Why did Prithviraj Chavan lose his first union minister post | Sarkarnama

पृथ्वीराज चव्हाण यांचे केंद्रातील पहिले मंत्रीपद कशामुळे हुकले?

पृथ्वीराज चव्हाण यांचे केंद्रातील पहिले मंत्रीपद कशामुळे हुकले?

योगेश कुटे
गुरुवार, 13 ऑगस्ट 2020

उच्चशिक्षित तरुण नेता म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव 1991 मध्येच पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळाच्या यादीत घेतले जात होते. मात्र राजकारणात अशा काही बाबी वरिष्ठांच्या नजरेत येतात. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जातो. पृथ्वीराज चव्हाण यांनीही त्यांच्या कारकिर्दीत असाच पहिला अनुभव आला होता. त्याची ही गोष्टी

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे गांधी कुटुंबियांचे एकनिष्ठ मानले जातात. महाराष्ट्रातील राजकीय नेते हे गांधीनिष्ठ असतात, याचा दुसरा अर्थ ते शरद पवारविरोधक असतात, असाही होतो. गल्लीपासून दिल्लीपर्यंत कॉंग्रेसची सत्ता होती तेव्हा दोन्ही गटांत योग्य समतोल राखला जात होता.पृथ्वीराज चव्हाण यांच्या आधी त्यांचे वडील आनंदराव चव्हाण हे देखील राजकारणातील प्रबळ नेते होते. यशवंतराव चव्हाण हे राज्याचे नेतृत्त्व करत असताना आनंदराव यांनी गांधी कुटुंबियांशी जुळवून घेतले.

आनंदराव हे कऱ्हाड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करायचे. एकाच जिल्ह्यातील दोन चव्हाण हे केंद्रात मंत्री असल्याचा योगायोग त्यामुळे जुळून आला. 1971 मध्ये आनंदरावांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्या पत्नी प्रेमलाकाकी चव्हाण या खासदार झाल्या. त्या 1980 च्या निवडणुकीचा अपवाद वगळता 1991 पर्यंत कऱ्हाड लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या निधनानंतर 1991 मध्ये लोकसभेची निवडणूक लागली. त्याच वेळी कॉंग्रेसने या मतदारसंघातून नव्याने शिकून आलेल्या तरुण पृथ्वीराज चव्हाण यांना राजीव गांधी यांनी कऱ्हाडची उमेदवारी दिली.

राजीव गांधी यांचा मृत्यू

राज्यात शरद पवार हे कॉंग्रेसचे मुख्यमंत्री होते. देशभरात माजी पंतप्रधान राजीव गांधी हे कॉंग्रेसचे नेतृत्त्व करत होते. कॉंग्रेसच्या विरोधात भाजप, जनता दल असा सामना होता. 1989 च्या निवडणुकीत कॉंग्रेसला सत्तेतून पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतरच्या काळात दीड वर्षांसाठी दोन पंतप्रधान देशाने पाहिले होते. एक व्ही. पी. सिंग आणि दुसरे चंद्रशेखर. चंद्रशेखर यांचा पाठिंबा कॉंग्रेसने काढून घेतल्यानंतर निवडणुकीशिवाय पर्याय नव्हता. त्यानुसार राजीव गांधी हे देशभर प्रचार करून कॉंग्रेसच्या विजयासाठी प्रयत्न करत होते. मात्र तमिळनाडूतील श्रीपेरुबुदूर येथील प्रचार सभा संपल्यानंतर "एलटीटीई'ने केलेल्या आत्मघाती हल्ल्यात राजीव यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या मृत्यूनंतर राजकारणाचे विशेषतः कॉंग्रेसमधील समीकरणाचे गणित बदलले. राजीव यांच्या या आकस्मिक मृत्यूनंतर सोनिया गांधी यांनी पक्षात सक्रिय व्हायला नकार दिला आणि अवचितपणे पक्षाच्या अध्यक्षपदाची माळ पी. व्ही. नरसिंहराव यांच्या गळ्यात पडली. 244 जागा जिंकून कॉंग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून आघाडीवर राहिला. साहजिकच कॉंग्रेस पक्षात पंतप्रधानपदाचे उमेदवार कोण असणार, याची चर्चा सुरू झाली. सोनिया गांधी या राजकारणात येण्यास इच्छुक नसल्याने पहिल्यांदाच गांधी कुटुंबीयांच्या व्यतिरिक्तचा पंतप्रधान कॉंग्रेसला निवडायचा होता.

पहिले नाव आले ते साहजिकच नरसिंहराव यांचे. ते पक्षाचे अध्यक्ष असल्याने त्यांच्या शब्दाला वेगळे वजन आले होते. दुसरे नाव होते ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्या शरद पवार यांचे आणि तिसरे नाव होते ते मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अर्जुनसिंह यांचे. या तीन तगड्या नेत्यांतच पंतप्रधानपदांसाठी रस्सीखेच होती.राजीव गांधी यांच्या निधनानंतरच खरे तर कॉंग्रेसमधील स्पर्धा दिसू लागली होती. गांधी यांच्या निधनामुळे देशभरातील जवळपास निम्म्या जागांचे मतदान पुढे ढकलण्यात आलेले होते. देशभरातील कॉंग्रेसच्या उमेदवारांना मदत करण्यासाठी स्वतः शरद पवार यांनी पुढाकार घेतला होता.

