Which Was firtst Live Encounter in India | Sarkarnama

देशातले पहिले एन्काऊंटर मन्या सुर्वेचे की आणखी कुणाचे?

देशातले पहिले एन्काऊंटर मन्या सुर्वेचे की आणखी कुणाचे?

अमित गोळवलकर
मंगळवार, 30 जून 2020


देशातला पहिला पोलिस एनकाऊंटर कोणाचा असे विचारल्यावर पटकन सांगितले जाते की मन्या सूर्वेचा. ११ जानेवारी, १९८२ रोजी पोलिसांनी वडाळ्यातील काँलेजमध्ये एनकाऊंटरमध्ये मारले. मन्या सूर्वेचा एनकाऊंटर केला होता इसाक बागवान या पोलिस अधिकाऱ्याने. पण त्यापूर्वीही एक एन्काऊंटर झाला होता, त्याची नोंद इतिहासाने घेतलीच नाही. हा एन्काऊंटर झाला होता आपल्या नगर जिल्ह्यात संगमनेरमध्ये. कुणाचा झाला एन्काऊंटर...कुणी केला...

पल्या देशात आता पोलिस एन्काउंटर थंडावले आहेत. याला कारण मानवी हक्क संघटना व कायद्यांचा दबाव. पण ८० व ९० च्या दशकात विशेषतः मुंबईत शेकडो एन्काऊंटर झाले. दाऊद इब्राहिम, अरुण गवळी या डाॅनच्या टोळ्यांच्या अनेक शार्प शुटर्सचा एन्काऊंटर पोलिसांनी केला. प्रदीप शर्मा, (स्व.) विजय साळस्कर, प्रफुल्ल भोसले, दया नायक, सुहेल बुद्धा, सचीन वाझे अशी अनेक नावे त्यावेळी गाजली. नंतरच्या काळात अब तक छप्पन्न सारखे चित्रपटही या पोलिस एन्काऊंटरच्या विषयावर निघाले. 

याला सुरुवात झाली ती मन्या सूर्वेच्या एन्काऊंटरने. ११ जानेवारी, १९८२ रोजी वडाळ्याच्या आंबेडकर काॅलेजमध्ये इसाक बागवान, यशवंत भिडे, राजा तांबट या पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने मन्या उर्फ मनोहर सुर्वेला संपवला आणि गुन्हेगारी जगतातला एक चॅप्टर बंद केला. हा एन्काऊंटर भारतातला पहिला लाईव्ह एन्काऊंटर मानला जातो. पण त्याही आधी ७० च्या दशकात एक एन्काउंटर झाला होता. नगर जिल्ह्यातल्या संगमनेर येथे. का कोण जाणे, पण या एन्काऊंटरची नोंद इतिहासाने घेतली नाही. वसंत गि. ढुमणे या पोलिस अधिकाऱ्याच्या हातून एक गुन्हेगार मारला गेला. त्याची हकिकत अशी.....

हे अधिकारी १९६४ मध्ये संगमनेर तालुक्यात सिनिअर फौजदार म्हणून नेमणुकीला होते. ७ आॅक्टोबर, १९६० रोजी संगमनेर कचेरीच्या आवारात इब्राहिम मुल्ला या व्यक्तीवर चाकूने हल्ला करुन ठार मारण्याच्या आरोपावरून किसन सावजी उर्फ किसन राघुसा पवार या गुन्हेगाराविरुद्ध खटला भरला होता. त्यात किसन सावजीला शिक्षाही झाली होती. पण किसन सावजी शिक्षा न भोगता फरारी झाला होता. त्याला पकडून आणण्याची जबाबदारी ढुमणेंवर होती.

कोण होता किसन सावजी

हा किसन सावजी होता कोण व त्याच्या गुन्ह्यांची कारकिर्द कशी होती, हे पाहणेही आवश्यक आहे. त्याच्या विरोधात १९४९ सालापासूनचे पोलिस रेकाॅर्ड होते. सरकारी नोकरांवर हल्ला करणे, धमकावणे असे गुन्हे त्याने केले होते. नंतरच्या काळात अफू, गांजा व दारूचाही अवैध व्यवसाय किसन सावजी करायचा. त्याच्या अड्ड्यावर छापा घालण्यासाठी आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनाही धमकावायला किसन सावजी कमी करत नसे. एका फौजदाराला तर किसन सावजीने रिव्हाॅल्व्हर दाखवून खून करण्याची धमकीही दिली होती. ज्या मॅजिस्ट्रेटनी त्याला शिक्षा ठोठावली होती. त्या मॅजिस्ट्रेटनाही व त्यांच्या पत्नीलाही किसन सावजीने जीवे मारण्याची धमकी दिली होती. 

त्याच्या कृष्णकृत्यांच्या हकिकती 'सकाळ'ने प्रसिद्ध केल्या होत्या. त्यावेळी किसन सावजीच्या लोकांनी 'सकाळ'चे संस्थापक कै. नानासाहेब परुळेकर यांच्यावर बदनामीचा दावा ठोकला होता. 'सकाळ'चे नगर जिल्ह्याचे बातमीदार अशोक चांदेकर किसन सावजीच्या गैरकृत्यांच्या बातम्या देत असत. त्यांनाही किसन सावजीने धमकावले होते. अशा व्यक्तींनाही किसन सावजी त्रास देऊ शकतो, ही भिती लोकांच्या मनात बसली होती. 

