना, अशी शंका उपस्थित होत आहे.

लहाने यांना राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक बनण्यामध्ये फडणवीस सरकारमधील काही मंत्र्यांनी अडचणी निर्माण केल्या नाहीत ना, याचीही चर्चा या खात्यामध्ये आहे. आताही त्यांच्याकडे या पदाचा प्रभारी कारभार आहे. लहाने यांच्याही काही बाबी फडणवीस सरकारला खटकल्या असल्याची शक्यता नाकारता येत नाही. काॅंग्रेस-राष्ट्रवादीतील नेत्यांशी त्यांची जवळीक तेव्हाच्या सरकारच्या डोळ्यावर आली नव्हती ना, अशी शंका आता बोलून दाखवली जात आहे. तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन हे आरोग्य महाशिबिरे घेण्यावर मोठ्या प्रमाणात भर देत होते. त्यांच्या जळगाव जिल्ह्यात तर ते अनेकदा भरवले गेले. या शिबिरांच्या संख्येवरून काही मतभेद होते का, असाही अंदाज बांधला जात आहे.

धनंजय मुंडे हे तेव्हा विरोधी पक्षनेते असताना त्यांनी आपल्याला खूप मदत केली, अशी भावना लहाने यांनी नगरमधील कार्यक्रमात जाहीरपणे व्यक्त केली. याचा अर्थ लहाने यांची बाजू मुंडे यांनी फडणवीस सरकारमध्ये लावून धरली होती. ते उघडपणे लहानेंनी बोलून दाखवले. जुन्या गोष्टी आठवतानाच कोणी त्रास दिला हे पण त्यांनी सांगून टाकले. पण पडद्याआड बरेच काही घडले असावे, एवढाच याचा अर्थ...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com