दिल्लीतील रस्सीखेच

महाराष्ट्रातही त्यांनी 48 पैकी 39 जागांवर काॅंग्रेसचे उमेदवार निवडून आणून आपली ताकद दाखवून दिली होती. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर दिल्लीत ऱस्सीखेच सुरू झाली. शरद पवार यांचे दिल्लीतील सूत्रे हे सुरेश कलमाडी हलवत होते. खासदारांशी संपर्क करणे, त्यांना पवारांना पाठिंबा देण्याविषयी राजी करणे आदी कामे सुरेश कलमाडी करत होते. नरसिंहराव यांच्यावतीनेही त्यांचे समर्थक खासदारांना गोळा करत होते. सोनिया गांधी यांनी नरसिंहराव यांच्या बाजून कौल दिल्यानंतर साहजिकच कॉंग्रेसचे अनेक खासदार त्यांच्या पाठीशी उभे राहिले.

गांधीनिष्ठ खासदार साहजिकच यात पुढे होते. महाराष्ट्रातील पवारविरोधक मानले जाणारे पृथ्वीराज चव्हाण यांचाही पाठिंबा नरसिंहराव यांनी गृहित धरला होता. याच वेळी दिल्लीत सुरेश कलमाडी यांनी शरद पवारांसाठी दिल्लीत खासदारांची एक बैठक आयोजित केली. महाराष्ट्रातील खासदारांची बैठक असल्याचे कलमाडींनी चव्हाणांना सांगितले. चव्हाण या बैठकीला गेले. तेथे गेल्यानंतर शरद पवार यांना पाठिंबा देण्याबाबत तेथे चर्चा झाली.

रावांपर्यंत बातमी पोहोचली...

या बैठकीची बातमी पी. व्ही. नरसिंहराव यांच्यापर्यंत पोहोचली. या बैठकीला कोणकोण खासदार उपस्थित होते, याची नावेही वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाले. यात चव्हाण यांचेही नाव होते. चव्हाणांचा पंतप्रधानपदासाठी पवारांना पाठिंबा, असा मेसेज त्यामुळे दिल्लीच्या वर्तुळात गेला. मात्र पुरेसा पाठिंबा पवार यांना मिळू शकला नाही. नरसिंहराव यांचे पारडे जड झाल्यानंतर त्यांची पंतप्रधानपदी निवड जवळपास निश्चित झाली. नवीन मंत्रीमंडळात कोणकोण असणार, याची चर्चा सुरू झाली. महाराष्ट्रातून आपली वर्णी लागावी, यासाठी चव्हाण हे राव यांना भेटायला गेले.

सोबत राव यांचे सहकारी नागपूरचे कॉंग्रेसचे मोठे नेते भाऊसाहेब मुळूक हे पण होते. मुलगा उच्चशिक्षित आहे. त्याचा चांगला उपयोग मंत्रिमंडळात होईल, असे मुळूक यांनी रावांनी सांगितले. त्यावर रावांनी चव्हाणांनी पवारांना कसा काय पाठिंबा दिला, अशी विचारणा केली.

त्यावर सारवासावर करण्याची वेळ चव्हाणांवर आली. ती बैठक पवारांच्या पाठिंब्यासाठी बोलविण्यात आली होती, याची मला माहिती नव्हती, असा खुलासा चव्हाण यांनी त्यावर केला. राव त्यांच्या स्वभावाप्रमाणे फार काही बोलले नाही. पण आपण चव्हाण यांच्या नावाचा नंतर विचार करू, असे सांगून मुळूक आणि चव्हाण यांची पाठवणी केली. राव यांनी संभाव्य मंत्रिमंडळात खरे तर चव्हाण यांच्या नावाचा विचार केला होता. पण ती बैठक चव्हाण यांच्या पहिल्या मंत्रिपदाच्या आड आली.

त्यानंतर ही संधी मिळायला चव्हाण यांना तब्बल 13 वर्षे वाट पाहावी लागली. 2004 मध्ये संयुक्त आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर मनमोहनसिंग यांच्या मंत्रिमंडळात चव्हाण यांचा समावेश झाला. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी 2010 पर्यंत काम पाहिले. त्यानंतर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही झाले. पण पहिले मंत्रीपद हुकल्याची ही आठवण चव्हाण यांच्या मनात अजूनही ताजी आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

टॅग्स

पृथ्वीराज चव्हाण, Prithviraj Chavan, राजकारण, Politics, महाराष्ट्र, Maharashtra