अशा या किसन सावजीला पकडण्यासाठी हायकोर्टाने वाॅरंट काढले होते. पण सुमारे पावणे तीन वर्षे ते वाॅरंट बजावलेच गेले नव्हते. याला कारण किसन सावजीची दहशत. किसन सावजी फरारी असलेलाच बरा. एकदा त्याने शिक्षा भोगली व तो परत आला तर तो लोकांना जीणे नको करुन सोडेल, ही खुद्द पोलिसांनाही खात्री होती. त्यामुळे किसन सावजी कायद्याच्या कचाट्याबाहेर राहिला होता. किसन सावजीचा मूळ धंदा अफू, गांजा विकण्याचा होता तरीही लोकांना दाखवण्यासाठी त्याने संगमनेरमध्ये 'काकाजी विडी' या नावाचे दुकान संगमनेरमध्ये थाटले होते. विडीच्या बंडलावर किसन सावजीचा फोटोही असायचा. 

मुंबईहून आणले पकडून

किसनवरचे वाॅरंट बजावले का जात नाही, ही विचारणा हायकोर्टाने केल्यानंतर सरकारने चौकशीसाठी हे प्रकरणी सीआयडीकडे सोपवले. किसन सावजीला पकडून आणण्यासाठी दबाव वाढायला लागला. त्यावेळी ही जबाबदारी आली संगमनेर तालुक्याचे तत्कालिन फौजदार व. गि. ढुमणे यांच्याकडे. मुंबईला जाऊन मोठ्या धाडसाने ढुमणेंनी किसन सावजीला पकडून आणले व त्याला न्यायालयासमोर उभे केले. त्याला एक वर्षाची शिक्षाही झाली. त्याला पकडले १९६४ मध्ये किसन सावजी नंतर तुरुंगात होता तो पर्यंत संगमनेरमध्ये शांतता होती. पण जसा तो सुटला तशा त्याच्या कारवाया पुन्हा सुरु झाल्या. लोकांना दमदाटी करणे, पैसे उकळणे, दारुच्या धंद्याची माहिती काढणाऱ्या पोलिसांना मारणे, असे त्याचे अपराध वाढत होते. 

पापाचा घडा भरला

अखेर किसन सावजीच्या पापांचा घडा पूर्ण भरला. २९ जानेवारी १९६६ ची रात्र. संगमनेरच्या ओपन एअर थिएटरमध्ये नगर येथील जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी नॅशनल डिफेन्स फंडाच्या मदतीसाठी (स्व.) पु. ल. देशपांडे यांच्या नाटकाचा प्रयोग सुरु होता. तेव्हाचे शेतकी व अन्न खात्याचे मंत्री बी. जे. खताळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. खात्याकडून काही विशेष सुचना असल्याने सिनिअर फौजदार ढुमणे सर्व्हिस रिव्हाॅल्व्हर कमरेला लाऊन त्यांच्या पाठीमागच्या आसनावरच बसले होते. रात्री एकनंतर नाटकही सुरुच होते. तेवढ्यात एक व्यक्ती स्टेजच्या बाजूने कुणाला तरी शोधते आहे, असे ढुमणे यांनी पाहिले. स्टेजवरच्या उजेडात ही व्यक्ती ढुमणे यांच्याजवळ आली त्यांना तिने खुणेने बाहेर बोलावले. 

जवळच असलेल्या राजस्थान चित्र मंदीर याठिकाणी सुरु असलेला चित्रपटाचा खेळ किसन सावजीने बंद पाडला असून तो लोकांना थिएटरबाहेर पडू देत नाहीये, असे या व्यक्तीने ढुमणेंना सांगितले. हा प्रकार सुमारे तासभर सुरु होता. लोकांमध्ये हलकल्लोळ माजला होता. आत अडकलेली बायका पोरं रडत होती. बाहेरही गर्दी जमली होती. काही वेळातच ढुमणे त्या ठिकाणी पोहोचले. परिसरात आत अडकलेल्यांच्या सग्यासोयऱ्यांची गर्दी जमली होती. ढुमणे पुढे सरकले. 

...आणि किसनने केला फौजदारांवर वार

थिएटरच्या ओट्याची पहिली पायरी ढुमणे चढले तोच त्यांच्या डाव्या अंगाने किसन सावजी जोषात धावून आला. त्याच्या उजव्या हातात रामपूरी चाकू व दुसऱ्या हातात भक्कम काठी होती. जवळ येताच त्याने चाकूचा वार ढुमणेंच्या अंगावर केला. पण ढुमणे मागे सरकले. किसन सावजी ओट्यावर उभा होता आणि ढुमणे ओट्याच्या खाली. किसन सावजी सव्वा सहा फूट उंच. मुद्रा क्रूर झालेली. अशा अवस्थेत त्याच्या काठीचा एक फटका जरी ढुमणेंच्या डोक्यावर बसला असता तरी मृत्यू अटळ होता. 

त्याला जागेवरच थांबवायला पाहिजे हे जाणून ढुमणेंनी कमरेचे रिव्हाॅल्व्हर काढले आणि किसन सावजीच्या मांडीच्या दिशेने एक गोळी झाडली. पण हाच क्षण किसन सावजीच्या दृष्टीने दुर्दैवाचा ठरला. रात्रीच्या त्या अंधारात ठोSSS असा आवाज घुमला आणि त्याच वेळी किसन सावजीने ओट्यावरुन खाली पाऊल टाकले. किसन सावजी जागेवरच उभा होता. गोळी चुकली असे ढुमणेंना वाटले. त्यांनी पुन्हा रिव्हाॅल्व्हर सावरले. किसन जागीच निश्चल उभा होता. चाकू व काठी घेतलेले हात खाली आले होते. त्याने त्वेषाने ढुमणेंना उद्देशून शिवी हासडली. 'तुला सोडणार नाही,' असे किसन सावजी म्हणतो न म्हणतो तोच त्याच्या शर्टावर पोटावर डाव्या बाजूला रक्ताचा डाग दिसायला लागला. थोडक्यात गोळी आणि तीही वर्मी लागली होती. प्रचंड ताकदीचा किसन सावजी हळूहळू खाली बसला आणि नंतर जमिनीवर पाय दुमडून पडला. 

गोळी लागल्यानंतरही रग होती कायम

दवाखान्यात नेण्याची काही सोय नव्हती. म्हणून जवळच उभ्या असलेल्या एका हातगाडीवर किसनला झोपवण्यात आले व दवाखान्यापर्यंत नेण्यात आले. दवाखान्याच्या वाटेत असतानाच किसनने डोळे उघडले व जवळ पोलिस पाहून त्याचे डोके सटकले. त्याने आपल्या डोक्याजवळ उभ्या असलेल्या एका काँन्स्टेबलला जोरदार चपराक ठेऊन दिली. किरकोळ तब्येत असलेला हा काँन्स्टेबल अक्षरशः कोलमडला. पण शेवटी किसन सावजीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तोवर पहाटेचे अडीच तीन वाजून गेले होते. संगमनेरसारख्या गावात त्या काळी मोठ्या आॅपरेशनची सोय नव्हती. किसन सावजीच्या शरीरात गोळी अडकलेली होती. शेवटी त्याला नाशिकला सरकारी रुग्णालयात पाठवायचे ठरले.

गुन्हेगारीचे एक पर्व संपले

पहाटे साडेपाचच्या सुमारास टॅक्सीची सोय झाली. किसनवर नाशिकच्या रुग्णालयात उपचार सुरु होते. पण अखेर ३० जानेवारी १९६६ रोजी किसन सावजीने रुग्णालयात प्राण सोडला. किसन सावजी नावाचे गुन्हेगारीचे एक पर्व एका फौजदाराच्या गोळीने संपले. पुढे या प्रकरणाची रितसर चौकशी झाली. किसनच्या समर्थकांनी ढुमणे फौजदारांना संपवण्याच्या शपथाही खाल्ल्या होत्या. त्यांना मारण्याची सुपारीही एका गुंडाला देण्यात आली होती. पण हे सगळे हवेत विरले. किसन सावजी खऱ्या एन्काउंटरमध्येच मारला गेल्याचे चौकशीत सिद्ध झाले. 

त्यावेळी माध्यमांचा म्हणावा तसा जोर नव्हता. संपर्काचे जाळे कमी होते. त्यामुळेच बहुदा पोलिस इतिहासाच्या पानात या एन्काऊंटरची पहिले एन्काऊंटर म्हणून नोंद झाली नसावी. त्यामुळेच याबाबतचा उल्लेख इंटनरेट वा अन्य कुठे सापडणार नाही. नगर जिल्ह्याच्या पोलिस रेकाॅर्डमध्ये ही घटना नक्की नोंदवलेली सापडेल. पण ही संपूर्ण घटना खुद्द वि. ग. ढुमणे यांनी आपल्या 'विधीलिखित फौजदारी' या आत्मचरित्रात नोंदवली आहे. आपली फौजदारी ही विधीलिखित होती. एका ज्योतिषाने ही भविष्यवाणी वर्तवली होती व आपल्या हातून एका व्यक्तीला मृत्यू येईल, हे देखिल एका ज्योतीषाने नमूद करुन ठेवले होते, असेही ढुमणे यांनी नोंदवले आहे. ढुमणे मुळचे पुण्याचे. पुढे ते पोलिस अधिक्षक म्हणून निवृत्त झाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

टॅग्स

पोलिस, नगर, संगमनेर, दाऊद इब्राहिम, चित्रपट, गुन्हेगार, भारत, सरकार, Government, व्यवसाय, Profession, खून, सकाळ, पु. ल. देशपांडे, नाटक, Fertiliser, राजस्थान